बीड : बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत बीडमध्ये लॉकडाऊन असेल. कोरोना पुन्हा डोकं वर काढत असताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.कोव्हिडचा समूह संसर्ग टाळण्यासाठी बीड जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी लॉकडाऊनसंबंधी आदेश काढले आहेत. 26 मार्चला रात्रीपासून 4 एप्रिलपर्यंत दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे. याआधी बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला होता. 13 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता.
लॉकडाऊन नको, मजुरांची ओरड
रोजंदारी आणि मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या मराठवाड्यात मोठी आहे. मराठवाड्यात कारखानदारी नसल्याने अनेक लोकांची मंदार रोजंदारीवरच आहे. बीड जिल्ह्यातील स्थिती सर्वात बिकट आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून बीड परिचित आहे. अशात लॉकडाऊन पडले तर रोजगार कसा उपलब्ध करायचा असा सवाल मजूर आणि व्यावसायिकांना पडला आहे. पुन्हा लॉकडाऊन नकोय अशी आर्त ओरड मराठवाड्यातील नागरिक करतायेत.
कोरोना चाचणी बंधनकारक
बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने यापुढे शहरातील व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कोरोनाची चाचणी टेस्ट करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बीडमधील ‘त्या’ जावयांचा सुटकेचा निश्वास
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विडा येथील जावयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसवून जावयाची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या परंपरेला जवळपास 80 हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.
जमावबंदीच्या आदेशाचा फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीडसह अनेक जिल्ह्यात यंदा जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. होळी, धुलिवंदन यासारखे सण साजरे करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे गदर्भ सवारीची ही प्रथाही खंडित होण्याची शक्यता आहे. गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची नामुष्की टाळण्यासाठी जावयांना लपून बसण्याची कसरत करावी लागते. मात्र ही परंपरा या वर्षी पाळली जाण्याची शक्यता कमी असल्याने विड्याच्या जावयांना लपून बसण्याची गरज पडणार नाही.
Leave a Reply