ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मोदींजींच्या व्यक्तिमत्वाचं एका महिलेनं केलेलं अवलोकन

April 17, 202215:11 PM 32 0 0

सौ. अरुंधती प्रवीण दीक्षित-वाकडे यांचे शब्दबद्ध सुहृदहो,
महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा पूर लोटला. ज्यांना त्यांचा फोन नंबर वा मेलचा पत्ता माहित नव्हता त्यांनी माझ्याकडे हा शुभेच्छांचा ओघ वळवला. सरकारी अधिकारी खुर्चीवरून उतरला की तो विस्मृतीच्या टोपलीत नकळत सरकवला जातो. त्यातल्या त्यात पोलीस अधिकारी तर नक्कीच. पण तसे झाले नाही. अनेक सुंदर सुंदर कविता लोकांनी आपणहून करून पाठविल्या; कोणी श्लोक, कोणी सुंदर पत्रे लिहीली. कोणी त्यांच्या आठवणी, कोणी फोटो. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांनी दिवस सुंदर झाला. अनपेक्षित आलेला एक शुभेच्छा संदेश खूप खूप मोहरवून गेला. मोहवून गेला.
तो संदेश होता पंतप्रधान नरेद्र मोदीजींकडून आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा.
त्यांच्या अक्षरात, त्यांच्या सहीचा. डाव्या बाजूला अमृतसरच्या सुवर्णमंदिराची प्रतिमा तर उजवीकडे मोदीजींचा फोटो आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश! परत परत पाहतांना किती आनंद झाला म्हणून सांगू? एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात प्रत्येक माणसाशी असं संगणकाच्या सहाय्याने का होईना आपलेपणा निर्माण करणे ही किती मोठी गोष्ट. आत्तापर्यंत आम्हाला इतक्या आपुलकीची सवयच नव्हती. आत्तापर्यंत पंतप्रधान कधी जवळचे वाटलेच नव्हते. लोकांमधून आलेले, भारताच्या मातीतून उभे राहिलेले. लोकांचेच वाटणारे हे पंतप्रधान फक्त नरेंद्र मोदीच!
काही वर्षांपूर्वी त्यांनी गुजरातच्या कच्छ भागतील छोटा रण येथे टेंट सिटी मधे भारतातील सर्व राज्यांच्या पोलीस प्रमुखांची कॉन्फरन्स घेतली होती. तेथे त्यांनी सर्व प्रमुखांच्या पत्नींनांही आवर्जून निमंत्रित केले होते. ते न विसरणारे तीन दिवस मला आठवले. पंतप्रधान एखाद्या घरातील मुख्यासारखे आमच्याशी वागत होते. किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत होते. अत्यंत शिस्तीत वागायला लावून आमचा पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत वेळ आम्हाला वाया घालवू देत नव्हते.
ते कच्छचे रण पार वेगळेच होते. सर्वत्र मिठाची जमीन तयार झाली होती. हिवाळ्यात अत्यंत कडाक्याच्या थंडीत हिमालयात नद्यांवर जसं बर्फ जमून त्याचा पक्का रस्ता तयार होतो तसे येथे समुद्राच्या पाण्यावर मिठाचे बर्फीसारखे घट्ट थर तयार होतात. त्यावरून चालता येते. आमच्यापैकी कोणी त्यावरून पुढे चालत जायला लागल्यावर स्वतः पंतप्रधान हाका मारून मागे बोलवत. “तेथे पुढे जाऊ नका. मिठाचा थर जर पक्का नसेल तर समुद्रात पडाल.’’ म्हणून मोठ्या काळजीने सांगत.
एकदा सर्व स्त्रीवर्गाने आम्हाला पंतप्रधानांना भेटायचं आहे असा हट्टच धरल्यावर ते सहज तयार झाले. वेळात वेळ काढून आम्हाला १५ मिनिटे भेटले. आम्हालाच त्यांच्याबरोबर काय बोलावं हे सुचेना. “कसं वाटलं तुम्हाला कच्छचं रण? पूर्वी कधी येथे आला होता का?’’ तेथील घरं कशी विशेष बनवली आहेत; ती कुठल्याही भूकंपाला तोंड देऊ शकतात; तेथल्या रणात राहणा-या महिला हाताने उचलताही येणार नाहीत असे नखापेक्षाही अगदी छोटे छोटे आरसे वापरून कस भरतकाम करतात? तेथे एरंड आणि बाभळीशिवाय काहीच उगवत नाही. त्यामुळे ह्या स्त्रियाच्याही भरतकामात बाभळीच्या काट्यांची नक्षी ही असतेच ती बघायला विसरू नका? तेथे एक मुसलमान कारागीर एरंडाच्या तेलात बाभळीचा काटा बुडवून सुंदर चित्र काढतो ती नक्की बघा. ….. एक ना दोन, किती माहिती त्या थोड्या वेळात आम्हाला मिळाली. तेथे राहणारा जणु प्रत्येक माणूस त्यांच्या माहितीचा होता. नंतर कळले की खरोखरच मोदीजी ह्या सामान्य माणसांच्या घरी अनेकवेळा राहून गेले आहेत. अत्यंत कामात असलेला हा देशप्रमुख तडफेने काम करतांना, तळमळीने बोलतांना, आपणहून आम्ही काय बघावं? ही माहिती देतांना पाहून धन्य वाटलं होतं.
आम्ही गेलो होतो तेव्हा पौर्णिमेच्या जवळपासचे दिवस होते. प्रत्येक ऑफिसरच्या कामाचा अत्यंत कडकपणे लेखाजोखा मागणा-या ह्या अत्यंत शिस्तप्रिय देशाच्या मुख्याने सहजपणे प्रवीणला विचारलं, तुम्ही चंद्राच्या प्रकाशात रात्री हे रण किती सुंदर दिसते हे पाहिलं का? नसेल तर रात्री पत्नीला बरोबर घेऊन दोघेजण पाहून या. मुद्दाम आम्ही दोघेही त्या शांत रात्री चंद्रप्रकाशात उजळून निघालेलं ते लवणधवल रण पाहून स्तिमित झालो. परत येत असतांना जेथे एक झुडुपही उगवायचा संभव नाही, जेथे प्यायला पाणी मिळणेही अवघड अशा जागी बीएसएफ च्या जवानांचा तंबू पाहून प्रवीणने त्यांची चौकशी केली. अशा भयाण एकाकी जागी भारताच्या सीमेची राखण करत महिनोन्महिने राहणा-या त्या जवानांना पाहून मनात एक विचार आला….. आपल्याला पंतप्रधानांनी नक्की कशासाठी पाठवलं असावं? निसर्ग शोभा बघायला का आमच्याच पोलीस जवानांचा दिनक्रम किती कठीण असतो हे जाणवून द्यायला? येताना आमच्या बृहद्परिवाराच्या आठवणी मनात कोरल्या गेल्या. पंतप्रधान मोदीजींनी सहजपणे आमचे पाय जमिनीवर ठेवले.
त्या तीन दिवसात आम्ही त्यांचे प्रत्येक भाषणं ऐकण्यासाठी तळमळत होतो. ‘कल्पनांचा, नवनवीन विचारांचा अखंड धबधबा’ असे त्यांचं भाषण म्हणजे पोलीसांनी समाजाभिमुख व्हावं म्हणून किती बारीक बारीक सुंदर सुचना असत. फक्त अधिका-यांसाठी असलेली त्यांची काही भाषणे आम्ही बंद दाराच्या बाहेर उभं राहून ऐकत असू. मोदीजींच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आपणहून दरवाजे उघडून आम्हाला आत बसून त्यांचे भाषण ऐकण्याची परवानगी दिली.
आपापल्या विभागात राहणा-या गुणवंत विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधे बोलवून एक फूल देऊन त्यांचा सत्कार करा. आपल्या विभागात सैन्याचे शहीद झालेले जे वीर असतील त्यांच्या हौतात्म्यदिनी ते ज्या शाळेत शिकले असतील त्या शाळांमधे एक कार्यक्रम करून त्यांच्या बलिदानाची माहिती देणा-या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगायला सांगा. किती किती सांगू?
प्रवीणची पोस्टिंग मॉरिशसला असतांना तेथील एका गोष्टीचे आम्हाला कायम अप्रूप वाटे. तेथे खूप लोक दीर्घायुषी होते. ज्यांना १०० वर्षे पूर्ण होत त्यांच्या घरी पंतप्रधान स्वतः जाऊन त्या वयोवृद्धाचा सत्कार करीत. त्यावेळेला वाटे की असं काहीतरी भारतात असावं. आज वाटलं, शंभराव्या वर्षी त्या वृद्ध व्यक्तीला त्या सत्काराची जाणीव तरी होत असेल का नाही कोण जाणे? त्यापेक्षा ऐन उमेदीत असतांना पंतप्रधानांकडून अशा शुभेच्छा आल्या तर त्याचा जास्त आनंद वाटू शकतो. आणि आपण तो आपल्या मित्र आणि नातेवाईकांसमवेत साजरा करू शकतो. पंतप्रधानांनी ह्या शुभेच्छा ट्विट करा, शेअर करा, पाठवा, व्हॉटसॅप करा असे अनेक पर्याय देऊन सर्वांना टेकसॅव्ही करून टाकलं आहे.
सुनील शिरपुरे(शब्दस्पर्शी)
कमळवेल्ली, यवतमाळ
भ्रमणधवनी-7057185479

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *