नागपूर : पतंगाच्या नादात धावणाऱ्या एका १२ वर्षीय मुलाचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना मानकापूर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. एन्टा विनोद सोळंकी (शिवकृष्णधामजवळ, वॉक्स कुलरच्या ब्रीजखाली, कोराडी) असे मृत मुलाचे नाव आहे.
एंटा हा आपल्या आजीसोबत कोराडी मार्गावरील रेल्वेच्या पुलाखाली उघडय़ावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडिलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती. त्याचे खरे नाव कुणालाही माहिती नाही. त्याला एंटा म्हणूनच ओळखले जायचे. तो गेल्या आठ दिवसांपासून आजीला पतंग विकत घेऊन मागत होता. मात्र, पैसे नसल्यामुळे त्याला पतंग मिळाली नाही. त्यामुळे तो अडकलेल्या पतंग आणि तुटलेला मांजा जमा करून आपला इच्छा पूर्ण करीत होता. मंगळवारी सकाळपासूनच तो या कामात लागला होता. दुपारी तो शिवकृष्णधाम झोपडपट्टीजवळील दिल्ली ते नागपूर रेल्वे लाईनवर गेला. त्याला रेल्वेगाडी दिसली नाही व रेल्वेची जोरदार धडक एंटाला बसली. नागरिकांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत मेयोत रवाना केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या आठ दिवसांतील पतंगाच्या नादात गेलेला हा दुसरा बळी आहे. यापूर्वी एमआयडीसीमध्ये एका कारच्या धडकेत यश नावाच्या १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. मानकापुरात आदित्या नावाच्या विद्यार्थ्यांचा नायलॉन मांजामुळे गळा कापला होता.
Leave a Reply