ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठा आरक्षणातील संवैधानिक बाबींवर केंद्राने सकारात्मक बाजू मांडावी अशोक चव्हाण यांची मागणी; भाजप नेत्यांना सहकार्याचे आवाहन

January 9, 202113:17 PM 142 0 0

जालना (प्रतिनिधी) – मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी इंद्रा साहनी प्रकरणाच्या निवाड्यातील 50 टक्क्यांची मर्यादा आणि 102 व्या घटना दुरूस्तीचा राज्य सरकारांच्या अधिकारांवरील परिणाम आदी संवैधानिक व न्यायालयीन बाबींवर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक पद्धतीने बाजू मांडावी, असे आवाहन मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केले. एसईबीसी आरक्षणाच्या खटल्यातील संवैधानिक पेच केंद्र सरकारच्या पातळीवरच सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक असून, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील खासदारांनीही पंतप्रधानांची भेट घ्यावी, यादृष्टीने आपले प्रयत्न असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, 25 जानेवारीपासून सर्वोच्च न्यायालयात एसईबीसी आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडेलच. सोबतच केंद्र सरकानेही अनुकूल भूमिका घेण्याची गरज आहे.

मागील सुनावणीत घटनापिठाने केंद्र सरकारच्या अ‍ॅटर्नी जनरलला नोटीस दिली आहे. यानिमित्ताने मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारला आपली सहकार्याची भूमिका स्पष्ट करण्याची संधी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना केंद्राने इंद्रा साहनी प्रकरणाचे पुनराविलोकन करण्याची विनंती करावी. कारण मराठा आरक्षणावर अंतरिम प्रतिबंध लागू करताना सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणाचा संदर्भ देत महाराष्ट्रातील आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्याचे नमूद केले होते. बहुतांश राज्यातील आरक्षणाचे प्रमाण आज 50 टक्क्यांच्या वरच आहे. त्यामुळे 30 वर्ष जुन्या इंद्रा साहनी निवाड्याचे पुनराविलोकन आवश्यक असून, तो निकाल 9 न्यायमुर्तींनी दिलेला असल्याने त्याचे पुनराविलोकन करण्यासाठी 9 किंवा त्याहून अधिक सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता चव्हाण यांनी विषद केली. तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रमाण 69 टक्क्यांवर गेले आहे. आर्थिक मागास प्रवर्गाच्या 10 टक्के आरक्षणामुळेही आरक्षणाचे प्रमाण 50 टक्क्यांवर गेलेले आहे. तरीही त्या दोन्ही आरक्षणाच्या अंमलबजावणीवर कोणतेही प्रतिबंध नाहीत. केवळ मराठा आरक्षणावरच तात्पुरते प्रतिबंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर तामिळनाडू व ईडब्ल्यूएस आरक्षणाच्या प्रकरणांसोबत सुनावणी घेण्याची विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला करावी. सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग तयार करून आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना आहे की नाही, असा संवैधानिक प्रश्न 102 व्या घटना दुरूस्तीमुळे निर्माण झाला आहे. अशा संवैधानिक बाबींवर केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्टपणे बाजू मांडावी. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाला तामिळनाडू प्रमाणे घटनेतील नवव्या अनुसूचिचे संवैधानिक संरक्षण प्रदान करण्याची मागणीही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी केली. एसईबीसी आरक्षण टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपला प्रभाव वापरून केंद्राकडून योग्य पावले उचलली जातील, यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकजूट दाखवून एसईबीसी कायदा तयार केला होता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या लढ्यात तीच एकजुटता दाखवण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 25 जानेवारीपासून सुरू होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने येत्या सोमवारी 11 जानेवारीला आपण दिल्लीत वकिलांची बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत काही सूचना मांडण्यासाठी आलेले मराठा आंदोलनातील नेते संजय लाखे पाटील, राजेंद्र दाते पाटील, युवराज सूर्यवंशी, महेश राणे, महेश डोंगरे, विपूल माने आदी यावेळी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *