जालना : छायाचित्रकरांचे जिल्ह्यात उत्कृष्ट काम असले तरी दोन संघटनांमुळे विखुरलेल्या छायाचित्रकारांना एकत्रित करण्याचे काम आपण करणार असून येत्या छायाचित्रकार दिनी सर्वजण एकत्रित आल्याचे दिसतील, असे प्रतिपादन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना केले. जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ छायाचित्रकार स्व. अनंतराव पडोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मातोश्री लॉन्स येथे आयोजित रक्तदान शिबीराप्रसंगी मार्गदर्शन करतांना श्री. खोतकर बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव अंबेकर, भाजपाचे सुनील आर्दड, मार्गदर्शक आनंद वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, शिबीराला आ. कैलास गोरंट्याल यांनीही भेट देऊन छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पुढे बोलतांना श्री. खोतकर म्हणाले की, जिल्ह्यातील छायाचित्रकारांचे काम अत्यंत उत्कृष्ट आहे. जे आहे टिपणे ही एक कला असून ती सर्वांनाच अवगत होत नाही. परंतू जिल्ह्यात छायाचित्रकारांच्या असलेल्या दोन संघटनांमुळे छायाचित्रकार विखुरल्याचे चित्र असून त्यांच्या समस्याही सुटतीलच असेही नाही. संघटन शक्ती ही असायलाच हवी. त्यातूनच आपले प्रश्न सुटू शकतात. त्यामुळेच येत्या छायाचित्रकार दिनास दोन्ही संघटना एकत्रित दिसतील असे काम आपण करणार असल्याचेही श्री. खोतकर म्हणाले. यावेळी बोलतांना श्री. भास्कर अंबेकर म्हणाले की, कोविडच्या काळात रक्तदानाची फार मोठी आवश्यकता असून छायाचित्रकारांनी स्व. अनंतराव पडोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेला रक्तदान शिबीराचा उपक्रम कौतूकास्पद आहे, असे सांगून श्री. अंबेकर यांनी छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. या शिबीरात मोठ्या संख्येने छायाचित्रकारांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. तद्नंतर बीडचे सुप्रसिध्द छायाचित्रकार श्री. आनंद वाघ यांनी पोट्रेट फोटोग्राफी, स्टुडिओ लायटिंग, फॅमिली फोटो शूट, स्टुडिओ टेकिंग मेंकिंग या विषयावर जिल्ह्यातील छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद खानापूरे, मकसुद खान, मसुद राणा, संतोष सिनगारे, मधुसूदन दंडारे, कैलास इघारे, मोहन मिटकरी, संजय कंठाळे, सुरेश चाटे, कृष्णा रोकडे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने छायाचित्रकारांची उपस्थिती होती.
Leave a Reply