लोणावळा येथे बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणीचा लोणावळ्याच्या तुंगार्लि धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ध्वनी मनीष ठक्कर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्यासह चार तरुणी लोणावळ्यात आल्या होत्या. चौघींपैकी तीन बहिणी होत्या अशी माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा येथे ध्वनी ही तिच्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आली होती. तिच्यासह तीन बहिणी आणि इतर एक मैत्रीण होती. दरम्यान, हे सर्वजण लोणावळ्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना नव्हती असे लोणावळा पोलिसांनी सांगितले आहे. त्या मुंबईमधील पवई येथील असल्याचं सांगण्यात येत आहे.
लोणावळा येथे ध्वनीसोबत तिच्या तीन बहीणी आणि एक मैत्रीण होती. लोणावळा शहरात भटकंती केल्यानंतर त्या तुंगार्ली धरणाकडे वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या. धरणाजवळ ध्वनीने बहिणीचा वाढदिवस साजरा केला अन धरणाच्या पाण्यात सर्व तरुणी उतरल्या. दरम्यान, काही मिनिटे पाण्यात घालवल्यानंतर अचानक ध्वनीला पाण्याचा अंदाज आला नाही. ती बुडायला लागली. ध्वनीला वाचवण्याचा तिच्या बहिणीने प्रयत्न केला. पण, ध्वनीला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाली. त्यानंतर इतर बहिणींनी आरडाओरडा केल्याने तेथील काही तरुण तिला वाचवण्यासाठी पुढे आले. त्यांनी ध्वनीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. ध्वनीच्या नाका तोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Leave a Reply