उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे घडलेलं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांचीच हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी सकाळी या घटनेचा खुलासा झाला असून हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं वय ५२ वर्ष आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव दरबारी लाल रावत असं आहे. दरबारी हे सारथा गावचे ग्रामस्थ होते. शेतकरी असणाऱ्या दरबारी यांची मुलगी रेणूचं शेजारच्या मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होतं. या तरुणाचं नाव रवी लोधी असं असल्याची माहितीसमोर आली आहे. रवी आणि रेणूच्या या नात्याला दरबारी यांचा विरोध होता. रेणूने रवीसोबत कोणतेही संबंध ठेऊ नयेत असं दरबारी यांनी तिला सुनावलं होतं. मात्र वडिलांच्या या इशाऱ्याकडे कानाडोळा करत रेणूने रवीसोबतचं नातं कायम ठेवलं. यामुळेच अनेकदा दरबारी आणि रेणू या दोघांमध्ये वाद व्हायचे.
रविवारी सकाळी दरबारी त्यांच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली असता रेणू आणि रवीनेच दरबारी यांचा रस्सीने गळा आवळून हत्या केल्याचं स्पष्ट झालं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार दरबारी हे झोपेत असतानाच रेणू आणि रवीने त्यांचा गळा आवळला. “पोलीस चौकशीदरम्यान मरण पावलेल्या दरबारी यांची पत्नी सुनिता देवी आणि इतर शेजाऱ्यांनी दरबारी याचा रेणू आणि रवीच्या नात्याचा विरोध होता असं सांगितलं. सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केली असता रेणूने आपण हे कृत्य केलेलं नाही असं पोलिसांना सांगितलं. मात्र बराच वेळ तिची चौकशी केल्यानंतर तिने आपला गुन्हा मान्य केला. आपणच रवीच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याचं रेणूने सांगितलं. त्यांचा आमच्या नात्याला विरोध असल्याने आम्ही हे पाऊल उचललं, असं रेणू म्हणाली,” अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सुनिता देवी यांना सकाळी दरबारी हे मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्यांनीच पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. दरबारी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी रेणू आणि रवीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणात इतर कोणाचा हात होता का यासंदर्भात आता पोलीस चौकशी करत आहेत.
Leave a Reply