ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

…पण आम्ही तिन्ही पक्ष योग्य पद्धतीने सरकार चालवतोय : अजित पवार

January 8, 202114:14 PM 47 0 0

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी मोठी पोलीस भरती करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरु झालेल्याचं सांगितलं. त्यासाठी एसी-बीसी उमेदवारांना गृहखात्याकडून दिलासा देण्याचं काम होतंय, असंही सांगितलं. तसेच यावेळी बोलताना गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो, अशा सूचनाही अजित पवार यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

अजित पवार बोलताना म्हणाले की, “पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गेल्या सरकारच्या काळात सुरु झालंय. पण खूप अपुरी सुविधा असताना इथं पोलीस कार्य करत आहेत. तुम्हाला सर्व काही द्यायचं आहे, पण कोरोनामुळं खर्च झालाय. लवकरच सुविधा पुरवू” पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “2016 मध्ये नोटबंदी आली. आम्ही तेव्हा विरोध केला. कारण कॅशलेस होणं आपल्या देशात शक्य नव्हतं. आता त्याचा काय फायदा झाला का, या खोलात मी जाणार नाही. पण एक हजारची नोट बंद होऊन दोन हजारची नोट आली. तेव्हा अशी अफवा पसरली होती की, त्या नोटेत चिप लावली असून नोट कुठे ठेवली हे समजणार. आता ते होतंय का, हे सर्वांना माहिती आहेच. पण तुमच्या हातातलं स्मार्ट वॉच तुम्हाला ट्रेस करणार आहे. त्यामुळे कोणता पोलीस कुठं काम करतोय हे ही पोलीस आयुक्तांना समजणार आहे. त्यामुळं आरोग्यासोबत तुम्ही काम व्यवस्थित करताय का? हे ही जाणून घेण्याचा यामागे खरा गेम आहे. मात्र हे पोलीस आयुक्तांनी तुम्हाला सांगितलं नाही.”

माझ्या व्यतिरिक्त कुणाचा फोन आला तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो : अजित पवार

“मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो. वाहनांचं जळीतकांड, वाहनांची तोडफोड, व्यापाऱ्यांना गुंडांकडून होणार त्रास, यासह विविध गुन्हे कायमचे बंद करा. कोणाची हयगय करू नका. एकाला ही पाठीशी घालू नका. माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला, तर मला सांगा, मी त्यांना बघून घेतो.” , असं अजित पवार यांनी पोलिसांना सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, कायद्याच्या चौकटीत राहून करा. असं सांगत असताना, मी ही पोलिसांना तेवढ्याच सुविधा देणं गरजेचं आहे. मी ते करतोय, लवकर महाराष्ट्रातील बेस्ट आयुक्तालय करणार. पण त्या इमारतीतून तसंच बेस्ट काम व्हायला हवं.”

शहरातील सुविधांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “शहरात फिरणाऱ्या प्रत्येक महिलेला आणि सामान्य व्यक्तीला निर्धास्त वाटायला हवं. चोर आले म्हणून पुण्यात दोन पोलीस पळाले, हे किती केविलवाणं आहे. ही घटना सीसीटीव्हीमुळं समाजासमोर आली. पोलीस आले म्हणून चोर पळाले पाहिजेत, पण इथं उलट झाल्याचं सर्वांनी पाहिलं. म्हणून त्या पोलिसांवर कारवाई झाली. पण या घटनेने समाजात पोलिसांची प्रतिमा मलीन झाली. असं पुढं होता कामा नये. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये.”

अजित पवार म्हणाले की, “पिंपरी चिंचवडमध्ये युके स्ट्रेनचे तीन रुग्ण आढळले आहेत. हे एक नवं संकट आलंय. अमेरिका यामुळं हादरली. स्कॉटलंड आणि इंग्लंडवर लॉकडाऊन करण्याची वेळ आली. आता आपण मुंबई विमानतळावर तिकडून येणाऱ्यांना विलगीकरन करतोय. हे त्यांना समजलं तर ते प्रवासी अहमदाबाद, बँगलोर सारख्या दुसऱ्या शहरांतील विमानतळावर उतरून घरी येत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यायला हवं की, हे सर्वांसाठी धोकादायक आहे. केवळ समाजाला नव्हे तर त्यांच्या कुटुंबाचा जीव आधी धोक्यात येणार आहे.”

…पण आम्ही तिन्ही पक्ष योग्य पद्धतीने सरकार चालवतोय : अजित पवार

“नारायण राणे असो की भाजप त्यांनी काहीही बोलावं. पण आम्ही तिन्ही पक्ष योग्य पद्धतीने सरकार चालवतोय. त्यामुळे सरकार पडणार असं म्हणू दे नाहीतर मातोश्रीतून सरकार चालतंय असं म्हणू दे”, असं म्हणत विरोधकांवर अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांच्या गावात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने भाजप सोबत युती केली, हे अतिशय चुकीचं झालंय. याबाबत चर्चा झाली. ज्यांच्या विरोधात आम्ही काम करतोय, त्याबाबत तिथल्या नेत्यांना योग्य सूचना दिलेल्या आहेत. त्या युतीचं कोणीही समर्थन करणार नाही.”

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *