ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उन्हाळी सोयाबीन पिकाची कृषी अधिकाऱ्यांकडून पहाणी करुन उपस्थित शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

March 23, 202214:40 PM 39 0 0

सातारा हिरकणी(विदया निकाळजे): फलटण तालुक्यातील शिंदेवाडी, खुंटे,जिंती, कांबळेश्वर येथील गावांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांन भेट देऊन उन्हाळी सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन पिकाची पहाणी करुन शेतकऱ्यांना बांधावरच मार्गदर्शन केले. या प्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी,भास्कर कोळेकर,तालुका कृषी अधिकारी, फलटण सागर डांगे आणि कृषी महाविद्यालय फलटण येथील स.प्राध्यापक प्रल्हाद भोसले मंडळ कृषी अधिकारी सतीश निंबाळकर,कृषि पर्यवेक्षक रविंद्र बेलदार,कृषि सहाय्यक योगेश भोंगळे,देवराव मदने,नितीन शिंदे,तृप्ती शिंदे आणि परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी उपस्थित होते
सोयाबीन हे महत्वाचे व प्रमुख गळीत धान्य पीक असून सातारा जिल्ह्यासह राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील २७ जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीकाची लागवड होते. गळीत धान्य पीकाच्या एकून ८५% क्षेत्र सोयाबीन पीकाखाली आहे. फलटण तालुक्यातील चित्र पहाता सोयाबीन पिकाला मिळणारा बाजार भाव, बाजरी तसेच इतर कडधान्य पिकाला पर्याय म्हणूण फलटण तालुक्यात सोयाबीन पिका खालील क्षेत्रात मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. खरीप हंगामातील साधारण १ हजार २२१ हेक्टर सोयाबीन बरोबरच उन्हाळी सोयाबीन लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. सध्याचे फलटण तालुक्यातील उन्हाळी सोयाबीन चे क्षेत्र ३७६ हेक्टर वर गेले आहे. या मागे प्रमुख कारण म्हणजे सोयाबीनला मिळणारा हमीभाव, पाण्याची उपलब्धता,कमी कालावधीत मिळणारे अधिकचे उत्पन्न, ऊस पिकामध्ये आंतरपीक लागवड, सुधारीत वाण असल्याने शेतकऱ्यांना स्वतः कडील बियाणे वापरण्यास वाव. तसेच इतर शेतकर्यांकडून खरीप हंगामासाठी बियाण्याची वाढती मागणी,यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी सोयाबीन लागवडी कडे वळाल्याचे चित्र दिसून येते.
किडींची ओळख व लक्षणे :- खोडमाशी:- सोयाबीन उगवन झाल्यापासून कधीही या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.खोड माशीचा प्रादुर्भाव पीक लहान असतानाच सहजपणे ओळखता येतो या कीडीच्या प्रौढ माझ्या चकचकीत काळ्या रंगाच्या असतात. सोयाबीनचे रोप लहान असताना 15 ते 20 दिवसांच्या आसपास जर झाडाचा शेंडा सुकून खाली झुकलेला आढळल्यास त्या झाडावर खोडमाशीचा प्रादुर्भाव झाला असण्याची शक्यता असते.अशा रोपांचा शेंडा आपल्या आतमध्ये लहान पिवळी जमिनीच्या बाजूने डोके असलेली खालच्या दिशेने खोड पोखरत जात असलेली दिसते. रोप मोठे झाल्यावर या किडीचा प्रादुर्भाव सहजासहजी लक्षात येत नाही.शेवटी फक्त प्रौढ माशी निघून गेलेले छिद्र खोडावर दिसून येते.
चक्री भुंगा :- सोयाबीनचे पीक वीस ते पंचवीस दिवसाचे झाल्यानंतर सुद्धा ही कीड दिसून येते. प्रमुख लक्षण म्हणजे शेतात फिरताना एखादे पान किंवा फांदी सुकलेले दिसते. पान पण फक्त सुकलेले असेल तर मादी चक्री भुंग्याने नुकतेच अंडे दिलेले असते. पण पान वाळलेले असेल तर काही दिवसांपूर्वी अंडे दिलेले असून काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंड्यांतून अळी बाहेर पडण्याची स्थिती असेल. या किडीचा प्रौढ भुंगा तिखट तपकिरी रंगाचा असतो.त्याचे समोरचे पंख खालच्या बाजूने एक तृतीयांश ते अर्धा भाग काळ्या रंगाचे असतात.अंडी फिकट पिवळसर व लांबट आकाराची असतात.अंड्यातून तीन ते चार दिवसांनी अळी बाहेर पडते.लहान अळी पांढऱ्या रंगाची व पूर्ण वाढ झालेली अळी पिवळी व गोलाकार असते. अंड्यातून अळी बाहेर पडल्यावर ती पानाचे देठ, खोड पोखरत खाली जमिनीकडे जाते. त्यामुळे सोयाबीन सुकून नंतर वाळते. यावेळी प्रल्हाद भोसले सहाय्यक प्राध्यापक कृषि महाविद्यालय,फलटण यांनी खोडमाशी व चक्रि भुंगा (गर्डल बिटल) च्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना शेतकऱ्यांना सांगितल्या.
एकात्मिक व्यवस्थापन :- पेरणीच्या वेळी ट्रायकोडर्मा व जीवाणू संवर्धनाची विजप्रक्रिया करावी. खोडमाशी व चक्री भुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच ५%निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी. हेक्टरी २० ते २५ पक्षी थांबे उभारावे. नत्र युक्त खताचा कमी वापर करावा. बांधावर एरंडीची लागवड करावी. चक्री भुंग्याच्या नियंत्रणा साठी सुकलेल्या फांद्या व पाने देठापासून काढून नष्ट करावी. किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी त्यावरती गेल्यास खालील प्रमाणे उपाय योजना कराव्यात
रासायनिक उपाययोजना :- पेरणी वेळी थायोमेथोक्झाम ३०% एफ.एस.ची १० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करणे महत्वाचे. तसेच बीजप्रक्रिया केली गेली नसल्यास १.थायोमेथॉक्झाम १२.६% + लॅम्डासाहेलोथ्रीन ९.५% संयुक्त किटकनाशक ३ ते ४ मिली १० लीटर पाण्यातून फवारणी. २.क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५%एस.सी. २.५ मिली १० लिटर पाण्यातून फवारणे. ३.थायोक्लोप्रिड २९.७ एस.सी. १५ मिली १० लिटर पाण्यातून फवारणी. ४. प्रोपेनोफॉस (५० ई.सी.) २० मिली १० लिटर पाण्यातून फवारणी. किंवा इमामेक्टीन बेंझोएट ४ ते ५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ५.इमिडाक्लोप्रिड १९. ८%+ बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ % १५ते २० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी तसेच सोयाबीनवरील उंट अळीच्या नियंत्रणासाठी इंडोकझाकार्ब १५.८ ई.सी. ७ मिली १० लिटर पाण्यातून फवारणी करणे इत्यादी उपाययोजना करण्याचे सुचविताना किडींच्या जीवन क्रमाची माहिती दिली. व फवारणीच्या वेळी नॉन आयोनिक स्टीकर आवर्जून मिसळावे असे सांगीतले. किडी चा प्रार्दुभाव वाढण्याच्या कारणावर चर्चा करताना उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर म्हणाले, बदलते हवामान,खरीप हंगामपासून रब्बी आणि उन्हाळी हंगामात झालेली पेरणी,यामुळे किडीचा जीवन क्रमात खंड पडला नाही.किड व्यवस्थापना साठी योग्य त्या किटक नाशकाच्या फवारणीचा अभाव. त्याचप्रमाणे पेरणी वेळी कीटकनाशकाच्या बीजप्रक्रियेचा अभाव. पीक ऊगवणी नंतर पहिल्या तीस दिवसांच्या आत कीटकनाशक फवारणी न घेणे. इत्यादी कारणे असू शकतात. अधिक माहिती साठी कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,मंडल कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सागर डांगे यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *