ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बुद्धाच्या ज्ञानगंगेत धुवून घेतलेला कवितासंग्रह : धुतलेलं मातरं

April 3, 202113:37 PM 130 0 0

नवोदितांची लेखणी तळपत्या तलवारीसारखी असते. ती दुधारी नाही असा अनेकांचा आरोप असतो. आजच्या नवोदितांचं लेखन नवनवेन्मेषशाली असंच आहे. या नव्या लेखनाचा दर्जा सकस असावा , नव्या सृजनाची आम्ही वाट पाहात आहोत असे त्यांचे म्हणणे असते. आज जगभरात नवोदितांच्या नव्या वेबसाईट भरभरुन आहेत. सोशल मिडियावर अनेक मंडळे कार्यरत आहेत. ती सवंग आहेत, असे आपणास वाटते. ते चिरकाल टिकत नाही असेही आपणास वाटते. साहित्य चळवळीत दाखल झालेली आणि नव्या तंत्रज्ञानाचा लीलया वापर करणारी तसेच त्यामाध्यमातून सर्व दूर पोहोंचलेली ही साहित्य सेवेची मंचीय विचारधारा निश्चितच स्पृहणीय आहे असे आपणास वाटत नाही. अनेक स्पर्धा, विविध विषयांवर झडत असलेल्या चर्चा , साहित्य चळवळीला मिळत असलेला आयाम तुमच्या जुनाट , रुढीवादी ,परंपरावादी हुजरेगिरी करणाऱ्या तुमच्या कुजलेल्या मानसिकतेला पचनी पडत नाही. आजची नवी पिढी चंगळवादी आहे हे मान्य केले तरी ते सर्वथा त्यातच डुंबून बुडून मरावेत अशी आणि अशीच आपली धारणा आहे, हा आम्हा नवोदितांचा गैरसमज असावा असे वाटत असले, जाणवत असले तरी आरोप आहे हे सगळ्यांनाच बहुधा मान्य आहे. नव्या पिढीच्या हातात असलेल्या साधनासंबंधाने ते प्रचारकी थाटाचे आहे असेही आपणास वाटते. ते अमंगळ तितकेच अनुल्लेखनीय आहे असेही आपणास वाटत आलेले आहे. अशा काही भडव्यांना काहीही वाटत असले तरीही नव्या जगाच्या प्रवाही प्रकाशझोतात स्वतःला झोकून देणारे, आपली प्रतिभा अनेक प्रतिमांपर्यंत पोहचविणारे समकाळातल्या विद्वत्तेच्या पातळीवर ‘टीरबडवे’ कसे काय असू शकतात?

आपण कविता का लिहितो याचं सविस्तर विश्लेषण प्रसिद्ध विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केलं आहे. ते म्हणतात, आपण कविता लिहतो म्हणजे हस्तक्षेप आणि पर्याय लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे नवनव्याने उगवण्यासाठीची कृती लिहितो. आपण कविता लिहितो म्हणजे माणूस म्हणून स्वतःचे काही निर्माण करण्याची प्रक्रिया लिहितो. कवी अनुरत्न वाघमारे हे जुन्या पिढीतील अत्यंत महत्त्वाचे कवी आहेत. त्यांच्या कवितेतून सम्यक होण्याच्या मार्गातील अडथळे दूर होण्याचा निर्धार दुग्गोचर होतो. बुद्धाने पुकारलेल्या शांतीअहिंसेच्या मार्गावरील युद्धाचे पडघम दिसून येतात. परंतु ‘पुढील काही महिने किंवा वर्षे मराठीत कविता अजिबातच लिहिली गेली नाही तरी मराठी कवितेचे काही नुकसान होईल असे वाटत नाही. म्हणजे वर्षभर आपल्या पूर्वसुरींनी काय लिहून ठेवलेय याचे गांभीर्याने पुनर्वाचन करावे आणि खरेच काही लिहायचे बाकी असेल तरच लिहावे. अन्यथा भ्रमनिरास झालेले वाचक आपल्याला माफ करणार नाहीत!’ असे सांगून नवनव्याने लिहणाऱ्या हातांना कलम करणारे काही अतिशहाणे प्राध्यापक विद्यापिठीय परिक्षेत्रात ठेचाळतात. यावरुन जुन्या धेंडांना काही वाचक मिळत नसल्याचेच सिद्ध होते. त्यामुळे ही क्लृप्ती डोक्यात शिजली आहे की काय अशी शंका येते. हे त्या लोकांच्या समुहापैकीच आहेत, ज्यांनी नव्या साहित्यिकांचे येनकेन प्रकारेन दमनच केलंय. तुम्ही काही लिहूच नये, ते फारसे दर्जेदार असणार नाही. तुम्ही काही नाही लिहिलात तरी साहित्याचे काही बिघडणार नाही. फक्त तुम्ही एक केले पाहिजे की, मागचंच तुम्ही वाचलं पाहिजे. त्यातून तुम्हाला वेगळं असं काही सुचलं तर तुम्ही ते लिहावं, अन्यथा तुम्ही काहीतरी लिहाल (दर्जाहीन) आणि वाचकांचा भ्रमनिरास व्हायचा! त्यामुळे तुम्ही गप्प राहून साहित्याची सेवा करु शकता. अशी वैचारिक दमदाटी करणारे फ्रेंचकट जेव्हा स्वत:ला फारच शहाणे समजतात तेव्हा नवख्यांनी मनातल्या मनात काय झिरपून जायचे काय?

वाङमय काही कुणाच्या बापाची जागीर नाही. मराठीचं आजचं रुप कोणतं आहे हे आजचे वाचक ठरवतीलच! तुम्ही सांगणारे कोण टीकोजीराव? आचारसंहितेच्या मुद्याखाली काही आरधगाभुळे महाशय कवींची संख्यावाढ बाळसे की सूज ? असा पांचट विषय परिसंवादात घेतात तेव्हा मराठीच्या गळचेपेपणाविरुद्ध‌ गळे काढणाऱ्या कंठशोषी अमृते पैजावाल्यांच्या बुद्धीची कीव कराविशी वाटते. तुम्ही कुणाचीही अभिव्यक्ती रोखू शकत नाही. कुणाची लेखणी थांबवू शकत नाही. आजची मराठी कविता त्याच त्याच आवर्तात तर फिरत नाही ना? अशी फारच काळजी वाटत असेल तर स्वतःच्या ढुंगणाभोवती फिरवून घ्यावी आणि सांगावे की आत्ता कुठे कविता आवर्ताच्या बाहेर आली आहे. अरे, पिढ्यानपिढ्या पासून ज्ञानबंदी, भाषाबंदी, विचारबंदी, विहारबंदी आणि मानवी जगण्याच्या विविध क्षेत्रात हरेकप्रकारची नाकाबंदी करण्यात आलेली असतांना घटनेच्या शिल्पकाराने जी तुम्हाला तुरुंग तोडणाऱ्या उठावाची भाषा तुमच्या तळहातावर ठेवली आहे. या संबंधाने या बहिष्कृत असलेल्या, उपेक्षित असलेल्या आणि लिखाणाच्याही बाबतीत वंचित असलेल्या समुहांना अगदी शालीनतेचे सोंग घेऊन रोखण्याची हिम्मत होतेच कशी? बाबासाहेब नसते आणि बापाने बाबासाहेबांचा आदर्श मला घालून दिला नसता तर काय झाले असते हे कवी अनुरत्न वाघमारे त्यांच्याच एका कवितेत म्हणतात,

‘घातली नसती बापाने फुंकर
शिक्षणाची तर
तोंड नसलेल्या चिऱ्यांसारखा
पडलो असतो वळचणीत
जन्मभर……!

असे जन्मभर वळचणीलाच पडून राहायची वेळ आली असती म्हणून आपण राहावे कसे, जगावे कसे, बोलावे कसे याचेही प्रासंगिक भान आपल्याला असणे आवश्यक आहे. आपण कविता लिहितो म्हणजे माणसाच्या जगण्यायोग्य जगण्याचा तो शोध असतो. हा शोध कवीच्या बापाला लागला आणि ही संविधान संहिता त्यांनी बाप या शिर्षकाखाली एकूण तेरा कवितेंतून मांडली आहे, ते पहिल्याच कवितेत लिहितात…

पोरा,
रागानं इस्तू इजंना
अन् अभ्यासानं माणूस झिजंना
अभ्यास करुन करून थकलास
अन पाट दुखालीय म्हणून
कंबरंमधून वाकलास
तर आरबाळून जाऊ नको
नुसतं बाबासाहेबाकडं बघ!

नुसतं बाबासाहेबाकडं बघ ही काही दिसते तितकी साधी शिकवण नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारधारेला आदर्शवत मानून समाजाने जी प्रगती साधली ती क्रांती जगाच्या इतिहासात तोड नसलेली अशीच आहे. जग हे अनित्य आहे तरीसुद्धा धम्मक्रांतीने इथल्या हक्कवंचितांना जो उजेड दिला आहे, तो चिरकाल आहे.‌पृष्ठ क्रमांक १० वरील कविता काहीएक आशय मांडून ठेवते-

‘फुलात अनित्यता
दीपात प्रज्ञा
धूपात शील
हीच बुद्धाची शिकवण
आणि
जगणं अन् जगविणं
पुस्तकात हाय
ही बाबासाहेबांची शिकवण!’

ही शिकवण शिकत असताना बापानं बाबासाहेबांच्या माध्यमातून खूप काही शिकवलं. कितीही आनंद झाला तर हुरळून जायचं नाही आणि कितीही आनंद झाला तरी होरपळून घ्यायचं नाही. सुखदुःखात जो स्थिर असतो तोच खरा प्रज्ञावंत असतो अशी वाघमारे यांची कविता एके ठिकाणी सांगून जाते. बुद्धाची आणि बाबासाहेबांची शिकवण पुरस्कृत करीत असतांनाच क्रांतिबा फुल्यांच्या बाबतीत एक आगळावेगळा निर्धार कवी व्यक्त करतो. आमची कविता कधीही पुरस्कारप्राप्त नसते तर ती महापुरुषांनाच पुरस्कृत करीत असते. कवी एका कवितेत एल्गार पुकारतो तो असा-

विद्येविना मती गेली, ही महात्म्याची शिकवण हाय
आता कोणताबी एकलव्य अंगठा कापून देणार नाय!

अगदी साध्या सरळ ओळी असल्यातरी त्या प्रस्थापितांना झोंबणाऱ्याच आहेत. याच कवितेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सादर करण्यात येऊ नये अशी बंदी घालण्यात येते तेव्हा या आधी उल्लेख केल्याप्रमाणे अख्खं मराठी वाङमयच आपली जहागिरी आहे अशा आविर्भावात वागणाऱ्या बांडगुळांची इथे आठवण होते. ते जेव्हा नकार देतात तेव्हा आम्ही त्यांचा नकार जशास तसा स्विकारतो. तो नकार विद्रोह म्हणून भरुन घेतो. कोणत्याही परिस्थितीत हा नकार होकारात परावर्तीत केला जात नसतो. म्हणूनच कविता कोरतांना जरी प्रस्थापितांच्या पट्टीत नसली तरीही ती पट्टीची असल्याने तिचा इथे दणदणीत विजय होतो. कवी अनुरत्न‌ वाघमारेंच्या कवितेचा वैचारिक विजय आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निषेध यानिमित्ताने मी इथे नोंदवून ठेवतो.

या परिवर्तनाच्या प्रवाहात अनुरत्न वाघमारे हे कवी ऐन्यामागचे हात कलम करुन सामील झालेले जुनेच कवी आहेत. त्यामुळे त्यांची कविता मानवतावादीच आहे आणि बुद्धाकडेच प्रवासत चालली आहे. त्यामुळे ती विज्ञानवादी आहे किंवा विवेकवादी आहे असे म्हणून चालणार नाही. २५ व २६ डिसेंबर रोजी सह्याद्री साहित्य कला आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने अखिल भारतीय कविता महोत्सव आॅनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता. त्याचे अध्यक्ष होते कवी, अनुवादक गणेश विसपुते. या ठिकाणी त्यांची आठवण होते. ते म्हणाले होते की, कविता समाजाला बदलू शकत‌ नाही परंतु कविता व्यक्तीला संवेदनशील बनवू शकते. हे विसपुत्यांचे विधान वाघमारे यांची कविता खोडून काढते.‌ माणसाकडून एक नवा क्रांतिकारी बदल कवितेला अपेक्षित असतो. ज्याची कविता हे आव्हान पेलू शकत नाही, ती कविता नसते तर ते केवळ बालमनोरंजन असते. आंबेडकरी कविता उघड आव्हान देत असते. जेव्हा आपापल्या रंगाचा झे़ंडा खांद्यावर घेऊन जेव्हा ही रंगाळलेली माणसं गोरगरिबांची शोषितांची घरे पेटवतात; मुडदे पाडतात तेव्हा कवीचा बाप खवताळून उठतो,

‘ अन् माणसाळलेल्या
माणसांच्या औलादीत
बुद्धं बीजं शोधतो
मव्हा बाप इथं….!

त्याचबरोबर कवी सांगतो की कविता लिहिण्याला इतिहासाची नवी वळणं असतात. उष:कालाच्या हाका असतात.‌ काव्यजीवनाला माणूसपणाच्या चांदण्याचे घोष लगडलेले असतात. असा कवी हा अंधाराला सूर्य शिकवणारा शब्द लिहित असतो. म्हणूनच एका मित्राशी हितगुज करतांना कवी म्हणतो की, एकदा माणूस होऊन बघ. कारण माणूस बनून जगण्याची संधी कधीही कुणी हिरावून घेऊ शकत नाही. किती साधं सोपं तत्वज्ञान कवीनं मांडलंय… पण हे मांडत असतांना कवी काळजालाच हात घालतो-

‘ खरं सांगू
आजवर तू भिरकावलेले
ते सारे दगड
आता माझ्याजवळ
जमा आहेत…’

कोणत्याही साहित्यिकाच्या संवेदना, भावना विचार आणि भूमिका यांच्यात परस्परपूरक नातेसंबंधांचा आदिबंध निर्माण झालेला असतो. तो एकेकाळी सूर्यावरही आपला शब्द कोरतो. त्याची अंतिम भूमिका ही जगण्याचा अंतिम शब्दच असतो. त्यामुळे कवी अनुरत्न वाघमारे आपली भूमिका निश्चित करण्यात यशस्वी ठरले आहेत. एकूण सहा पुस्तकानंतर ते सातवं पुस्तक घेऊन ते आता दाखल झालेले आहेत. त्यांना काळजाचे रुपांतर मेंदूमध्ये आणि मेंदूचे रुपांतर काळजामध्ये करण्याची किमया त्यांना आता लीलया साधली गेली आहे. अनेक कविसंमेलनातून ते जेव्हा स्वतःच्याच कविता सूत्रसंचालनाच्यावेळी उद्धरत नेतात तेव्हा या प्रक्रियेची हेतुपुरस्सर जाणीव होते. भाषेच्या दृष्टीने विचार केला तर अनेक मराठवाडी शब्द जसे पास्तोर, सिंगार, डोस्क्यामधी, ग्यान, हाया, येगळीच, उंबरदोड्या, चिरोटीचं, व्हता, खंडीभर, तवा, मव्हा, असे काही बोलीभाषेचे सौंदर्य वाढविणारे शब्द सुद्धा विविध कवितांमधून आले आहेत. ‘तोंड नाही ह्या चिऱ्याला’ हा शब्दप्रयोग ग्रामजीवनातील हिडीसफिडीसपणाचा अर्थवाही वाक्यांश स्पष्ट करतो. घरबांधकामातील शब्दं पिचरं, टाक्या, शेवटणे, कोनाळी, वळंबा, पारापट्टी, लेवलपाईप, चौकटीचा कोस असे शब्द कवितेचे सौंदर्य अधिकच खुलवतात.

कवितासंग्रहातील अनेक कविता विचारप्रवण आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डॉ. आनंद इंजेगावकरांनी उल्लेख केलेली कविता ही वाघमारे म्हणतात त्याप्रमाणे ती लयबद्ध असली तरी चिंतनशीलच आहे. माझी बात, माझी जात, दिव्याची वात- बाबासाहेब. माझी छाती, माझी नाती, जीवनसाथी – बाबासाहेब. बाबासाहेबांविषयी अपार श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. बाबासाहेबांवरच्या आठ कवितांबरोबरच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्यावरही आणि संत गाडगेबाबा, छ. शिवाजी महाराज, माता रमाई, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्याविषयीची कृतज्ञताभाव व्यक्त करणाऱ्या कविता इतरत्र आलेल्या आहेत. कवीने कवितांचे काही विभाग केले आहेत. माय : चार कविता, बाप तेरा कविता, बायको : चार कविता, पाऊस : दोन कविता, कविता तवाच्या(सहा), चितपट (सहा), अनित्यता (दोन), सदिच्छा (सात) असे काहीतरी विभागून पुस्तकाची खिचडी झालेली आहे. एवढेच नव्हे तर नातेसंबंधांशी संबंधित व्यक्तीचरित्र गुणगान करणाऱ्या कविता कवितासंग्रहात आहेत. या कविता नको होत्या हे प्रकाशन समारंभात प्रा. डॉ. जे. टी. जाधव यांनी सुचविले होतेच. या व्यक्ती केवळ कवीशी संबंधित असतात. कधीकधी त्या कवितेतच फार अतिशयोक्तीपणाने हवा भरून फुगलेल्या दिसतात. यांशी फक्त कवीचेच सहसंबंध किंवा भावनाबंधं आढळून येतात. सामाजिकतेचा किंवा वैचारिक प्रगल्भतेचा प्रवाह मेंदूत उगवता ठेवून कविता वाचणाऱ्या वाचकाचा इथे खरा भ्रमनिरास होतो. का. दीपक सपकाळे आणि शिवशंकर बलखंडे यांच्या आठवणींना समर्पित केल्याच्या भावनेशी ते लागू पडत नसले तरी संतोष धोंगडे यांनी तयार केलेले मुखपृष्ठ हे अत्यंत सैद्धांतिक अशा स्वरुपाचे दिसते. इतकेच नाही तर त्या शीर्षकाची कविता कवितासंग्रहात नाही हे इतर पुस्तकांप्रमाणेच एक वैशिष्ट्यच आहे.

कवी अनुरत्न वाघमारे यांनी सदरील कवितासंग्रह आयुष्याच्या खळ्यावरुन सावडून घेतलेलं असलं तरी हे मातरं धुवूनच घेतलेलं आहे. ते बुद्धाच्या ज्ञानगंगेतून धुवून घेतलेलं आहे. कारण हा कुरुपता नष्ट करणारा कार्यक्रम आहे. सौंदर्याचे संविधान माणसाच्या डोक्यात पेरणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला संकटांसमोर वाकणं मान्य नाही. पारतंत्र्यासमोर झुकणं मान्य नाही. गुलाम झालेल्या प्रतिभांना प्रतिभा स्वातंत्र्याचा सिद्धांत शिकविला पाहिजे. एकदा त्या गुलाम झाल्या की त्या स्थितीवादी होतात. त्या विचार करु शकत नाहीत. त्या विद्रोह पुकारु शकत नाहीत. त्या उठाव करु शकत नाहीत.‌ त्या व्यवस्थेने घालून दिलेला जोहार जशास तसा स्विकारतात. त्यामुळे लेखकांच्या, विचारवंतांच्या एकूणच
साहित्यिकांच्या प्रतिभा ह्या मूक्तच असल्या पाहिजेत. त्या एखाद्या व्यक्तीच्या, ऐहिक आशयाच्या, तपशीलाच्या, खोटेपणाच्या, मूलतत्ववादाच्या, स्थितिवादाच्या गुलाम असता कामा नयेत. जो साहित्यिक शोषणाच्या, दमनाच्या, दडपशाहीच्या, गुलामीच्या, लाचारीच्या विरोधात लिहितो किंवा अशा सत्ताकेंद्रांच्या विरोधात लिहितो तो पुरस्कारप्राप्त सिद्ध होत नाही. वाघमारे असे साहित्यिक कदापिही नव्हते आणि नाहीत. विरोध आणि विद्रोहाला कधी पुरस्कार मिळेल की नाही याची शाश्वती नसते.

पुरस्कारप्रवण प्रतिभा ह्या गंजलेल्या लोखंडासारख्या असतात. ‘फेसाटी’कार नवनाथ गोरे या लेखकाची कीव येते. दोन अडीच वर्षांपूर्वी त्यांच्या फेसाटी या कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार, मान सन्मान त्यांनी मोठ्या आनंदानं स्विकारला. पण पुढे काय? जेव्हा जगण्याची कुतरओढ सुरू झाली तेव्हा त्यांचे मत बदलले. त्यांना हे लेखन कुचकामी वाटू लागले. हीच अवस्था ‘झुलवा’कार उत्तम बंडू तुपे या सशक्त लेखकाची. अखेर मरणानंच त्यांची सुटका केली. पुण्यातल्या झोपडपट्टीत त्यांना मरण आलं! या अशा लेखकांना प्रश्न विचारला पाहिजे की, तुम्ही कशासाठी लिहिता? तुमच्या प्रतिभेची गुणवत्ता काय? खऱ्या साहित्यिकाची प्रतिभा निखळ पौर्णिमेसारखी असते. स्पष्ट आणि स्वच्छ असते. तिला कुठलाही कलंक सहन होत नाही. निखळ पौर्णिमेचा उजेड अंगणात यावा यासाठी निर्मिलेलं संग्राम साहित्य या अशा कार्यक्रमातूनच जन्माला येतं. ते झुंजण्याचं साहित्य असतं. ते जगण्याच्या संघर्षाचं साहित्य असतं. आपल्या संस्कृतीचं संग्राम साहित्य हे बाबासाहेब आंबेडकरांच्या बोटाच्या दिशेने वाटचाल करीत असतं, हे आजच्या प्रतिभांनी डोक्यात घेतलं पाहिजे. आपल्या साहित्याची हीच दिशा असली पाहिजे, हे ठामपणे ठरवलं पाहिजे. कवीने दीक्षा देणारा माझा बाप आणि दीक्षा घेणाराही माझाच बाप ही सुत्रबद्धता आपल्या कवितांच्या संदर्भाने पुढील काळातही जपली पाहिजे. एवढेच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद!

– समीक्षक : गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.

——————————————————————————

कवितासंग्रहाचे नांव – धुतलेलं मातरं
कवी – अनुरत्न वाघमारे, नांदेड.
प्रथम आवृत्ती – २०१९
प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड.
किंमत : ₹८० फक्त.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *