ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

यांत्रिकी विभागातील भूषण नांदेडचे सुपुत्र अधीक्षक अभियंता : पुंडलीक थोटवे

July 5, 202112:35 PM 85 0 0

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रावणगाव हे अधीक्षक अभियंता पुंडलीक थोटवे यांचं गाव. घरची परिस्थिती अत्यंत जेमतेम . आई-वडील दोघेही निरक्षर. घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नसतानाही प्रतिकूल परिस्थितीत त्याकाळी अभियांत्रिकी शिक्षण घेऊन आपल्या कर्तुत्वाने त्यांनी राज्याच्या यांत्रिकी विभागात अत्यंत उत्कृष्ट योगदान दिले आहे. या खात्यातील एक उत्कृष्ट अधीक्षक अभियंता म्हणून त्यांची ख्याती आहे. खरं तर त्यांचा संघर्षमय प्रवास अभ्यासण्यासारखा आहे. शिक्षणाप्रतीची त्यांची तळमळ पाहून त्यांना पुढील शिक्षणासाठी नांदेड जवळील वडेपुरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल केले. तेथे त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. नंतर पाचवी ते सातवीपर्यंत देगलूर येथे त्यांचे शिक्षण झाले व पुढे आठवी ते दहावी भोकरच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांनी शिकून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. नंतर अकरावी-बारावी देवगिरी महाविद्यालय औरंगाबादमध्ये व पुढे शासकीय इंजीनियरिंग महाविद्यालय औरंगाबाद येथे त्यांनी बी. इ. मेकॅनिकल ही पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त केली. हे सर्व शिक्षण त्यांनी होस्टेलमध्ये राहून पूर्ण केले. या त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये माजी आमदार नागनाथराव रावणगावकर व त्यांचे मामा बापूराव माधवराव गवलवाड यांचे फार मोठे योगदान आहे.

मामा गवलवाड शिक्षक असल्याने त्यांनी त्यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षणाची बीजे रोवली. आज थोटवे साहेब या उच्चपदापर्यंत पोहोचू शकले ते केवळ त्यांच्याकडे असलेल्या बुद्धीमतेने. त्यांना यांत्रिकी जलसंपदा या क्षेत्रातील उत्तम ज्ञान तर आहेच शिवाय सगळ्यांशी मिळून मिसळून घेऊन या खात्याचा लौकिक कसा वाढेल यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, त्यामुळे मंत्रालयापासून त्यांचे सर्वांशी घनिष्ठ संबंध आहेत. पुणे येथील यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता पुडंलिक थोटवे यांनी आपल्या सेवेत राज्यातील जलसंधारणाच्या कामात मोठे योगदान दिले आहे. त्यांनी केलेली अनेक कामे महत्त्वपूर्ण ठरली आहेत. अनेक जलसिंचन प्रकल्पाची दुरुस्ती, द्वारा उभारणी, नाला सरळीकरण, कालवा स्वच्छता, धरण माती काम, तलावातील गाळ काढणे या कामात त्यांनी पुढाकार घेऊन कामे केल्याने शासनाची कोट्यावधी रुपयांची बचतही झाली आहे. त्यांनी जलसंधारण क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी उपक्रमशील प्रशासक या सदरात मांडणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जलसिंचनात शासनाच्या यांत्रिकी विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 1957 पासून राज्यात जलसंपदा विभागामार्फत अनेक मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील लाखो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले. या सिंचनाच्या सोयी-सुविधेमुळे शेतीचे उत्पन्न वाढले, परिणामी राज्याची कृषी व्यवस्था बळकट होण्यास मदत झाली.
राज्यात विविध ठिकाणच्या सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी विविध प्रकारची परदेशी बनावटीची आयात केलेली अवजड व हलकी यंत्रसामुग्री कार्यरत होती. सदर संयंत्रांच्या परिचलन देखभाल व दुरुस्ती कामांसाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा शासना अंतर्गत कार्यरत नसल्यामुळे यंत्रसामुग्रीच्या व्यवस्थापनासाठी शासनाने 19 जून 1959 रोजी यांत्रिकी विभागाचे एक मंडळ व दोन विभागांसह यांत्रिकी संघटनेची निर्मिती केली व जलसंपदा विभागांतर्गत मोठ्या प्रमाणावर सुरु केलेल्या प्रकल्प उभारणी कामासाठी आवश्यकतेनुसार विस्तार करण्यात आला 20 ऑगस्ट 1981 रोजी मुख्य अभियंता (यां) कार्यालयाची नाशिक येथे स्थापना झाली. तसेच कामाचे आवश्यकतेनुसार इतर चार मंडळांची स्थापना करण्यात आली. यातील पुणे यांत्रिकी मंडळाचे अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे यांनी मंडळांअंतर्गत अनेक कल्पक, प्रयोगशील उपक्रम राबवून जलसंधारणासाठीचे अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. याची दखल घेऊन त्यांना शासनाच्यावतीने अनेकदा गौरविण्यात आले आहे. त्यांनी 1990 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक अभियंता म्हणून यांत्रिकी विभागात सरळसेवेने प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत उप कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता आणि आता अधीक्षक अभियंता म्हणून उल्लेखनीय सेवा केली आहे.
त्यांनी सुरुवातीला नांदेड येथे विष्णुपुरी प्रकल्पावर काम केले. या प्रकल्पाच्या द्वार उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विष्णुपुरी प्रकल्प हा आशिया खंडातील मोठा प्रकल्प म्हणून गणल्या जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या गोदावरी नदीवरील प्रकल्पांच्या पंपगृहाच्या द्वार उभारणीत थोटवे यांनी आपल्या कुशल बुद्धीमतेने भरीव योगदान दिले. पुढे त्यांनी लोअर दुधना प्रकल्पात काम केले. येथे त्यांनी धरणांचे मातीकाम करण्यात पुढाकार घेऊन हे धरण पूर्णत्वास नेण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. जलसिंचनात वाढ करण्यासाठी कालव्याची स्वच्छता करणे, जेणे करुन पाण्याच्या वहन क्षमतेत वाढ होते, त्यासाठी त्यांनी आपल्या सेवेत अनेक कालव्यासाठी स्वच्छता मोहिमा राबवून कालव्याची पाणी वहनक्षमता वाढविली. अनेक कालव्यांचे धरणावरील द्वारांचे उच्चालक निर्मिती डिझाईन, मॅन्फॅक्चरिंग यासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे.


* सन 2002-03 या वर्षांत कालवा स्वच्छता मोहीम खात्यामार्फत उत्कृष्टपणे राबवून शासन खर्चात लक्षणीय बचत केल्याबद्दल यांत्रिकी संघटनेस मुख्यमंत्री निधीतून पुरस्कार मिळाला. या कामामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
* MIDC/पुणे मनपा/बृहन्मुंबई म.न.पा. यांच्या मोरबे प्रकल्प, बृहन्मुंबई मनपा, मध्यवैतरणा प्रकल्पावरील उच्चालक व्यवस्था, पुणे मनपा मुळा-मुठा बंडगार्डन बंधार्‍यावरील उच्चालक व्यवस्था इत्यादी कामे विहित वेळेत व योग्य प्रकारे पूर्ण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
* घाटघर उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या निम्न धरणातील तिरप्या गाळ्यामध्ये असलेल्या आपत्कालीन द्वाराच्या परिचलनाकरिता 35 टन क्षमता ईओटी क्रेनचे वैशिष्ट्यपूर्ण संकल्पन करुन निर्मितीचे काम अल्पावधीमध्ये पूर्ण केले. यांत्रिकी संघटनेअंतर्गत अशा प्रकारचे संकल्पन व निर्मितीची कामे पहिल्यांदाच झाली.
घाटघर जलविद्युत प्रकल्पाच्या उल्लोळक विहिरीवरील (Surge Well) 20 टन क्षमतेच्या व 157 मी. लिफ्ट असलेल्या के्रनचे संकल्पन व निर्मितीची कामे विहित कालावधीत यशस्वीरित्या पूर्ण केली, त्यामुळे जलसंधारणाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
* सन 2007 मध्ये यांत्रिकी मंडळ (द्वारे) पुणे या मंडळाची सन 2006-07 मधील निर्मितीची वार्षिक क्षमता 3150 मे. टन इतकी असताना, प्रत्यक्षात 5101 मे. टन इतके निर्मितीचे काम या मंडळाकडून पूर्ण क्षमतेत देखील वाढ झाली. या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन सन 2007 चा सांघिक पुरस्कार तत्कालीन राज्यपाल मा. एस.एम. कृष्णा व तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री मा. आर. आर. पाटील व जलसंपदा मंत्री मा. अजित पवार यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आला.
* कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा क्र. 4 बी लेक टॅपिंगच्या कामासाठी 100 मी. खोल सर्जवेलवरील ईओटीक्रेन ची संकल्पन, निर्मिती, वाहतूक, उभारणी व परिचलन इत्यादी कामे तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केल्यामुळे सदर लेक टॅपिंगचे काम 1 वर्षे अगोदर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात महत्त्वाची मदत झाली. त्यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची बचत झाली. याबद्दलही त्यांचे विशेष कौतुक झाले.
* तत्कालीन मा. मंत्री (जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य) यांचे निर्देशानुसार को. प. बंधार्‍यामध्ये 100 टक्के पाणीसाठा करण्यासाठी, विशेष मोहिमे अंतर्गत एकूण 26860 नग को. प. बर्गे निर्मिताचे काम पुणे यांत्रिकी मंडळास सोपविण्यात आले होते. पावसाळा हंगाम संपण्यापूर्वी 26935 नग नवीन बर्गे निर्मिती व 5753 नग जुने बर्गे दुरुस्ती असे एकूण 32688 नगांची निर्मिती तथा दुरुस्ती कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण झाल्याने 688.15 द.ल.घ.मी. एवढा पाणी साठा (सन 2018) करणे शक्य झाले. या कामाबद्दल मा. कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे, यांचेकडून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात त्यांना गौरविण्यात आले.
* भारत सरकार राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 करिता जलसंपदा व जलव्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबाबत महाराष्ट्र राज्यास बेस्ट स्टेट (Best State) म्हणून प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याला हा पुरस्कार मिळण्यात यांत्रिकी मंडळ पुणे या कार्यालयाचे मोलाचे योगदान असल्यामुळे मा. प्रधान सचिव (जलसंपदा), मंत्रालय, मुंबई यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले आहे.
* उपसा सिंचन योजनेअंतर्गत पंपिंग यंत्रसामुग्रीच्या संकल्पनासाठी 17 योजनांची परिगणके तयार करुन उपसमितीमार्फत स्थायी समितीकडे सादर केल्याने राज्याच्या सिंचन क्षमतेत मोठी वाढ झाली.
* राज्यातील विविध प्रकल्पांवरील सेवाद्वारे/आपत्कालीन द्वारे/थोपद्वारे/ उभीउचलद्वारे इत्यादी प्रकारच्या जलद्वारांकरिता एकूण 66 नग उच्चालकांचे संकल्पन करुन निर्मिती कामे केल्याने तसेच राज्यातील एकूण 45 प्रकल्पांवरील द्वार उच्चालकांची संकल्पने व रेखाचित्रांची तपासणी विहित वेळेत करुन मूल्यार्पणाची कामे पूर्ण केल्याने एक प्रकारे जलसिंचनासाठी नवसंजीवनी मिळाली.
* कार्यालयात GeM Portal मार्फत खरेदी प्रक्रिया राबविल्यामुळे शासन खर्चात 20 टक्के पर्यंत बचत झाली आहे. याची दखल प्रधान सचिव (जलसंपदा), यांनी घेऊन प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले. थोटवे यांचे पुणे जिल्ह्यातील माळीण दुर्घटनेच्या प्रसंगीही यांत्रिकी विभागाची यंत्रसामुग्री घटनास्थळी वेळेत पाठवून आपत्कालीन परिस्थितीत महत्त्वाची कामगिरी बजावण्यात आली.
अधीक्षक अभियंता यांत्रिकी मंडळ, पुणे येथील कार्यालयात त्यांनी ई-बीम सेवा प्रणालीचे योग्य व्यवस्थापन केले आहे. त्या माध्यमातून किती तास मशीन चालल्या. त्यांचे लॉक बुक, डेबीट मेमो, याची माहिती तात्काळ होण्यास मदत होते. कायालयात ई-प्रणालीचा वापर कार्यालयात सुरु केल्याने तत्पर व विहित वेळेत फाईलची कामे मार्गी लागण्यास मदत झाली. मशीनरीसाठी डिझेल पेट्रोकार्डचा वापर केल्याने इंधनात कपात होऊन त्यातील भ्रष्टाचार संपुष्टात आला. जेसीबी, पोकलॅण्ड, डोअर एसक्युलेटर आदि यंत्र सामुग्रीचा योग्य वापर झाल्याने या विभागाचे राज्यात वेगळेपण ठरले आहे.
थोटवे यांना अनेक पुरस्कार
अधीक्षक अभियंता पुंडलिक थोटवे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबदल त्यांना शासनाने दोन वेळा आगाऊ वेतनवाढी तसेच विविध प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे. रोटरी क्लब, स्वयंदीप संस्था, दुबई येथील सिटॅक्स कंपनी आदि संस्थांनी त्यांना उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविले आहे. मा. मुख्यमंत्री, मा. राज्यपाल खात्याचे मंत्री, सचिव यांनीही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेकदा गौरविले आहे.
नीरा-डावा कालव्याचे सौंदयीकरण बारामती शहरातून वाहणार्‍या नीरा डावा कालव्याचे मजबूतीकरण, नूतनीकरण करण्याचे काम उपमुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार यानी हाती घेतले. या कालव्याच्या सौंदयीकरणासाठी यांत्रिकी विभागाने साठवण तलावातून काढलेला मुरुम वापरुन या कालव्याचे मजबुतीकरण केले. यासाठी 28 पोकलोन, 60 टिपर, 4 व्हायब्रेटर वापरुन हे काम करण्यासाठी यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता थोटवे उपलब्ध करुन दिले. त्यामुळे या कालव्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.

– डॉ. बबन जोगदंड,
प्रभारी अधिकारी, यशदा, पुणे
mo. 9823338266.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *