जालना (प्रतींनिधी) : नेर-जालना जिल्हा परिषद सर्कल मधील होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणूका येत्या (ता. 15) जानेवारी रोजी पार पडणार आहेत. यामध्ये नेर सर्कल मधील चितळी पुतळी सजा मधील आठ व नेर गणामधील पाच अश्या तेरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूका आहेत. या गावातील निवडणूका बिनविरोध झाल्यास प्रत्येकी ग्रामपंचायतीला पाच लक्ष रूपयाचा निधी विकास कामासाठी देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य भागवत (अंकल) उफाड यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगीतले आहे.
याबाबत देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ग्राम पंचायत निवडणूकीमध्ये गावामध्ये मोठ्या प्रमाणात वाद होतात. या वादामुळे एकमेकाबद्दल आपसात द्वेष वाढतात. दोन दिवसाच्या निवडणुकीमुळे भावा-भावामध्ये आणि भावकीमध्ये भांडणे होतात. त्याचा परिणाम हा गावच्या विकासावर होतो. त्यामुळे ज्या गावातील निवडणूक ग्रामस्थांनी एकत्र येवुन पक्षीय राजकारणाच्या पुढे जावुन बिनविरोध केली अशा ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या निधीमधुन पाच लक्ष रूपयाचा विकास निधी प्राधान्याने देण्यात येईल. यामुळे गावातील राजकीय व सामाजिक वातावरण आबाधीत राहून ग्रामविकासाला चालना मिळेल असे ही शेवटी जिल्हा परिषद सदस्य भागवत (अंकल) उफाड यांनी सांगीतले.
Leave a Reply