ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भदंत पंय्याबोधी थेरो : जीवन जाणिवांचे सौंदर्य

July 5, 202112:31 PM 61 0 0

तथागताच्या पदस्पर्शाने इथली भूमी पूनित झाली. या भूमीची माती सर्वदूर गेली आणि जगभरातील देशांत बोधीवृक्ष बहरला. तथागताच्या पावलांचे ठसे जिथे उमटले आहेत त्या ठशांचे आलेख संघाने त्यांच्या मनावर आणि जनमानसांवर कोरलेले आहेत. मानवी जगण्याच्या कोलाहलात जिथे तथागताची गरज पडली तिथे ते एका मार्गदर्शकाच्या, मित्राच्या, आपुलकीच्या, मानवतेच्या, समतेच्या, न्यायबंधुतेच्या, गुलाम व्यवस्थेला नेस्तनाबूत करणाऱ्या युद्धाच्या एकुणच तत्वज्ञानाच्याही रुपात हजर झाले आहेत. ज्यांनी हा विचार घेतला, त्या विचारांना पंख दिले आणि आभाळभर महाउड्डाण केले असे काही महान पुरुष जगात होऊन गेले. आपल्याही देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा कधीही न मावळणारा बुद्धसूर्य उगवला. त्यांच्या महाकर्तृत्वाने धम्मचक्र आधी या भूमीवर अंकित झाले आणि नंतर ते गतिमान झाले. हा वारसा घेऊन त्याच ठशांवरुन चालणारी पाऊले निर्माण झाली. ध्येयदृष्टी लाभलेली ही माणसे केवळ अंगावर चिवर घालून चारिकाच करीत नव्हती तर माणसांच्या मनावरची काजळी काढून घराघरांत उजेडाचे सौंदर्य पेरीत होती. लोक नतमस्तक होत होते आणि धम्मध्वज डौलाने फडकत होता. गळून पडलेल्या रथाला चाके बसवून शक्य तितक्या ताकदीने रथ मागे नेणाऱ्यांच्या प्रतिरोधातही ते पुढेच ओढण्याचा प्रयत्न करीत होते. काळवंडलेल्या कुरुपतेवर जीवन जाणिवांचे सौंदर्य लेपन करीत होते. भदंत पंय्याबोधी थेरो त्यांपैकीच एक आहेत.


भदंत पंय्याबोधी हे लहानपणापासूनच त्यांच्या दृष्टीला सतत दिसत राहणाऱ्या पावलांच्या ठशांकडे आकृष्ट झाले. मनात सतत घोळत असलेले विचार स्वस्थ बसू देत नव्हते. कायमचे स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी ग्रंथांनी हातात दोरखंड घेऊन मेंदूला बांधून टाकले होते. काळाचा पडदा सरकत होता तसा युद्धाचा बिगुलही वाजत होता. अखेर उपसंपदेच्या ऐतिहासिक सोहळ्यानंतर आता रणांगणावर एकच विजयी योद्धा होता, तो म्हणजे पंय्याबोधी. पंयाबोधी यांच्या जीवनातील काही काळ वगळला तर वास्तव्याचा सर्वात मोठा काळ नांदेड शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथे गेला. तिथे त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. त्याबरोबरच अनेकविध अनुभव घेतले. वैचारिकतेची व्यापकता अनुभवली. अभ्यास केला. अभ्यास दौरे काढले. त्यात लोकांनाही सहभागी करून घेतले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून धम्म जीवनाचे सौंदर्य स्थापित केले. बौद्ध समाजावरील अन्यथा अत्याचारांच्या विरोधात एका आंदोलक कार्यकर्त्याच्या भूमिकेत उभे राहिले. लोकांना धम्मजाणिवा देतांनाच सामाजिकतेच्या आशयांचेही ते सतत बांधकाम करीत राहिले.
भव्यता त्यांच्या मानसिकतेचा पाया आहे. शहरात एखादे भव्य विहार असावे. शेकडो भिक्खूंना तिथे राहता यावे. घराघरांतून सतत एखादा श्रामणेर होत राहावा. श्रामणेर दीक्षांचे सोहळे मोठ्या प्रमाणावर होत राहावेत यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अनेकांना धम्मजीवनाची गोडी लागावी. त्यांनी अभ्यास करावा. एकाचवेळी लाखो लोकांनी धम्मचिंतन करावे. धम्मकार्यात सहभागी व्हावे असे काही त्यांचे महासंकल्प गेल्या अनेक वर्षांपासून आहेत. त्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. जिद्द मोठी असली की विचार आक्रसत नाही. त्यामुळे एका मोठ्या प्रतलात आपण विहार करु शकतो. काळच आपल्या विजयाचे स्वप्न घेऊन समोर हास्यमुखाने स्वागत करतो. खुरगावच्या रुपाने पंय्याबोधी यांना अपेक्षित असलेली धम्मचळवळ उभी राहिली आहे. इथे चळवळरुपी असंख्य बोधीवृक्षांची लागवड होते आहे. या भूमीतून बोधीवृक्षांच्या मुळा फोफावत चाललेल्या आहेत. जुने जाणते बौद्ध उपासक जे मुळारंभापासूनच सोबत होते, ते या परिभ्रमणाचे साक्षीदार आहेत.
‌ भदंत पंय्याबोधी यांचा सहवास मला गतवर्षीच लाभला. टाळेबंदीनंतर शिथिल करण्यात आलेल्या परिस्थितीवर कोरोनाकाळाने भितीचे सावट पसरवले होते. परंतु भिक्षू संघाला कसले दुःख आणि कसले भय! त्यानी दुःख वेदनेने व्याकूळ जनतेला जवळ केले. दिलासा दिला. ममतेने गोंजारले. एकीकडे बांधकाम चालू होते, निधी कमी पडत होता आणि उपासकांशी त्यांच्या दैनंदिन जीवनातील दुःखाशी लढायचे पण होते. दाभडनंतर खुरगाव हेही एक बौद्धांचे पवित्र स्थान बनू पाहत आहे. तिथे वर्षातील बाराही महिन्याचे श्रामणेर प्रशिक्षण चालत आहे. त्यामुळे तिथे शासनाच्या काही सुविधा मिळणे क्रमप्राप्त आहे. याठिकाणी शहरातील, शहराशी संबंधित तसेच परजिल्हा परिसरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी तथा राजकीय नेत्यांनी भेटी दिलेल्या आहेत. आश्वासने पण दिलेली आहेत. काही अत्यावश्यक सुविधा इथे उपलब्ध होणे आवश्यक आहे. भिक्खू निवास, प्रशिक्षण भवन आकाराला आले आहे. हे सगळे उपासकांच्या दान पारमितेमुळे शक्य झाले आहे. आपण भिक्षूंना दान दिले तरच ते जगतील, चारिका करतील, धम्म प्रसाराचे कार्य करतील.
लोकांना दान पारमितेसह दस पारमितांचे पालन करण्याची शिकवण मिळावी, संघाला विविध प्रकारचे दान मिळावे, धम्मदेसनेतून धम्मज्ञानाचे दान प्राप्त होते. यासाठी मी भिक्खू संघाकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर धम्मसंदेश व धम्मदान यात्रेची संकल्पना मांडली. लगेच संघाने यास मान्यता दिली. या यात्रेची उद्दिष्टे तयार करण्यात आली. भिक्खू संघ गावात आल्यानंतर उपासक उपासिकांनी आर्थिक दान करावे, तसेच विविध प्रकारच्या धान्याचेही दान केले जावे, युवकांनी श्रामणेर दीक्षा घ्यावी, प्रत्येक गावातून एक कायमस्वरूपी भिक्खूची निर्मिती झाली पाहिजे. दोन तीन पैकी एक अपत्याला भिक्खू संघाकडे दान केले पाहिजे. ही मुलभूत उद्दिष्टे घेऊन भिक्खू संघाची यात्रा गावागावांतून फिरते आहे. याची सुरुवात माझ्या कुरुळा या गावातून झाली. सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त ही यात्रा गावात नेण्यात आली होती. बावीस भिक्खूंचा ताफा घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यात आली. भदंत पंय्याबोधी थेरो आणि भंते संघरत्न यांचीही धम्मदेसना संपन्न झाली. ही एका नव्या चळवळीची सुरुवातच होती.
बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी नांदेड
जिल्ह्यात सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक बालिकांसाठी धम्मसंदेश व धम्मदान यात्रा काढण्यात आली होती. या पहिल्या टप्प्यातील यात्रेचा प्रारंभ कंधार व तालुक्यातील मौजे कुरुळा येथून झाला होता. त्यानंतर मुदखेड, गायतोंड, तळणी, धानोरा, लिंबगाव, लिंबगाव कँप, वाडी, चिखली, निळा, आलेगाव, आसेगाव, सुनेगाव, हिवरा खु., पिंपरी महिपाल, मरळक, सुगाव, रहाटी, जैतापूर, पिंपरण, नाळेश्वर,लोहा तालुक्यातील खडकमांजरी, बोरगाव कोल्हा, जवळा देशमुख आदी शंभराहून अधिक गावांतून ही यात्रा नेण्यात येऊन विविध विषयांवरील सामाजिक प्रबोधन करण्यात आले. या यात्रेला अनेक ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका यांचा प्रतिसाद लाभला होता. कोरोनाचा काळा काळ वगळला तर आणखी तीन-चार टप्प्यांत धम्मसंदेश व धम्मदान यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ठरविण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यातही अर्धापूर तालुक्यातील रोडगी येथून प्रारंभ झाला. त्यानंतर पुन्हा खडकमांजरी येथे धम्मसंदेश व धम्मदान यात्रेला पाचारण करण्यात आले.
सद्या खुरगाव येथे दर महिन्याला पौर्णिमोत्सव हा कार्यक्रम होत असतो. श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची उद्दिष्टे आणि पुढील संकल्प यात्रेच्या माध्यमातून गावोगावी आणि घरोघरी गेली आहेत. दर पौर्णिमेला श्रामणेर शिबिर आयोजित केले जाते. त्यात अधिकाधिक उपासकांना श्रामणेर दीक्षा दिली जाते. आत्तापर्यंत शेकडो उपासकांनी श्रामणेर पंय्याबोधी यांच्या नेतृत्वाखाली दीक्षा घेतली आहे. अजूनही दीक्षेचे सोहळे सुरुच आहेत. या व्यतिरिक्त कुणालाही कधीही दीक्षा घेऊन बौद्ध जीवन जगता येते. चोवीस तास अष्टोप्रहर हे केंद्र सुरुच आहे. तसेच अनेकवेळा पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम झालेले आहेत. पौर्णिमेला धम्मदेसना, व्याख्यानमाला, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, भोजनदान, कविसंमेलने कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. अनेक उपासक उपासिकांनी तनमन धनाने योगदान दिले आहे; देत आहेत. आंबेडकरी चळवळीतील गायक गायिकांच्या माध्यमातून बुद्ध भीम गीत गायनाने धम्मसेवा दिली जाते. या कार्यक्रमाला धम्म चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती असते. महिलांचाही लक्षणीय सहभाग असतो. आता एकाच वेळी एक हजार उपासकांना श्रामणेर दीक्षा देण्याचा संकल्प आहे. भिक्खूनी प्रशिक्षण केंद्राची स्थापनाही करण्यात येत आहे. जवळपास दोन लाख लोक कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा मोठा कार्यक्रम देण्याचा संकल्प भंतेजींनी केला आहे. एका भव्य विहाराची निर्मिती करण्याचा मानस आहे. जीवन जाणिवांचे सौंदर्यदृष्टी लाभलेल्या भंतेजींचे सर्व कामना, सर्व संकल्प पूर्णत्वास जावोत ह्याबद्दल सुयश चिंतीतो आणि वाढदिवसानिमित्त अनेकोत्तम मंगल कामना व्यक्त करतो. थांबतो.
– गंगाधर ढवळे, नांदेड
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *