जालना/प्रतिनिधी : एखाद्या विषयात विद्यार्थी मागे राहत असेल, तर त्यामागे अध्ययन अक्षमता हेदेखील कारण असू शकते; मात्र या अक्षमतेचे निदान झाले नाही, तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. पर्यायाने तो शाळेतील विषय संपादणूकीच्या स्पर्धेत मागे पडतो. अशा मुलांना शिक्षण प्रवाहात कायम ठेवण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले.जिल्हा परिषद जालना व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना आणि सीआरसी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हातील शिक्षण विभागातील सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, मुख्याध्यापक व शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती यांच्यासाठी आयोजित ‘२१ दिव्यांग प्रकार व अध्ययन अक्षम विद्यार्थी ओळख’ या ऑनलाइन वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेबिनार मध्ये जिल्हा परिषदेचे जि प सदस्य जयमंगल जाधव,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखिळ,सीआरसी नागपूर येथील अधिव्याख्याता अश्विनी दाहत,व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्पणा भालेराव यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ संजय येवते, डॉ.श्रीहरी दराडे, डॉ. सय्यद अख्तर, योगेश्वर जाधव, जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण राजेश ठाकूर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक,विषय सहाय्यक,शिक्षक,साधन व्यक्ती यांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल म्हणाले की,शिक्षण प्रवाहात जी काही अध्ययन अक्षम मुले आहेत यांची ओळख शिक्षक व पर्यवेक्षकीय यंत्रणांंनी करुन घेऊन या मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना अध्ययन अनुभव द्यावेत जेणेकरून ही मुलं शिक्षण प्रवाहात कायम राहतील२१ दिव्यांग प्रकार या विषयावर बोलताना सीआरसी नागपूर येथील अधिव्याख्याता अश्विनी दाहत यांनी दिव्यांगांचे २१ प्रकार सविस्तर समजावून सांगितले तसेच या प्रकारातील मुलांसाठी विविध नाविन्यपूर्ण पद्धतीने शिक्षण कसे पोहोचविता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सीआरसी नागपूर येथील सहाय्यक अधिव्याख्याता डॉ.अपर्णा भालेराव यांनी अध्ययन अक्षम मुलांच्या विविध शैक्षणिक व वैद्यकीय समस्या यावर प्रकाश टाकला व या समस्या निवारणासाठी उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे म्हणाले की, दिव्यांग मुलांच्या शिक्षणासोबतच या मुलांसाठी शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती पालक व विद्यार्थी यांना अवगत करून देणे गरजेचे आहे.सोबतच या मुलांसाठी त्यांच्या क्षमतेनुसार अध्ययन अनुभव दिल्यस ती नक्कीच शिक्षणक्षम होतील.या वेबिनारच्या आयोजनासाठी माहिती व तंत्रज्ञान विभाग डायट जालनाचे विषय सहाय्यक श्रीकृष्ण निहाळ,जगन वायाळ यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधन व्यक्ती नारायण पिंपळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण राजेश ठाकूर यांनी केले.
Leave a Reply