जालना ( प्रतिनिधी) : शेतीच्या वादातून गाव गुंडांनी मातंग समाज बांधवांच्या शेतात घुसखोरी करून इंचे कुटुंबियांना जबर मारहाण केल्याची घटना वालसा वडाळा ता. भोकरदन येथे दोन दिवसांपुर्वी घडली. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शुक्रवारी( ता. २६) उपजिल्हाधिकारी श्रीमती भोसले यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, मौजे वालसा वडाळा येथील रामदास इंचे व त्यांचे कुटुंबीय शेतात कापूस वेचणी व मिरची तोडणी करत असताना रामदास पंडित याने शेतात जाऊन नांगरणी सुरू केली. इंचे कुटुंबातील महिलेने आमच्या शेतात कसे नांगरता असे विचारले असता पंडित व त्यांच्या सोबत आलेल्या गाव गुंडांनी इंचे कुटुंबियांसोबत वाद घातला तसेच गजानन पंडित व त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत इंचे कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले . मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा संघटनेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. असे लेखी निवेदनात नमूद करत या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच पीडित कुटुंबीयांना शासनाने तात्काळ पंचवीस लाखांची आर्थिक मदत द्यावी. अशा मागण्या लेखी निवेदनात करण्यात आल्या .तथापि आरोपींना अटक न केल्यास जिल्हा कचेरीवर संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला. निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष गणपत कांबळे, जिल्हाध्यक्ष सर्जेराव पाटोळे ,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा चंद्रकलाबाई गवळी, बाबासाहेब पाटोळे यांच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a Reply