नागपूर : करोना नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्यावर केंद्र व राज्य शासनाकडून जोर दिला जात आहे; परंतु गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात लसीकरणाच्या २४ तासांनंतर एका वृद्धाचा, तर काही दिवसांनी दुसऱ्या एका शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून मात्र या मृत्यूंचा लसीकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला जात आहे.
नीलकंठ अवचट (६१) रा. दिघोरी नाका आणि पांडुरंग ऊर्फ बंडू बारेकर (५९) असे दगावलेल्यांची नावे आहेत. बारेकर हे मेडिकलच्या स्वयंपाकगृहात मदतनीस पदावर असले तरी स्वयंपाकीचे काम करत होते. नीलकंठ अवचट यांनी मेडिकलच्या केंद्रात १७ मार्चला लस घेतली. या वेळी कुटुंबातील सदस्याला करोना असल्याचे लपवले. दुसऱ्या दिवशी १८ मार्चला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची प्रकृती अचानक खालवल्याचे सांगत मेडिकलमध्ये आणले; परंतु डॉक्टरांनी तपासले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे समोर आले. प्रतिबंधक लसीचा इतिहास बघता शवविच्छेदनासह अवयवांच्या अंशाचे नमुने हिस्टोपॅथेलॉजीसह इतर तपासणीसाठी पाठवले गेले. या अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
तर पांडुरंग बारेकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलमध्ये लस दिली होती. त्यानंतर तापासह हातात दुखण्याचा त्रास झाला. त्यांनी घराजवळील खासगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्यावर मेडिकलच्या डिझास्टर वॉर्डात उपचारासाठी आणले गेले. येथे रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी सांगितले. मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे.
नीलकंठ अवचट यांनी लसीकरणाच्या वेळी त्याच्या कुटुंबीयांना करोना असल्याचे डॉक्टरांना सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी मेडिकलला आणल्यावर हा प्रकार पुढे आला. त्यांचे शवविच्छेदन झाले असून अहवालातूनच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. तर पांडुरंग बारेकर यांच्या मृत्यूबाबतची माहिती घेतली जात आहे. दोघांच्या मृत्यूनंतरच्या चाचणीत त्यांना करोना असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मृत्यूंचा लसीकरणाशी काहीही संबंध नाही. लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे.
– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल, नागपूर
Leave a Reply