ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वृध्दत्व : एक संपलेले अस्तित्व

January 19, 202212:33 PM 83 0 0

मनुष्य जीवन ही एक ईश्वरी देणगी आहे. या जीवसृष्टीतील इतर सजीवांपेक्षा परमेश्वराने मानव जातीला अधिक बुद्धिमान बनवले आहे . मानवी जीवन हे तीन अवस्थांमध्ये विभागले आहे ते म्हणजे बालपण तरुणपण आणि सर्वात शेवटची अवस्था म्हातारपण म्हणजेच वार्धक्य होय .
बालपण ही जीवनातील पहिली अवस्था खूप मजेदार अन मनमुराद आनंद लुटणारी.
आनंदाने ओतप्रोत भरलेल्या या अवस्थेत ना कोणती चिंता की ना कोणतेही टेन्शन. हि अवस्था प्रत्येक व्यक्तीस एकदाच मिळते. आणि म्हणून तर हे बालपण हवेहवेसे वाटणारे असते. “लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.”
जीवनातील दुसरी आणि आयुष्याची माध्यान अवस्था म्हणजे तरुणपण. तरुण म्हणजे लहरीपणा, बेछुटपणा आणि तेवढ्याचच जबाबदारीच्या बेड्याही असतात पायात बांधलेल्या. जीवनात काहीतरी करून दाखवण्याचा, स्वावलंबी बनण्यासाठी अनेक आव्हाने पेलण्यासाठीचा काळ, आणि हे मिळालेले तारुण्य कधीही संपू नये असेच प्रत्येकास वाटत असतं.

 

 

मानवाची सर्वात महत्त्वाची आयुष्याची सांज वेळ म्हणजे म्हातारपण माणूस एकदा वृद्ध झाला म्हणजे मरेपर्यंतची अवस्था, शेवटची अवस्था आहे वार्धक्य. खरंतर वृद्धपणा म्हणजे परिपक्वता अर्थात विचारांची, अनुभवांची खूप मोठी शिदोरी असते म्हाताऱ्या माणसां जवळ पण हीच शिदोरी शरीर यंत्रणा थकल्यामुळे दिवसेंदिवस पेलवत नाही जड होते. जसजसं वय वाढतं तसं शरीर थकत जातात सुखाची जणू ओहटीच सुरू होते. वृद्धत्व हे कुणालाही नको असतं. प्रौढत्व संपून व्यक्ती जेव्हा वृद्धत्वाकडे झकू लागते तेव्हा हीच अवस्था तिला नको असते. कोणी आपल्याला म्हातारा म्हणू नये याची ती काळजी घेत असते. थकले तरी मन तरुण आहे तरुणा सारखाच उत्साह आहे असं ती व्यक्ती सिद्ध करून दाखवत असते.
एकीकडे खूप जगायची इच्छा असते त्यामुळे या म्हातारपणाचा तो तिरस्कार करू लागतो .कारण वृद्धापकाळामुळे शरीरातील शक्ती, उमेद कमी होत असते नव्या गोष्टी न स्वीकारता जुन्या गोष्टींचा आग्रह ती करीत असते. असं म्हणतात “विशी मध्ये माणूस काळाच्या पुढे धावत असतो, चाळिशीत काळाच्या बरोबर तर पन्नाशीत काळाच्या मागे पडतो.
शरीराला येणारा वृद्धपणा मनाने स्वीकारायला शिकायला पाहिजे. जीवनभराच्या आयुष्याने आपल्याला अनुभवांचा ठेवा दिलेला आहे ,त्याचा शांतपणे विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. कारण हे धन पुढील पिढीला आपण देऊ शकतो .पण त्यांच्या कलाकलाने त्यांच्या मनात विश्वासाचे, आपुलकीचे, वडीलधारे नाते निर्माण करणे जमायला हवे.
खर तर हीच गोष्ट कठीण आहे. वृद्धांना त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळालेल्या नसतात, आणि ते सुख त्यांच्या पुढील पिढीस मिळालेले असते हे पाहून त्यांच्या मनात चीड निर्माण होते. तरुणांनी केलेल्या चुका ,धोके सांगावेसे वाटतात पण या तरुण पिढीला त्यांच्या अनुभवाचे बोल रुचत नाहीत.
राजाच्या नंतर राजपुत्र गादीवर बसणे हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे घरातील या कर्त्या पुरुषाचे स्थान तरुण पिढी कडे जाणे हे स्वाभाविकच आहे. त्यामुळे तरुण पिढी च्या कर्तुत्वास वाव मिळत असतो परंतु वृध्दांना वाटत असतं आपले कर्ते पणाचे स्थान गेल्याने आपल्या शब्दांला कुटुंबात किंमत राहिलेली नाही, आपल्याला मान नाही, आर्थिक दृष्टीने आपण दुबळे आहोत ही जाणीव या वयात त्यांना त्रास देत असते . कुटुंबातील आपले महत्त्वाचे पद आपल्याला असलेला मान आता वृद्ध झाल्यामुळे मिळेनासा झाला आहे. या गोष्टीचे त्यांना दुःख होत असते.
त्याचबरोबर एकटेपणा एकाकीपणा ची पोकळी दिवसेंदिवस मनात वाढू लागते आपल्या हातून आयुष्य निसटु पाहत आहे आणि ते पकडून ठेवण्याची धडपड ते करीत असतात ठराविक अवस्थेनंतर आपल्या अधिकार पुढच्या पिढीच्या हातात सोपविणे, घरातील गोष्टींमध्ये फारसे लक्ष न देणे ,मुला-मुलींनी सल्ला विचारला तर सर्वांना सांभाळून घेणारा सल्ला देणे ,आपल्या शरीरात शारीरिक किंवा मानसिक गरजा कुरवाळीत बसण्यापेक्षा मुलांच्या समस्या समजून घेणे, त्यांना सावरणे, मदत करणे अशी समतोल वृत्ती वृद्धांनी ठेवली पाहिजे. आपल्याला इतरांनी काय दिले यापेक्षा आपण आयुष्यभर इतरांना काय देऊ शकतो ही वृत्ती जोपासायला पाहिजे. तरच या म्हातारपणी च्या “संध्याछाया भिवविती हृदया” ही भीती कमी होईल.
लहानपण जसे कुणावर तरी अवलंबून असते ती स्थिती वृद्धपणा ची झालेली असते पण पुढे-पुढे धावणाऱ्या तरूणाईला हे समजत नाही त्यांना योग्य तो मान देऊन आदर देऊन वागले तर त्यांच्या अनुभवाचा फायदा तरुण पिढीला होऊ शकतो .पण या दोन पिढ्या एकमेकांना समजून घेत नाही. त्यामुळे आज-काल वृद्धपणा च्या समस्या अधिक त्रासदायक होत आहेत.
तरुणपणाच्या अनेक समस्यांमुळे वृद्धपणा ची कदर होत नाही त्या म्हणजे छोटी जागा, अपुऱ्या सोयी-सुविधा आर्थिक चणचण यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांमधून वृद्धांसाठी वृद्धाश्रमाची सोय पाहिली जाते. वृद्धाना मग वाटतं आपले कोणीच नाही मुले-नातवंडे सुना, लेकी यांच्या सहवासात राहण्याच्या दिवसात वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागत आहे .अशी खंत वाटत असते .म्हणून वृद्धाश्रमातील जीवन घरातील माणसांची कटुता वाढायला कारणीभूत होते .मुलांच्या हातात आपले आर्थिक मिळकत सोपवताना आपली भविष्यकालीन तरतूद करून ठेवण्याचा विचारीपणा दाखवायला पाहिजे.
वृद्धपणाच्या समस्या पूर्वीही होत्या पण आजच्या इतक्या उग्र नव्हत्या कारण एकत्र कुटुंब पद्धती एकाच घरात सख्खे चुलत धरून पन्नास-साठ माणसे राहत असत. जुन्या काळातील कुटुंबे म्हणजे जणू काही छोट्याशी संस्थानेच होती. घरातील कारभारावर आजी आजोबा आत्या काका यांचे नियंत्रण असे कुणालाही एकटेपणा जाणवत नसे.
बालपण, तरुणपण ,प्रौढत्व , व वृद्धत्व चारही अवस्था जशा शरीराच्या ठेवणी मध्ये बदल होत असतो, विकास होत असतो तसेच मनाच्या ठेवणी मध्येही विकास होणे गरजेचे आहे. वार्धक्य हे चेहऱ्यावरील रेषेवरून समजतं की या व्यक्तीचे आयुष्य समृद्धीत गेले की मनस्तापाच्या वाळवंटात गेली .ज्याचं त्याचं त्यालाच नको असतं तर मग पुढची पिढी तरी ते ओझ कसं बाळगणार ? वार्धक्य आणि व्याधी हातात हात घालून येतात. आणि अशावेळी विचारणारा कोणी नसेल तर अश्रूंच्या घाटावर जगावं लागतं.
वृद्धपणा ही समस्या आहे की, स्वतःकडे स्वतःचे छंद समृद्धीकडे लक्ष देत आनंद घेण्याचा काळ आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. खूप जगावे असे प्रत्येकास वाटते वृद्धपणा कुणालाच नको असतो. कारण शारीरिक दृष्टीने कमजोर, दुबळे व परावलंबित्व होय. पुढच्या पिढी सोबत मैत्री, जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेतून सामाजिक कार्यात सहभाग घेणे, एकाकीपणा टाळण्यासाठी उद्योग धंदा , छंदात गुंतवून घेणे ,आहार-विहारात नियमितता ठेवून प्रकृतीची काळजी घ्यायला स्वतः शिकावे स्वतःची दिनचर्या स्वतः ठरवून जगण्याची सवय लावावी.
खरच बालपण म्हणजे उगवता सूर्य प्रकाश देण्यासाठी .. म्हातारपण बुडता सूर्य प्रकाश देऊन मिटण्यासाठी….
जगण्याला किंमत नाही… मरायला हिम्मत नाही …
ओढायचे हेआयुष्याचे ओझे.. सरणावर टेकण्यासाठी माथा…..

तृप्ती भोईर
उरण रायगड

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *