ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबासाहेबांनी इतिहासाला धक्का लावला नाही

August 14, 202116:44 PM 97 0 0

आज नागपंचमी. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आपला वाढदिवस नागपंचमीच्या दिवशी साजरा करतात. त्यांचा वाढदिवस तारखेप्रमाणे २९ जुलै रोजी असतो. गेल्या महिन्यात तो त्या दिनबरहुकुम साजराही झाला. बाबासाहेबांनी वयाची ९९ वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षात पदार्पण केले. परंतु स्वत: बाबासाहेब त्यांचा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच नागपंचमीला साजरा करतात. आज १३ ऑगस्टला नागपंचमी आहे. आज दरवर्षीप्रमाणे ते साजरा करतील. पण बाबासाहेबांच्या शतकाचे कौतुक एवढे की त्यांच्या देशविदेशातल्या चाहत्यांनी दि.२९ जुलैला सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. चाहत्यांच्या प्रेमाचे ओझे एवढे झाले की थकलेल्या वृद्ध बाबासाहेबांना ते पेलता आले नाही. पहाटे साडेपाचला बाबासाहेबांचा दिवस सुरू झाला. त्यानंतर अवघ्या तासाभरातच त्यांच्या घरचा फोन खणखणू लागला. सकाळच्या प्रहरीच रुद्रपठण करून पुरोहितांनी बाबासाहेबांसाठी निरोगी दीर्घायुष्य चिंतले. सकाळी साडेसहापासूनच बाबासाहेबांच्या घरचा फोन खणखणू लागला. त्यांच्या घरी असणाऱ्या प्रत्येक नातेवाईकाचे, सहकाऱ्यांचे मोबाईल दिवसभर अखंड किणकिणत राहिले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, देशाच्या विविध राज्यांतून एवढेच काय परदेशातूनही बाबासाहेबांचे अभीष्टचिंतन करणारे फोन येत राहिले. प्रत्येकाला बाबासाहेबांशी किमान चार शब्द तरी बोलायचे होते. स्वत: बाबासाहेब न थकता, प्रत्येकाशी संवाद साधत राहिले.
आज खऱ्या अर्थाने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या कलाकारांनी आठवणींना उजाळा दिला आहे. त्यापैकी एक पुलंची आठवण एका कलाकाराने सांगितली, जाणता राजा हे महानाट्य पाहताना खरोखरच आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज अवतरले असल्याची अनुभूती येते. हे महानाट्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी समाजसमोर आणले. महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा, मोघलांची हार, मावळ्यांची एकी, युद्ध प्रसंग, वेषभूषा, आणि नैपथ्य पाहून लेखक, दिग्गजांचेही अश्रू अनावर झाले. २०० ते ३०० कलाकारांच्या एकत्रित शक्तीच्या आधारे महानाट्याचे प्रयोग पार पडत असे. अशाही आठवणी महानाट्यात काम केलेल्या कलाकारांनी सांगितल्या आहेत. संपूर्ण जगात या महानाट्याचे हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक प्रयोग झाले तरी भारतातही अनेक राज्यांत हिंदी भाषेत जाणता राजा नाटक होत असे. १९८४ ला जाणता राजाचा पहिला प्रयोग झाला होता. बाबासाहेब इंग्लडमध्ये गेल्यावर त्याठिकाणी पाहिलेले मोठमोठे पुतळे, प्रतिमा यावरून नाट्यप्रयोगाची कल्पना सुचली. ते अमलात आणण्यासाठी एक कुशल संघटक म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

जाणता राजा या महानाट्यात सर्वांना प्रवेश दिला जात असे. त्यांनी या महानाट्यासाठी सात ते आठ हजार लोकांचे एक कुटुंब तयार केले. कलाकारांकडून कधी चुका झाल्या तर चारचौघांत ओरडले नाहीत. पण जाणूनबुजून केलेल्या चुकीला त्यांनी कधीच माफ केले नाही, अशी शिस्तबद्ध शिकवण त्यांच्याकडून अनुभवायला मिळत असल्याचे कलाकार म्हणतात. नाटकाच्या निमित्ताने महाराष्ट्रतील अनेक जिल्हयात फिरायला मिळत असे. देशातील बऱ्याच राज्यात जाण्याची संधीही कधी हुकवली नाही. नागपूर मधील रामटेक, कोल्हापूर मधील पन्हाळगड, पुरंदर, राजगड, शिवनेरी असे किल्ले, तसेच पर्यटन स्थळेही पाहायला मिळत होती. इतिहास – भूगोलाचा अभ्यास नाटकाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिला. जगण्याची पद्धत, कुटुंबाची शिस्तप्रियता याची सवयही बाबासाहेबांनी लावून दिली होती. बाबासाहेब एक सुखद आठवण सांगताना म्हणतात….एका व्याख्यानमालेसाठी मुंबईत गेलो होतो. व्याख्यानानंतर काॅलेजमधील मुलगी जवळ येऊन मला म्हणाली, ‘तुम्ही शिवचरित्र खूप छान सांगता, पण छत्रपतींच्या कुठल्या गोष्टींचे अनुकरण करता का?’ तिच्या प्रश्नाने मी चक्रावलोच. मला काही सुचले नाही. मी म्हटले ‘याचे उत्तर मी तुम्हाला नंतर देतो.’ त्यानंतर मी बराच विचार केला की अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यांचे आपण अनुकरण करतो. छत्रपती आपल्या रक्तात नसानसांत भिनायला हवेत. तेव्हापासून आजपर्यंत मी छत्रपतींप्रमाणे माझ्या जीवनात दिलेला शब्द आणि दिलेली वेळ या दोन्ही गोष्टी आयुष्यभर काटेकोरपणे पाळत आलो आहे. अहंमपणा बाळगू नका. नेहमी हसत राहा. आईवडिलांची सेवा करा. सर्वांवर प्रेम करा. शिवचरित्र वाचा, शिवचरित्र तपासा, शिवचरित्राचे अनुकरण करा,” असा संदेश शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपली शतकी मजल गाठताना दिला आहे.


मावळे, अष्टप्रधान मंडळी, महाराज, मोघल, सहकारी, वासुदेव, गोंधळी, शेतकरी अशा लहानांपासून मोठ्या व्यक्तिरेखांचा अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच नाटकातील लहानशी चूक त्यांच्या पटकन लक्षात येत असे. ती वेशभूषेच्या बाबतीत असो वा अभिनय, नैपथ्य यासंदर्भात असो. प्रयोगात कुठल्याही पात्राची कमतरता भासल्यास बाबासाहेब स्वतः ते पात्र साकारत असत. रमणबाग शाळेतील एका प्रयोगात वासुदेव हे पात्र करणारा व्यक्ती येऊ शकला नाही. त्याच क्षणी बाबासाहेबांनी कुठलाही विचार न करता तातडीने वासुदेवाचा अंगरखा चढवला. डोक्याला मोरपीस लावून ते रंगमंचावर आले.- शाहिस्तेखानाच्या कव्वालीच्या प्रसंगात कव्वाली करणाऱ्याची वेशभूषा चुकली होती. पण ती लोकांच्या निदर्शनास आली नाही. बाबासाहेब त्यावेळी रंगमंचाच्या समोर बसले होते. त्यांना मात्र ही गोष्ट लक्षात आली. प्रसंग संपताच बाबासाहेब रंगमंचाच्या खालून स्टेजच्या मागे गेले. कव्वाली करणाऱ्या कलाकाराला त्याची चूक दाखवली. कार्यशाळेत बाराबंदी – फेटा बांधण्याबरोबरच पगडी कशी घालावी हेही बाबासाहेबांनी शिकवले. तर धोतर नेसण्याची खरी पद्धत त्यांनीच शिकवली. मावळ्यांनी मुजरा कसा करावा यापासून छत्रपतींच्या अभिनयापर्यंत सगळीकडे बाबासाहेब लक्ष देत असत. देशभरातून ७ ते ८ हजार लोकांना एकत्र आणून बाबासाहेबांनी जाणता राजा महानाट्य बसवले आहे.
कथाकथन, व्याख्यान, नाटक, ‘जाणता राजा’ हे महानाट्य, पुस्तकं, विविध मालिकांसाठी संहिता लेखनात मार्गदर्शन अशा विविध माध्यमांतून त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरात पोहोचवलं. त्यांच्या व्याख्यानांना हजर राहणारे लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. मी तेव्हा 23-24 वर्षांची असेल जेव्हा मी त्यांच्याकडून रायगडवर शिवाजी महाराजांचं चरित्र ऐकलं. ऐकताना मी मंत्रमुग्ध होऊन गेले. ते अत्यंत पोटतिडकीनं सांगतात. ते चरित्र ऐकून मी शिवमय होऊन गेले, असा अनुभव नाट्य दिग्दर्शक पद्मश्री राव सांगतात.‘ पुलंची एक हृदयस्पर्शी आठवण सांगितली जाते. पु.ल. देशपांडे एकदा जाणता राजा नाटक पाहायला आले होते. पण त्यांना नाटक पूर्ण पाहता आले नाही. याबद्दल पुलंनी बाबासाहेबांची माफी मागितली. पुल म्हणाले, नाटकातले प्रसंग इतके खरेखुरे वाटत होते. की माझ्या डोळ्यात सातत्याने अश्रू येत होते. त्यामुळे मला अश्रूंमुळे धूसर दिसू लागले आणि मी नाटक पूर्ण पाहू शकलो नाही. इतके खरेखुरे महाराज आणि त्यांचे स्वराज्य माझ्यासमोर नाटकातून अवतरले होते. गणगोत’मध्ये पु. ल. देशपांडे त्यांच्याविषयी लिहितात, इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे; पण त्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाहीत, अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेले बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते ‘हार्ड कोअर’ संशोधक आहेत पण शास्त्रीय पद्धतीने ते लिहिलं तर ते मोजक्या अभ्यासकापुरतंच मर्यादित राहतं असं त्यांना वाटतं म्हणून ते त्यांचा अभ्यास रंजक पद्धतीने मांडतात.


ठाकरे कुटुंब आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध सुपरिचितच आहेत. विशेषतः, राज ठाकरे यांच्या मनात शिवशाहिरांबद्दल असलेला आदर अनेकदा भाषणांमधून स्पष्टपणे जाणवला आहे. बाबासाहेब पुरंदरेंकडून ऐकलेल्या गोष्टी, त्यांच्यासोबत झालेल्या चर्चांचा उल्लेख ते अनेकदा करतात. शिवशाहीर आणि राज ठाकरे यांचं भावनिक नातं उलगडणाऱ्या एका हृद्य प्रसंग २००७ मध्ये घडला. रवींद्र नाट्यमंदिरात एका पुस्तकाचं प्रकाशन होतं. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरचं पुस्तक. एका शिक्षकानं ‘पॅशन’ म्हणून वेळात वेळ काढून, पदरचे पैसे खर्च करून लिहिलेलं. प्रकाशझोतात न आलेले काही किल्ले, त्यांचा इतिहास शोधण्यासाठी लेखकाने बरीच खटपट केली होती. खुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुस्तक प्रकाशनाला आले होते आणि त्यांच्यासोबत होते राज ठाकरे. दोघंही उत्तम वक्ते असल्यानं, एक अभूतपूर्व मेजवानीच होती. पण, पुढे जे घडलं, तो माणूस म्हणून समृद्ध करणारा सोहळा ठरला. प्रास्ताविक, लेखकाचं मनोगत वगैरे झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे ओघवत्या शैलीत बोलू लागले. लेखकाने घेतलेल्या मेहनतीचं कौतुक त्यांच्या डोळ्यांत दिसत होतं. अचानक त्यांनी गळ्यातला सोन्याचा गोफ काढला आणि लेखकाला आपल्याजवळ बोलावून त्याच्या हातावर ठेवला. सभागृह स्तब्ध झालं होतं आणि शिक्षक-लेखकही भारावला होता – शहारला होता. या पुस्तकासाठी झालेल्या खर्चाचा भार शिक्षकावर पडू नये, ही शिवशाहिरांची भावना होती. सगळंच शब्दांच्या पलीकडचं होतं. अनेकांचे डोळे पाणावले होते.
त्यानंतर, राज ठाकरे यांचं भाषण सुरू झालं आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सगळ्यांची मनं जिंकली. ”शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा गोफ अनमोल आहे. तो त्यांना परत करा आणि पुस्तकाचा जो काही खर्च झालाय तेवढ्या रकमेचा चेक माझ्या घरी येऊन घेऊन जा”, असा ‘आदेशच’ त्यांनी लेखकाला दिला आणि पुन्हा एकदा सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मागे जुलै महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. याच दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आल्याने ‘दुग्धशर्करा योग’ जुळून आला. या निमित्ताने पुण्यात राज ठाकरे यांनी बाबासाहेब यांच्या घरी जाऊन त्यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले. ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडलं आणि जे खरं आहे तेच लोकांसमोर मांडलं. एखादी दंतकथा असेल तर ते तसं सांगतात.या कथेला आधार नाही असाही आवर्जून उल्लेख ते करतात. सांगणं हे त्यांचं काम असून जाणून घेणं आपलं काम आहे. बाबासाहेबांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे तसं आहे. वयामुळे शरीर जरा थकलेलं आहे. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी पूर्वीसारखेच आहे. आणि ज्या ज्या वेळी मी बाबासाहेबांना भेटतो, त्या त्या वेळी इतिहासाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार होतो असे गौरवोद्गार ठाकरे यांनी यावेळी काढले.
गानसम्राज्ञीं’च्या शुभेच्छा आणि मुख्यमंत्र्यांचा फोन बाबासाहेब पुरंदरे आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्यातील जिव्हाळा नात्यापलीकडचा आहे. मंगशेकर भावडांमधील प्रत्येकाने म्हणजे लतादीदींपासून ते आशा (भोसले), उषा, मीना (खडीकर) आणि हृदयनाथ या सर्वांनी बाबासाहेबांशी दूरध्वनीवरून बातचित केली. लतादीदी त्यांना फोनवरच म्हणाल्या, “पायावर डोके ठेवून नमस्कार करते आणि तुमची तब्येत उत्तम राहो अशी प्रार्थना करते.” “तुम्ही आम्हाला ११० वर्षे असावे असे वाटते. तोपर्यंत मीही असेन,” अशी मिश्किल भावनाही लतादीदींनी यावेळी व्यक्त केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यापासून अनेकांनी दूरध्वनीवरून बाबासाहेबांना शुभेच्छा दिल्या. नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, नितीन देसाई यांनी बाबासाहेबांशी संपर्क साधला. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यापासून अनेक आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना भेटून त्यांचे अभीष्टचिंतन केले. सकाळपासूनचा हा शुभेच्छांचा वर्षाव रात्री साडेनऊपर्यंत अथक चालू राहिला. शंभरीतल्या या शिवशाहीराला दिवसभरात विश्रांतीसाठीही सवड मिळाली नाही. अखेरीस झोपेचे औषध देऊन त्यांच्या वाढदिवसाची सांगता करण्यात आली.
पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असला तरी त्यांना विरोध करणाऱ्यांनी ‘महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या पेटवू’ असा इशारा दिला होता. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हीडिओद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या सन्मानाचा विरोध केला होता. “या निर्णयामुळे शिवभक्तांच्या भळभळत्या जखमांवर सरकारनं मीठ चोळलं आहे. दर दोन चार वर्षांनी इतिहासाचं विकृतीकरण करणाऱ्यांचा सन्मान केला जातो,” असा आरोप त्यांनी केला होता. २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती. ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला’, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या १० लाख रकमेपैकी फक्त १० पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात १५ लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. बाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय म्हणजे ‘निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक केलेलं कार्य आहे,’ असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं होतं. पण जेम्स लेनला पुस्तकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर पुरवण्यास मदत केली. म्हणून राज्यात आंदोलने झाली. सांगलीत मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन मुक्ती पार्टी, समता परिषदेने पुरंदरेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते.
बाबासाहेबांबद्दल वाद निर्माण झाला पण स्वतः ते कोणत्याही वादात अडकले नाहीत. ते सांगतात की, मी जे काही केलं ते टीपकागदाप्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे.” जातीय विद्वेषातून किंवा काही गैरसमजातून वाद वा आक्षेप असतील तर ते चर्चेद्वारेच सोडविले पाहिजेत. आपण आपल्याशी कवटाळून धरलेल्या प्रतिमा/प्रतिकांबाबत अत्यंत संवेदनशील आणि तितकेच भावनाशील असतो. ज्याची शिवछत्रपती यांच्यावर आणि त्यांच्या चरित्रावर इतकी अगाध श्रद्धा आहे, ते लोक आपल्या वैचारिक वारसांचा विपर्यास घडून आणू शकत नाहीत. शिवचरित्र मांडतांना बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासाला धक्का लावलेलाच नाही, ही वस्तुस्थिती अनेकांनी पुराव्यानिशी पुढे आणली आहे. बाकी वाद मिटलेलाच आहे. ते काहीच समजत नसले तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे वाद निर्माण होऊन आयुष्याच्या एका कोपऱ्यात निर्माण झालेली काजळी काढून टाकली तर त्यांचे जीवन निर्मळच आहे. अशा धुरंधर शिवचरित्रकाराला मानाचा मुजरा!!!
– गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *