जालना : येथील श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाला सीएसआर प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले आहे. या प्रमाणपत्रामुळे आता श्रावक संघाला जगभरातून गो सेवेसाठी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दरम्यान, जालन्यातील श्रावक संघ हा सदरचे प्रमाणपत्र मिळवणारा राज्यातील पहिला संघ आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सदरील प्रमाणपत्राआधारे गो सेवेसाठी दान देऊ इच्छिणार्या जगभरातील कुठल्याही उद्योजकास सहजपणे या संस्थेला दान देता येते. सदरील संस्थेकडे आजघडीला दोन हजार तीनशे गायी असून ही संस्था गो पालन करणारी संस्था आहे. गायीपासून किती उत्पन्न मिळते हे पाहणारी ही संस्था नसून अत्यंत थकलेल्या गायींना सुध्दा सांभाळण्यासाठी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे सेवा करत आहे. यासंदर्भात बोलतांना संस्थेचे अध्यक्ष श्री. सुदेशकुमार सकलेचा म्हणाले की, सीएसआर प्रमाणपत्र या संस्थेला मिळाल्यामुळे आता या संस्थेला कुठलाही उद्योजक अगदी सहजपणे मदत करु शकतो.
असा फंड हा जवळपास प्रत्येक उद्योजकांकडे उपलब्ध असतो. मात्र त्यासाठी सीएसआर प्रमाणपत्राची गरज असून ज्या संस्थेकडे सदरचे प्रमाणपत्र आहे, अशाच संस्थेला ही मदत करता येते. ज्या उद्योजकांना गो सेवेबद्दल आपुलकी आहे, त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे, असे जगभरातील उद्योजक देखील या गो शाळेला मदत करु शकतात. कोरोना काळात सर्व काही बंद असतांना संस्थेने गो शाळेतील गायींकडे दुर्लक्ष न करता त्यांची सेवा सुरुच ठेवली होती, याची आठवण करुन देत श्री. सकलेचा यांनी सदरचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणारे टॅक्स कन्स्लंटन श्री. अमजत खान यांचे आभार देखील मानले. या प्रसंगी बोलतांना श्री. अमजत खान म्हणाले की, गो सेवेसाठी सीएसआर प्रमाणपत्र काढण्याचा विषय जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मी त्यास तात्काळ होकार देऊन सर्व कागदपत्रे एकत्रित करुन ती संबंधित कार्यालयाकडे दाखल केली आणि सदरचे प्रमाणपत्र देखील मिळवले. अशा प्रकारचे प्रमाणपत्र मिळणारी श्रावक संघ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचेही ते म्हणाले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा, सचिव डॉ. धरमचंद गादिया, भरत गादिया, कचरुलाल कुंकलोळ, संजय बंग, शांतीलाल संचेती, चेन्नईचे वंशराज राका व गौतमचंद कटारिया यांनीही श्री. अमजत खान यांचे आभार मानले. या प्रसंगी श्रावक संघाच्यावतीने श्री. अमजत खान यांचा शाल व माळ देऊन सत्कारही करण्यात आला.
Leave a Reply