ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाजपाचा पराभव आणि रणनीतीचा विजय

May 5, 202113:41 PM 112 0 0

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकीचा निकाल लोकशाहीचा, सत्तांतराचा आणि परिवर्तनाचा आहे असे मानले जात आहे. या निवडणुका काही समग्रपणे विकासाच्या मुद्द्यावर झालेल्या नाहीत. कोरोनाच्या कहरात माणसे मरत असताना आणि स्मशानभूमी धुमसत असतांना पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यांसह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात निवडणुका झाल्या. काही ठिकाणी पोटनिवडणूकाही झाल्या. प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडविला आणि तिसऱ्यांदा सत्ता हस्तगत केली. त्याचबरोबर डावे आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. डाव्यांनी केरळमध्ये सत्ता राखली परंतु काँग्रेसने आपले अस्तित्व गमावल्याचे चित्र आहे. गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या अण्णा द्रमुकचा पराभव करीत तामिळनाडूमध्ये द्रुमुकने सत्ता हस्तगत केली. बंगालमध्ये निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करणाऱ्या भाजपला आसाम आणि पुदुच्चेरी वगळता एकंदरीत महाप्रभाव दाखवता आला नाही. फार तर पंढरपूर व बेळगावची पोटनिवडणूक भाजपासाठी जमेची बाजू मानायला हरकत नाही. या निवडणुकीचे एकंदरीत विश्लेषण लोकशाहीचा विजय सत्तांतराची आणि परिवर्तनाची तसेच सत्तांतराची परंपरा खंडित करण्याचीही ही निवडणूक होती.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी एकहाती सत्ता मिळवली. भाजपच्या साम दाम दंड भेद या रणनितीला बळी न पडता विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांनी नेते पक्ष सोडून जात असतानांही कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे विणून मुत्सद्दीपणे डावपेच आखले. बंगालमधील ही निवडणूक मोदी शहा यांच्याविरुद्धच्या संघर्षाचीच होती. त्यांची कोणतीही रणनीती, डावपेच वा जादू इथे चालली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात दीदींबद्दल आकर्षण निर्माण होत राहिले. बंगाली अस्मिता जागती ठेवत भाजप हा उपरा पक्ष असून भाजपसारख्या पक्षाला वा त्यांच्या नेत्याला बंगाल शरण जाणार नाही. त्यांच्या हातात सत्ता गेली तर बंगाल विकल्या जाईल ही भूमिका सक्षमपणे मांडली गेली. भाजपाविरोधात अल्पसंख्याक व इतर सहिष्णू हिंदू यांच्या मदतीने जखमी असतांनाही व्हीलचेअरवरील रोडशो, प्रचारसभा यांतून महिलावर्गाचेही समर्थन मिळवले. त्याउलट भाजपने अबकी बार २०० पार ही वल्गना केली. दो मई दीदी गई या घोषणा दिल्या. दीदी ओ दीदी असे म्हणून हिणवले गेले. पाय जखमी झाल्याने साडीऐवजी बरमुडा वापरावा अशी खिल्ली उडविली होती. हे बंगाली जनतेला रुचले नाही. परंतु हिंदुत्वाची लाट, धार्मिक ध्रुवीकरण तसेच जातीय समीकरणाच्या जोरावर तीन वरुन भाजपाने मोठी झेप घेतली आहे.

भाजपाने तामिळनाडूत अण्णा द्रमुक सोबत युती करुन दक्षिणेत आपले हात पाय पसरण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाला यात यश आले नाही. भाजपला केवळ चार जागा मिळाल्या. जयललिता यांच्या निधनानंतर म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या अण्णा द्रमुकला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीही त्यांनी ६७ जागा जिंकल्या आहेत. जयललितानंतर पक्षात झालेली गटबाजी पक्षनेत्यांना रोखता आलेली नाही. गटबाजीमुळेच पराभव झाला असे मानल्या जात आहे. याचा फायदा द्रुमुकला झाला. या विजयाचे शिल्पकार एम. के. स्टॅलिन ठरले. लोकांमध्ये काम करुनच सत्ता भोगावी अशी त्यांचे पिता करुणानिधी यांची भूमिका होती. ती स्टॅलिन यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर स्टॅलिन यांनी द्रुमुकची सारी सूत्रे हाती घेत लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी राज्यभर यात्रा काढली. या निवडणुकीत काँग्रेस तथा डावे पक्ष यांना सोबत घेऊन आपले लक्ष्य साध्य केले. स्टॅलिनप्रमाणेच केरळमध्ये पी. विजयन हे सत्तांतराची परंपरा खंडित करण्याची ऐतिहासिक किमया साधणारे किमयागार मानले जात आहेत. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत एलडीएफ नंतर युडीएफ आणि युडिएफ नंतर एलडीएफ असा सत्ताबदलाचा कौल देण्याची चार दशकांची केरळमधील राजकीय परंपरा यावेळी मुख्यमंत्री पी. विजयन यांनी खंडित केली आहे. या निवडणुकीत शक्य झाले नसले तरी भाजपला दक्षिणेतील दिग्विजयासाठी वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

प. बंगालमध्ये नसली तरी आसाममध्ये भाजपची खेळी यशस्वी ठरली! ही निवडणूक सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तरुण गोगोई यांच्या निधनानंतर येथील काँग्रेस सैरभैर झाली होती. नंतरच्या काळात सावरली असली तरी स्थानिक पातळीवर सक्षम नेतृत्व नसल्याची उणीव कायम होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आसाममध्ये चहाच्या मळ्यात काम केल्याने प्रियांका गांधी ती उणीव भरून काढू शकत नाहीत किंवा राहुल गांधी काही करिश्मा करतील असे काही चित्र दिसत नव्हते. याउलट भाजपाने साम दाम दंड भेद या रणनितीचा अवलंब करीत निवडणूक जिंकली. भाजपकडे सक्षम नेतृत्व होते. मतांचे ध्रुवीकरण साधण्यात भाजप आधीच पटाईत आहे. कांग्रेसने आखलेल्या दुबळ्या रणनीतीला छेद देण्यात भाजपची खेळी यशस्वी झाली. आसाम गण परिषदेच्या पाच आमदारांच्या जागा भाजपने स्वतःकडे ठेवून आपल्या कोट्यातील मुस्लिम बहुल आठ जागा आसाम गण परिषदेला दिल्या. बोडो पीपल्स फ्रंटला ऐनवेळी सोडचिठ्ठी देऊन यूपीपीएलसोबत युती केली. निवडणूकीत प्रत्येक टप्प्यावर भाजपा वेगवेगळी रणनीती आखत असते. हे भाजपविरोधी पक्षांना प्रत्येकवेळी जमेलच असे नाही. ते जमण्यासाठी भाजपच्या डोक्याने विचार केला पाहिजे.

पुदुच्चेरी हे भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार ठरले आहे. तीस आमदारांच्या विधानसभा निवडणुकीत सोळा हा जादूई आकडा ठरतो. भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी आपला पक्ष घेऊन निवडणूक लढविली. त्यामुळे त्यांना फायदाच झाला. मागील निवडणुकीत भाजपला एकही जागा नव्हती परंतु पुदुच्चेरीसारखी लहान विधानसभा सुध्दा लाभदायक आहे हे भाजपने हेरले होते. कर्नाटकच्या पुढे भाजपला जाता आले नसले तरी आणि तामिळनाडूत काही करता आले नसले तरी दक्षिणेकडे जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून भाजपने पुदुच्चेरीला निवडले. यादृष्टीने ही निवडणूक त्यांच्यासाठी महत्वाचीच होती. पंढरपूर असो की बेळगाव या पोटनिवडणूकाही भाजपसाठी महत्वपूर्णच होत्या. एवढेच नव्हे तर कर्नाटक, गुजरात, मिझोराम, तेलंगणा येथील पोटनिवडणुकीकडे भाजप दुर्लक्ष करीत नाही. एखाद्या निवडणुकीत विजयाचा किंवा पराभवाचा परिणाम पुढील काळात येणाऱ्या निवडणुकांवर होत असतो. राजकीय समीकरणंही बदलत असतात. या निवडणुकीत काही संकेत स्पष्ट मिळाले आहेत. अचूक रणनीती तयार करण्यात यश मिळाले तर बलाढ्य भाजपचा पराभव
करता येऊ शकतो, हे या निवडणुकीने शिकविले आहे.

– गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *