ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माता व बालसंगोपन केंद्राच्या इमारतीचे पालकमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

April 10, 202216:29 PM 30 0 0

जालना : जालना शहराच्या मध्यभागी असलेल्या जिल्हा महिला रुग्णालयात जिल्हाभरातून सामान्य व गोरगरीब कुटूंबातील महिला उपचारासाठी येत असतात. या रुग्णालयात महिलांच्या उपचारामध्ये कुठल्याही बाबीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही देत या ठिकाणी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या. जिल्हा महिला रुग्णालयाच्या परिसरात माता व बालसंगोपन केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. टोपे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
व्यासपीठावर माजी आमदार अरविंद चव्हाण, उपसंचालक आरोग्य श्रीमती गोलाईत,जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.विवेक खतगावकर,डाॅ.राजेंद्र पाटील, शहा आलम पठाण, नानाभाऊ ऊगले, जयंत भोसले,राजेश जाधव,पापासेठ अग्रवाल,नंदकिशोर जांगडे,पप्पूसेठ दाड आदिंची उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्ह्याच्या विकासात भर टाकत आरोग्य सेवेत अधिक भर पडणाऱ्या 100 खाटांच्या माता व बाल संगोपन केंद्राची नवीन इमारत या ठिकाणी उभी रहात असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रसुतीसाठी आलेल्या महिलांसह त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय या ठिकाणी होणार आहे. अनेकवेळा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक असते. ही नवीन इमारत पूर्ण झाल्यास प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची मोठी सोय यामुळे होणार असून या इमारतीचे काम गतीने करण्यात येऊन एक देखणी इमारत उभी करण्यात यावी. या ठिकाणी रिक्त असलेल्या वर्ग-3, वर्ग-4 च्या कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय घेण्यात येत असून या ठिकाणी कंत्राटी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून अधिकारी,कर्मचारी तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य उपसंचालकांना यावेळी दिल्या.
हृदयाच्या बाबतीतल्या तपासण्या मोफत स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी कॅथलॅबची उभारणी
जालना जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यात येत असून जिल्हा सामान्य रुग्णालयात खासगी रुग्णालयाच्या तोडीच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रियागृहसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम करण्यात येत आहे. केवळ जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे तर तालुका स्तरावरही आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. हृदयाबाबतीत करण्यात येणाऱ्या तपासण्यासाठी राज्यातील जालना, नांदेड, बारामती व गडचिरोली या चार ठिकाणी कॅथलॅब उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली असून यासाठीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील गोरगरीब व सर्वसामान्यांना हृदयाच्याबाबतीतल्या सर्व तपासण्या मोफत स्वरूपात उपलब्ध व्हाव्यात यासाठी कॅथलॅब उभारणीसाठी आवश्यक असलेली साधनसामुग्री खरेदीची प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य प्रशासनाला दिल्या.
जालन्यात कर्करोग युनिट उभारणार
मराठवाड्यासाठीच्या विभागीय मनोरुग्णालयासाठी निधी मंजूर करण्यात आला असून त्याचेही भूमिपूजन लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगत जालना जिल्ह्यासह राज्यातील वीस जिल्ह्यासाठी कर्करोग युनिट येत्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. कर्करोगाचे निदान वेळेत करण्याची सोय यामुळे होणार आहे. महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने केंद्र व राज्य शासनाच्या अनेकविध योजना आहेत. या योजनाचा लाभ गोरगरीब महिलांपर्यंत पोहोचवा, यासाठी या योजनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबरोबरच योजनांचा प्रचार, प्रसार सर्वदूर करण्यात यावा, असेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
महिलांमधील कर्करोग तपासणीसाठी जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट राबवणार
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास हा आजार निश्चित बरा होऊ शकतो. यासाठी महिलांमध्ये आढळून येणाऱ्या ब्रेस्ट, सर्वायकल व माऊथ कर्करोगाच्या तपासणीचा पायलट प्रोजेक्ट संपूर्ण जालना जिल्ह्यात टप्प्या-टप्प्याने राबवण्यात येणार असून ज्या महिलांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळून येतील त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जालना,अंबड, घनसावंगी, दुसऱ्या टप्प्यात बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद व तिसऱ्या टप्प्यात परतूर व मंठा तालुक्याचा समावेश करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या स्वच्छतेचा दर्जा सुधारणार
जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, जिल्हा रुग्णालय तसेच महिला रुग्णालयातील स्वच्छतेचा दर्जा अधिक प्रमाणात सुधारावा यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातून स्वच्छतेसाठी विशेष निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. या निधीतून ही रुग्णालये दिवसातून तीन वेळेस विशिष्ट पथकाकडून स्वच्छ करून घेण्यात येणार आहेत. महानगरामध्ये असलेल्या खासगी रुग्णालयातील स्वच्छतेच्या बरोबरीने या सर्व शासकीय रुग्णालतील स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *