काल रात्रीच सीमानं नवर्याला सांगितलं की ” आज आईंनी मला परत नोकरी सोड किंवा तुझ्या मुलीची व्यवस्था बघ, यापुढे तिला सांभाळणार्या बाईवर लक्ष ठेवायला मला जमणार नाही,” असं सांगितलंय, मी नोकरी सोडली तर ब्लाॅकच्या हप्त्याचं काय हो? तो म्हणाला की नको काळजी करुस मी बघतो. तो आईच्या खोलीत गेला तर ती तिच्या लेकीशी बोलत होती
” तू काळजी करु नकोस दिदी, मी सीमाला सांगितलंय की तिच्या लेकीची व्यवस्था बघायला, मी आता तुझ्या मुलाला बघेन हो, रोज सोडून जात जा इथे!” तो झटकन आईला म्हणाला, ” आई, इथे फक्त बाईवर लक्ष ठेवायचं, आला गेला लक्ष द्यायचं तर जमत नाही असं सांगितलं आहेस तू,आणि दिदीच्या लेकाला सांभाळणार आहेस, हरकत नाही गं, तिच्याकडे तू जा, सीमाच्या आईला मी इकडे बोलावतो, ” आई म्हणाली ” दिदीची जागा लहान आहे रे, मी कशी राहू” तेव्हा तो म्हणाला की ” आई दोन्ही तुझीच नातवंडं आहेत, सर्वस्वी तुझ्यावर जबाबदारी टाकलेली नाही, कर्ज घेतांना हे सगळंच आपण ठरवलेलं आहे, मग लेकीकडेच ओढा का? असं चालेल का? आपल्या बाई दोघांना बघतील, तू लक्ष ठेव, हे मान्य करावेच लागेल तुला,” आई वरमली आणि हो म्हणाली. दाराआडून हे बघणारी सीमा सुखावली. आपल्या नवर्याकडे स्निग्ध प्रेमळ नजरेनं पहात तिनं मनातल्या मनात देवाला हात जोडले.
सुवर्णा भावे जोशी
(अलक हा लघुकथा लेखनाचा प्रकार आहे)
Leave a Reply