ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘आझाद हिंद सेने’ची देशसेवा

July 5, 202112:37 PM 109 0 0

आझाद हिंद सेना म्हणताच डोळ्यापुढे उभे राहतात ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी जगाला गवसणी घालणारे नेताजी सुभाषचंद्र बोस ! आझाद हिंद सेना ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात 5 जुलै 1943 या दिवशी केली. ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 40 सहस्र भारतीय स्त्री-पुरुषांच्या सहभागाने ही सेना स्थापन केली आणि ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे आवाहन केले. आझाद हिंद सेनेच्या स्थापनादिनाच्या निमित्ताने हा लेखप्रपंच

आपल्या देशाबाहेर पडून साडे तीन वर्षे उलटून गेलेल्या नेताजींना आपल्या मातृभूमीत परतायची अनिवार ओढ होती, पण त्यांना देशात प्रवेश करायचा होता तो शत्रूचा नि:पात करून व आपल्या मातृभूमीला दास्यमुक्त करून आपल्या सार्वभौम देशाचा एक सन्माननीय नागरिक म्हणून. गेली साडेतीन वर्षे केलेली अपार मेहनत व नियोजन आता फलस्वरुप होण्याची लक्षणे दिसू लागत होती, मात्र नेताजी म्हणजे दिवास्वप्न पाहणारा आशावादी मनुष्य नव्हता तर तो एक द्र्ष्टा होता. संपूर्ण तयारीनिशी व ताकदीनिशी हल्ला चढवुन तो निर्णायक व यशस्वी होण्याची पूर्ण खात्री झाल्यावर मगच ते आपला निर्णायक घाव घालणार होते. आणि असा निर्णायक हल्ला यशस्वी होण्यासाठी केवळ सैन्य व शस्त्रे पुरेशी नसून आपल्या देशातील बांधवांचा आपल्या प्रयत्नाला मनापासून पाठिंबा असणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते. किंबहुना जेव्हा आझाद हिंद सेना पूर्वेकडून परकिय सत्तेवर बाहेरून हल्ला चढवेल त्याच वेळी जागृत झालेली व स्वतंत्र्यासाठी सज्ज झालेली सर्वसामान्य भारतीय जनता आतून उठाव करेल व या दुहेरी पात्यांत परकियांचा निभाव लागणार नाही आणि नेमका तोच स्वातंत्र्याचा क्षण असेल हा नेताजींचा ध्येयवाद होता.

मात्र यासाठी आपल्या देशवासियांना आझाद हिंद सेना ही आपली मुक्तिसेना व स्वतंत्र हिंदुस्थानचे भावी सेनादल आहे अशी भावना होणे अत्यावश्यक आहे असे नेताजींना वाटत होते. हे अत्यंत कठिण होते हेही त्यांना माहित होते. एकिकडे धूर्त इंग्रजांनी चालविलेला अपप्रचार -जे खोडसाळपणे आझाद हिंद सेनेचा उल्लेख अत्यंत तुच्छतापूर्वक ’जिफ्स’ (जॅपनिज इन्स्पावर्ड फिफ्थ कॉलम्नीस्ट्स) असा करीत असत. ज्यायोगे असा प्रचार व्हावा की आझाद हिंद सेना हे जपान्यांचे हस्तक दल असुन ते जपानरूपी शत्रूला भारतावर आक्रमण करण्यास मदत करीत आहेत व त्यातुन त्यांना सत्तेची लालसा आहे, अर्थातच ही सेना नसून ते घरभेदी आहेत. दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांनी व कॉंग्रेस पक्षानेही नेताजी व आझाद हिंद सेना यांना आपले म्हणण्यास नकार दिला होता व त्यांचा धिक्कारही केला होता, त्यांच्या भगिरथ प्रयत्नांची दखल घेण्यास नकार दिला होता व त्यांची नकारात्मक प्रतिमा साकारली होती. असे प्रयत्न आपल्या धोरणाविरुद्ध असून आपण त्यांना विरोधच करु असे धोरण कॉंग्रेसने स्विकारले होते.

प्रत्यक्ष आपल्या मातृभूमीत ही परिस्थिती तर जगात आपल्या सेनेचे काय स्थान असेल ? काय प्रतिमा असेल ? आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामास जागतिक पाठिंबा मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे नेताजींनी अभ्यासले होते. इतकेच नव्हे तर आपण व आपले सेनादल हे आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत असून या प्रयत्नात सर्व स्वातंत्र्यवादी अशियाई राष्ट्रे तसेच पाश्चिमात्य राष्ट्रे यांनी एक स्वातंत्र्योन्मुख राष्ट्र म्हणुन आपल्या मागे उभे राहिले पाहिजे ही नेताजींची महत्त्वाकांक्षा होती. एखाद्या व्यक्तिला वा संघटनेला पाठिंबा देणे वा व्यक्तिश: मदत करणे आणि युद्धात एखाद्या राष्ट्राने न्याय्य वाटणाऱ्या राष्ट्राची बाजु घेणे यांत जमीन -अस्मानाचा फरक होता. मुळात जेव्हा एखाद्या देशाचे सैन्य स्वत:चा संग्राम उभा करते आणि समविचारी राष्ट्रे त्याला पाठिंबा देतात तेव्हा ते संकेताला अनुसरुन असते मात्र एखाद्या गटाला वा व्यक्तिधिष्ठीत संघटनेला सहाय्य करणे ही अन्य राष्ट्राची कुरापत वा हस्तक्षेप ठरू शकतो. आझाद हिंद सेना म्हणजे कुणी व्यक्तिगत लाभासाठी वा आपल्या ऐक्यासाठी उभारलेली मोहिम नव्हती तर ती एका संग्रामस्थ राष्ट्राची अस्मिता होती. आणि म्हणूनच तिला वा तिच्या पाठीराख्या मित्रराष्ट्रांना नेताजी बदनाम होऊ देणार नव्हते, तर ते आपला संग्राम युद्धनितीला व संकेताला अनुसरून आपला व आपल्या राष्ट्राचा हक्क मिळविण्यासाठी न्याय्य मार्गाने लढणार होते.

ज्या कारणास्तव शिवरायांनी राजमुकुटाची यत्किंचितही आसक्ती नसताना रायगडावर स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला आणि स्वराज्य स्थापनेची घोषणा केली, नेमक्या त्याच उद्देशाने नेताजींना आझाद हिंद चे हंगामी सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला. इथे पुन्हा एकदा नेताजींवरील शिवचरित्राचा प्रभाव दिसुन येतो. आपले लष्कर म्हणजे कुणा लुटारूंची टोळी नव्हे, कुणा सत्ताबुभुक्षिताची फौज नव्हे, कुणी अत्याचारी जमाव नव्हे तर हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी वचनबद्ध आणि धेयासक्त असलेले देशभक्त संघटित होऊन व स्वत:च्या भावी स्वतंत्र राष्ट्राचे प्रातिनिधीक असे सरकार स्थापून साऱ्या जगाला ग्वाही देणार होते की आम्ही आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आमच्या राष्ट्रध्वजाखाली आमच्या सेनानीच्या अधिपत्याखाली उपलब्ध त्या सर्व मार्गांनी आणि सहकार्यानी लढणार आहोत आणि हा संघर्ष आता स्वातंत्र्यप्राप्तीतच विलिन होईल. आता कुणी आम्हाला गद्दार, फितुर, लोभी, भ्याड वा परक्यांचे हस्तक म्हणु शकणार नाही कारण आता आम्ही स्वतंत्र हिंदुस्थानचे सरकार स्थापन करीत असून जे आमच्या बरोबर येत आहेत ते आमच्या राष्ट्राला मान्यता देऊन व आमच्या स्वातंत्र्याचा आदर राखुन आम्हाला मित्र राष्ट्र म्हणुन आम्हाला पाठिंबा देत आहेत, मात्र स्वातंत्र्य हे आमचेच असेल व त्यासाठी जेव्हा जेव्हा रक्तपात होइल तेव्हा सर्वप्रथम रक्त आमचे सांडेल !

मार्च 1945 पासून मित्रराष्ट्रांपुढे जपानची पीछेहाट होऊ लागली. 7 मे 1945 ला जर्मनीने विनाअट शरणांगती पत्करली तर जपानने 15 ऑगस्ट या दिवशी शरणागतीची अधिकृत घोषणा केली. जपान-जर्मनीच्या या अनपेक्षित पराभवाने सुभाषचंद्रांच्या सर्व आशा मावळल्या. पुढील रणक्षेत्रासाठी सयामला जात असतांनाच 18 ऑगस्ट 1945 रोजी फार्मोसा बेटावर त्यांचे बॉम्बर विमान कोसळून त्यांचा हदयद्रावक अंत झाला. आझाद हिंद सेनेच्या फौजा दिल्लीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, तरी त्या सेनेने जे प्रचंड आव्हान ब्रिटीश साम्राज्यशाहीसमोर उभे केले, त्याला इतिहासात तोड नाही. त्यामुळे ब्रिटीश सत्ता हादरली. भारतावर पुढे सत्ता गाजवणे कठीण जाईल, याची कल्पना इंग्रजांना आली. चाणाक्ष आणि धूर्त इंग्रज सरकारने भावी संकट ओळखल. पुढील मानहानी पत्करण्यापेक्षा हा देश सोडून जाण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला, अशी कबुली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधानांनी दिली होती. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या निस्वार्थ देशसेवेमुळे स्वातंत्र्यकांक्षा कोट्यवधी देशवासियांच्या मनात निर्माण झाली.

नेताजींचे असीम साहस आणि तन, मन, धन यांचा त्याग केलेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना विनम्र अभिवादन !

संकलक : कु. प्रियांका लोणे,

समन्वयक, हिंदू जनजागृती समिती,

संभाजीनगर-जालना

संपर्क क्र.: 8208443401

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *