आण्णाभाऊ साठे यांनी दीन-दलितांचे दुःख आपल्या साहित्यातून मांडले,असे प्रतिपादन प्रा विक्रम कदम यांनी व्यक्त केले.सातारा येथे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त महामानव विचार प्रबोधन मंच तर्फे आयोजित ऑनलाईन दुसऱ्या जागृती संमेलनात ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रातून आपण कोणती प्रेरणा घ्यावी?’ या विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक प्रा विक्रम कदम यांनी अण्णाभाऊ साठे यांचा जीवनसंघर्ष या वेळी सविस्तर उलगडून दाखवला.
‘शिवछत्रपतीचा इतिहास रशियात जाऊन सांगणारे अण्णाभाऊ साठे हे खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते. महात्मा जोतीराव फुले यांच्या नंतर शेतकरी,कष्टकरी व कामगार समाजाचे दुःख साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी प्रभावीपणे समाजासमोर मांडले.संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे अण्णाभाऊ साठे आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी स्वाभिमान व आत्मसन्मान जपला.’ असेही ते म्हणाले.यावेळी महामानव विचार प्रबोधन मंचचे संदीप थोरात यांनी आपल्या समारोपीय संदेशात अण्णाभाऊ साठे यांची संघर्ष प्रेरणा आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपणास उपयुक्त ठरते असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस उत्तम कांबळे व सुरेश लोंढे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपली मनोगतं व्यक्त केली.गेली दोन तीन वर्षे संदीप थोरात यांच्यातर्फे महामानव विचार प्रबोधन मंचच्या माध्यमातून महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.महामानवांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हा मंच सतत प्रयत्नशील असतो.याप्रसंगी मोठ्या प्रमाणात श्रोते या ऑनलाईन कार्यक्रमाला उपस्थित होते.
Leave a Reply