ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंबेडकरी साहित्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते -प्रा. माधव सरकुंडे

April 13, 202113:30 PM 75 0 0

नांदेड – आजच्या साहित्यिक तथा विद्वानांच्या प्रतिभा मुक्त असल्या पाहिजेत. त्या व्यवस्थेच्या गुलाम असता कामा नयेत. साहित्य हे समाज घडविण्याचे आणि लढवण्याचे काम करीत असते. चमडीबचाव आणि सावधगिरीचे साहित्य कुचकामी असते. असे साहित्यिक भूमिकाविहीन असतात. त्याउलट आंबेडकरी साहित्य हे संघर्षशील असते, त्यातून क्रांतीची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत प्रा. माधव सरकुंडे यांनी केले. ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी व्याख्यानमालेचे संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे, साहित्यिक अशोक बुरबुरे, सज्जन बरडे,अरविंद निकोसे, संजय मोखडे, सुनील कुमरे, साहेबराव पाईकराव, दीपक भालेराव आदींची उपस्थिती होती.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सात दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे
उ द् घा ट न ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते झाले. व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प यवतमाळ येथील आंबेडकरी विचारवंत प्रा. माधव सरकुंडे यांनी गुंफले. ‘आजच्या साहित्यिक, बुद्धीजीवींची जबाबदारी काय?’ या विषयावर बोलतांना ते पुढे म्हणाले की, पांढरे कागद काळे करणे म्हणजे साहित्यलेखन नव्हे. हस्तीदंती मनोऱ्यात बसून कल्पनेचे इमले बांधणारे साहित्य विचार प्रसवत नाहीत. कारण सत्य समजले की माणूस स्वस्थ बसत नाही. तो अन्यायाच्या विरोधात न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी साहित्य निर्मिती करतो. आजच्या साहित्यिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. घरात बसून शब्दांचा भूलभुलैया न करता संघर्षासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे. परिवर्तनासाठी करारी, धाडसी आणि कणखर भूमिका घेतली पाहिजे असेही ते म्हणाले.

महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर आॅनलाईन पद्धतीने सहभागी होत शुभम ढोले, नितीन वाहुळे, सुषमा पाखरे, मनोहर सहारे, राजेंद्र कांबळे, संदीप व्यवहारे, अमित ठाकूर, पिराजी भालेराव, सुनील खांडेकर, विश्वनाथ धुमाळे, सिद्धार्थ कांबळे, उषा नगराळे, आश्विन ढाकरे, संजय खळगे, राजेश ढगे, शिवाजी मलघने, सुरेश कुरकुटे यांच्यासह अनेकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, अमृत बनसोड, सुरेश खोब्रागडे, संजय डोंगरे, देवानंद सुटे, सुनंदा बोदिले आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.

 

मोदी सरकार धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरोधात

स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समाजवाद, विज्ञानवाद ही भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आहेत परंतु मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून लोकांच्या मनातील धर्मनिरपेक्षतेची भावना काढून टाकण्याच्या कामाला लागले आहे. खाजगीकरण, आरक्षणाचे राजकारण, निर्गुंतवणूकीकरण, नोकऱ्यांची व्यपगतता आणि धार्मिक तुष्टिकरणाचे काम हे सरकार करीत आहे, असे प्रा. माधव सरकुंडे म्हणाले. आजच्या साहित्यिकांनी, बुद्धीजीवींनी राजकारणाला लीड केले पाहिजे. आर्थिक सबलीकरणाकडेही लक्ष दिले पाहिजे. राजकीय मर्यादा पडत असल्या तरी समाजाला एक सशक्त भूमिका द्यायला हवी. व्यवस्थेच्या दैवीसिध्दांताचा संभ्रमही दूर करणे आवश्यक आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *