पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज(शनिवार) पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली. याशिवाय पुढील दोन दिवसांत प्रतिदिवस करोनाबाधितांची संख्या ९ हजारांवर जाण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे.
दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही निश्चितच चिंताजनक आहे. याच अनुषंगाने पायाभूत सुविधांवर भर देणं. आरोग्य सुविधा बळकट करणं, ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर्स आदींची संख्या वाढवणे हे आवश्यक आहे. काल महत्वाच्या रूग्णालयांसोबत एक बैठक झाली, त्या अनुषंगाने आपण रूग्णालयांमधील बेड्सची संख्या वाढवत आहोत. जर रूग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निश्चितच काही रूग्णालयांना आपल्याला १०० टक्के कोविड रूग्णालय म्हणून घोषित करावं लागेल.
ग्रामीण भागात सध्या ज्या ठिकाणी व्हेटिंलेटर्स वापरात नाहीत, ते हळूहळू शहरी भागात हलवले जात आहेत. याचं कारण म्हणजे शहरी भागांमधील रूग्णालयात मोठ्यासंख्ये ग्रामीणभागातूनही रूग्ण दाखल होत आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमधून देखील रूग्ण आता पुण्यात दाखल होत आहेत.
Leave a Reply