ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सुसंघटन व त्यागाच्या बळावर कोणत्याही संकटावर मात करता येते! वार्तालाप कार्यक्रमात अ‍ॅड.गौतम संचेती यांचे अनुभव कथन

February 12, 202114:06 PM 125 0 0

औरंगाबाद (प्रतिनिधी) – मागील 40 वर्षापासून मी समाजकार्य करीत आहे. आज सत्तरीच्या वयातही माझा समाजकार्याचा उत्साह पूर्वीसारखाच आहे. देशात आणि महाराष्ट्रात अनेक वेळा संकटे आली.संघटनेमुळेच या संकटांवर आम्ही मात करू शकलो. संकटग्रस्त जनतेला दिलासा देऊ शकलो,असे समाजकार्य सुसंघटन व त्यागाच्या बळावरच पार पाडता येते , असे जैन संघटनेचे ज्येष्ठ, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड.गौतम संचेती यांनी गुरूवारी वार्तालाप कार्यक्रमात बोलताना सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात अ‍ॅड.संचेती यांनी मागील 40 वर्षातील समाजकार्यात आलेल्या अनुभवांना व आठवणींना उजाळा दिला.

वार्तालाप कार्यक्रमात आपल्या समाजकार्याची माहिती देताना अ‍ॅड.संचेती पुढे म्हणाले की, मी 1975 पासूनच सामाजिक कार्यास सुरूवात केली. विद्यार्थी दशेत मी 1974 च्या मराठवाडा विकास आंदोलनात सहभाग नोंदवला. त्याचा परिणाम म्हणून मी हर्सूल कारागृहात तुरूंगवासही भोगला. पुढे महाराष्ट्रातील नामवंत सामजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथा यांच्याशी माझा संपर्क आला. त्यामुळे 1986 साली मी त्यांच्या सामूहिक विवाह चळवळीत सहभागी झालो. याच चळवळीच्या माध्यमातून मी 1991 साली 31 जोडप्याचा सामूहिक विवाह सोहळा पार पाडला. या कामासाठी मी दीड महिना समाज बांधवांच्या संपर्कात राहिलो. समाजाला प्रथमच मी अशा प्रकारे जोडल्या गेलो, याचा मला मनस्वी आनंद झालेला होता, असे अ‍ॅड.संचेती यांनी स्पष्ट केले. पुढे 1993 साली किल्लारी मध्ये भूकंप झाला. या भूकंपात जीवित व वित्तहानी मोठया प्रमाणात झाली. या सकंटकाळात आपणही सहभाग नोंदवला पाहिजे, या उद्देशाने मी भूकंपग्रस्तांच्या मदत कार्यात सहभागी झालो. या भूकंपग्रस्तांना आम्ही जैन संघटनेच्या माध्यमातून 7 दिवस जेवण पुरविले. पुढे 32 दिवसांतही हे कार्य आम्ही सुरू ठेवले. जैन, गुजराती महिलांनी जेवण बनविण्याच्या कामात मोठे सहकार्य केले. आम्ही या भूकंपग्रस्तांना स्वादिष्ट व सकस जेवण पुरवले. या जेवणाचा आस्वाद सरकारी अधिकारीही घेत असत. दसरा, दिवाळीत भूकंपग्रस्त भागातील 1000 अनाथ मुलांना जेवण्याची व राहण्याची सोय करून दिली. पुढे पुण्यात या अनाथ मुलांची सोय शांतीलाल मुथा यांनी केली.
कोरोना काळातील आम्ही केलेले कार्यही विशेष उल्लेखनीय ठरले, असे सांगून अ‍ॅड.संचेती म्हणाले की, या कोरोना काळात आम्ही ‘झिरो मशीन’ संकल्पना हाती घेवून ती यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कोरोना काळात आम्ही कोरोना सेंटर उभे केले. या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस आदी कर्मचारी उपलब्ध केले. या कोरोना योध्दांचे सहकार्य घेऊन आम्ही कोरोनाग्रस्त समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. झिरो कोविड मशीन या संकल्पनेमुळे आम्ही भारावून गेलो होतो. सहा महिने कोरोना तपासणी करू शकलो. 100 बाटली रक्त संकलन आम्ही करू शकलो. पेशंट वाढत होते व कामही वाढत होते. त्यानुसार आम्ही सज्ज राहत होतो. गरज भासली तेव्हा प्लाजमा डोनेशन यशस्वी केले. सेरो सर्वेक्षणाचा कार्यक्रमही आम्ही यशस्वी केला. कोविड काळात काम करणार्‍या हॉस्पिटलला मदत मिळवण्यात यशस्वी झालो. हेल्मेट या अत्याधुनिक उपकरणाद्वारे आम्ळी एका मिनिटात 200 टेस्टिंग करू शकलो. या पध्दतीने जवळपास 50 हजारांची तपासणी करण्यात आली. या कार्याला राज्यमंंत्री ना.अब्दुल सत्तार यांचीही साथ मिळाली. दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट आली तर काय करणार? ही भीती देखील मनात निर्माण झालेली होती, पण संघटित व प्रामाणिक कार्यामुळे संकटावर मात होऊ शकते, हा विश्‍वास आमच्या मनात होता, असे अ‍ॅड.संचेती यांनी नमूद केले.
गुजरातमधील भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या कार्याचा अनुभव सांगताना अ‍ॅड.संचेती यांनी सांगितले की, या ठिकाणी आम्ही 1 महिना मदत कार्य केले. या ठिकाणी मदतकार्य करताना भाषेची अडचण होती. त्यामुळे आम्ही औरंगाबाद शहरातून दोन गुजराती भाषिक मित्रांना सोबत नेले होते. एक पायलट प्रोजेक्ट म्हणून आम्ही हे मदत कार्य मोठया समर्पित भावनेने केले. अंदमान निकोबार येथेही केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या ठिकाणी दवाखान्यांची अवस्था फारच बिकट होती. या ठिकाणी शाळा व हॉस्पिटल बांधले. पुढे 2003 साली फेडरेशन ऑफ जैन एज्युकेशन या संस्थेची जबाबदारी माझ्याकडे आली. माझ्याकडे आलेली महाराष्ट्राची जबाबदारी मी मोठया निष्ठेने पार पाडली. या संस्थेच्या मार्फत आपण शैक्षणिक परिवर्तनाचे काम केले. शिक्षण हे पुण्याचे काम आहे, ही भावना मनात ठेवून हे कार्य केले. त्याचाच परिणाम म्हणून आम्ही औरंगाबादेत डी.पी.एस स्कूल यशस्वीपणे सुरू ठेवलेली आहे, औरंगाबादेत जैन संघटनेतर्फे सुरू असलेले मुलींचे हॉस्टेल हे सर्वात उत्कृष्ट हॉस्टेल आहे, असे अ‍ॅड.संचेती यांनी सांगितले.
अतिवृष्टी ग्रस्तांसाठीही आम्ही चांगले काम केले. या काळात पैठण येथे 7 दिवस आम्ही जेवण पुरविण्याचे काम केले. याच काळात नांदेड ते नाशिक दरम्यान 10 हजार धान्याच्या किटसचे वाटप केलेले आहे. 2013 मध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी जनावरांच्या छावण्या अनेक ठिकाणी सुरू केल्या. जवळपास 10,500 जनावरांचा सांभाळ आम्ही या छावण्यांमधून करू शकलो. या जनावरांसाठी डॉक्टर उपलब्ध केले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
यावेळी पारस चोरडीया (भारतीय जैन संघटना, मराठवाडा अध्यक्ष)प्रवीण पारख(भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र राज्य सदस्य)किशोर ललवाणी(भारतीय जैन संघटना, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष)प्रकाश अजमेरा(ट्रस्टी खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर) डॉ. प्रभू गोरे,विलास शिंगी,मुकेश मुंदडा,छबुराव ताके,मनोज पाटणी,अनील सावंत,दिपक म्हस्के, जॉन भालेराव,माजेद खान,रमेश जाबा,नारायण जाधव पाटील,सचीन फुके,शिवाजी गायकवाड,कल्याण अन्नपूर्णे,आरेफ देखमुख,जगन्नाथ सुपेकर,किशोर दहिवाडे,सुमेध दिवे,मानसी शिंदे,दुर्गा खरात,एच.आर.लहाने,संतोष लेणेकर,अनिस रामपूर,तुकाराम राऊत आदिची उपस्थिती होती.

‘स्मार्ट गर्ल’ अर्थात मुलींचे सक्षमीकरण!
जैन संघटनेतर्फे आम्ही ‘स्मार्ट गर्ल’ या नावाखाली मुलींचे सक्षमीकरण यशस्वी केले. या मुलींची जडणघडण, त्यांच्यासाठी प्रशिक्षण कार्य राबविले. जवळपास 1 लाख 50 हजार मुलंचे आम्ही सक्षमीकरण केले. त्यामुळे या मुलींना जीवनाची दिशा कळणे, स्वत:च्या व्यक्तिमत्व विकास घडविणे यात यश येऊ शकते, असे अ‍ॅड.संचेती यांनी सांगितले. आणखी एक विशेष बाब संचेती यांनी सांगितली, ती म्हणजे जैन समाजातील 200 मुलांना आम्ही आयएएस व आयपीएस बनवू शकलो, अर्थात हे कार्य आमच्या समाजाच्या दृष्टीने अभिमानास्पद आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *