भाग ३
कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांनाच लक्ष्य करणार असल्याचं मानलं जात आहे. असे बोलले जात असतानांच, ती येण्याच्या आधीच गेल्या एप्रिल महिन्यात नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शून्य ते २० या वयोगटातील सात मुलांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर परवा बुधवारी औरंगाबादमध्ये जवळपास ७० बालकांना कोरोना झाल्याचे उघड झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा राज्याला जबर फटका बसला आहे. या लाटेने अधिकतर लहान मुलांना आपल्या विळख्यात घेतले आहे. रोज सुमारे ५०० लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. त्यातील सर्वाधिक मुले ही मुंबईतील आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते १० वर्षे वयोगटातील एक लाख ४७ हजार ४२० लहान मुले तर ११ ते २० वर्षे वयोगटातील ३ लाख ३३ हजार ९२६ लहान मुले आणि तरुण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील काही मुले दगावली पण आहेत. यापुढे यात वाढच होत जाईल पण ती रोखताही येईल. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असली तरी त्यांच्यात रिकव्हरीचे प्रमाणही चांगले आहे. कारण लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्याचप्रमाणे बहुतांश लहान मुलांना इतर कोणताही आजार नसतो. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह आले तरी ३-४ दिवसांत ती बरी होतात. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. पालकांनी मुलांकडे अधिक लक्ष द्यावे. साधा सर्दी खोकला ताप आला तरी तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेतले पाहिजेत.
बहुतांश मुलांना कोरोनाची लागण त्यांच्या पालकांकडून झाली आहे. बरेच कोरोनाबाधित हे घरीच विलगीकरणात राहत असल्याने त्यांच्यापासून त्यांच्या मुलांना लागण होते. लहान मुले पॉझिटिव्ह आढळली तरी ती बहुतांशी निरोगी असल्याकारणाने बरीही होत आहेत. यात पालकांवर अतिमहत्वाची जबाबदारी आहे. तेच प्रसार होण्यापासून रोखू शकतात. जसं सर्दी -खोकला किंवा उलट्या – जुलाब विषाणूमुळे होतात, तसाच कोरोनाविषाणूही एकप्रकारचा विषाणूच असल्याचं त्यांना सांगायला हवं. एव्हाना मुलांना त्याबद्दल सर्व काही कळलेच असेल. पालकांनी याविषयी मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची गरज आहेच. कोरोना विषाणूंसारख्या प्रत्येक मोठ्या गोष्टीविषयी मुलांशी नेमकं कसं बोलायचं हे त्यांचं वय किती आहे, यावर अवलंबून आहे. लहान मुलं, विशेषतः सात वा सहा वर्षांपेक्षा कमी वय असणारी मुलं त्यांच्या आजूबाजूला होत असलेल्या घटनांविषयींच्या चर्चांमधून अनेक गोष्टी शिकत असतात. कारण त्यांचे आई-वडीलही या घटनांविषयी बोलत असतात. टीव्ही, मोबाईलवर येणाऱ्या बातम्या किंवा परिसरातील अप्रिय घटना मुलांसाठी हे सगळं घाबरवून टाकणारं ठरू शकतं. सगळ्यात आधी पालकांनी मुलांना दिलासा द्यायला हवा. नेमकं काय होणार आहे हे आता आपणा कुणालाही जास्त माहीत नाही. पण मुलांना ती सुरक्षित असतील, सगळेजण ठीक असतील याची हमी द्यायला हवी. काहीजण आजारी पडू शकतात, पण त्यापेक्षा जास्त काही घडणार नसल्याचं त्यांना सांगितले पाहिजे.
मुलांना याचा संसर्ग होईल की नाही याविषयी पालकांना माहिती नसलं तरी आशावादी असणं महत्त्वाचं आहे. उगीच काळजी करत राहू नये. फक्त मुलांना दिलासा देऊन भागणार नाही. त्यांना सशक्त बनवायला हवं. संसर्गाचा धोका टाळण्यासाठी काय करायला हवं हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. गोष्टी आपल्या नियंत्रणात असल्याची जाणीव मुलांना करून द्यावी. मुलांना हे सांगायला हवं की काही गोष्टी स्वतःच्या स्वतः करूनही ती स्वतःला आणि सगळ्यांनाच निरोगी ठेवू शकतात. म्हणजे वारंवार हात धुणं, खोकताना तोंड झाकणं…वगेरे. म्हणजे मुलांच्याही लक्षात येईल की आपणही काहीतरी करू शकतो, त्यांना काहीही न करता बसून रहायला सांगणं योग्य नाही, असा विश्वास मुलांच्या मनात निर्माण केल्याने आणि बचावासाठीच्या काही गोष्टी त्यांना शिकवल्याने या आजारापासून स्वतःचं आणि कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपणही काही करू शकतो, याची जाणीव मुलांना होईल. पण इतकंच करून भागणार नाही. लहान मुलांमध्ये सगळ्या गोष्टींविषयी कुतुहल असतं. ती सतत प्रश्न विचारतात. कोणत्याही वस्तूला हात लावतात आणि आपलं जेवण – पाणी दुसऱ्यांसोबत वाटून घेतात. याचा अर्थ म्हणजे ‘लहान मुलं ही संसर्ग पसरण्याचं एक मोठं माध्यम असतात आणि आपण त्यांना सुरुवातीपासूनच या महत्त्वाच्या गोष्टी शिकवायला हव्यात. यज्ञयाग, पूजापार्थना, काही गैरसमज किंवा कोरोनाबाबतच्या अंधश्रद्धा यांपासून मुलांना दूरच ठेवले पाहिजे. योग्य वैज्ञानिक माहिती दिल्याने आणि लहान मुलांना स्वच्छताविषयक सवयींविषयी शिकवल्याने एकप्रकारे समाजाच्या सुरक्षिततेलाच हातभार लागतो.
आई-वडिलांमुळेच मुलांचीही काळजी वाढू शकते. लहान मुलांवर त्यांच्या आई-वडिलांचा प्रभाव असतो. जर आई-वडील चिंतेत असल्याचं, काळजीत असल्याचं त्यांना दिसलं, आई-वडील त्यांच्या मित्रमंडळींसोबतही गंभीर चर्चा करताना दिसले, तर लहान मुलंही अनेकदा काळजीत पडतात. म्हणूनच मुलं आजूबाजूला असताना पालकांनी स्वतःच्या वर्तनाविषयी खबरदारी घ्यायला हवी. पण शाळेत घडतं ते पालकांच्या हाताबाहेरचं असतं. सद्या तर शाळा बंदंच आहेत. मुले घरीच आहेत. त्यांना बाहेर कुठेही कोणत्याही कामासाठी पाठवू नये. आपणही बाहेरून आल्यावर खबरदारी घेतली पाहिजे. फारच लहान मुले असतील तर ते स्वत:च कोरोनाचे वाहक होत नाहीत. परंतु त्यांचे पालक होऊ शकतात आणि बालकांच्या शरिरातच उत्परिवर्तन झाले तर घातक ठरू शकते. एखाद्या संसर्गाविषयी किशोरवयीन मुलांशी वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल. कारण जगभरातल्या घडामोडींविषयी जाणून घेण्यासाठी ही मुलं त्यांच्या आई-वडिलांवर तुलनेने कमी अवलंबून असतात. त्यांना बहुतेक माहिती त्यांच्या मित्रपरिवारातून मिळते. ही माहिती मोबाईलवरून घेतली जाते. कोणत्याही परिस्थितीत ते एकमेकांना भेटता कामा नयेत.
मानसशास्त्रानुसार, किशोरवयीन मुलांचं स्वतःचं वेगळं जग असतं. ते त्यांच्या वयाच्या सोबत्यांवर अवलंबून असतात. पण त्यांच्याबाबतची वेगळी गोष्ट म्हणजे या वयातली मुलं जास्त व्यवहार्य विचार करू शकतात. सगळं काही ठीक आहे, काळजी करायची गरज नाही असं १४ वर्षांच्या मुलाला सांगून भागणार नाही. कारण असं सांगितल्यावर तो उलट तुम्हाला म्हणेल, तुम्हाला काहीच माहीत नाही. पण मुलं कोणत्याही वयाची असोत, एक गोष्ट सगळ्याच मुलांना लागू होते. तुम्ही त्यांच्यासाठी कशी वातावरण निर्मिती करता, यावर सगळं अवलंबून असतं. आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट मोकळेपणाने बोलण्याचं स्वातंत्र्य तुम्ही मुलांना द्यायला हवं. इतका मोकळेपणा असायला हवा.
कोरोनाचा तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक लहान मुले प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते; परंतु दुसऱ्या लाटेत १९ वर्षापर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी महिन्यात नागपुरात ९०३, फेब्रुवारी महिन्यात १७४१, मार्च महिन्यात ६९६६; तर एप्रिल महिन्यात २०८१० अशी एकूण चार महिन्यांत ३०,४२० मुले बाधित झाली आहेत. यातच कोरोना विषाणूचे होत असलेले ‘म्युटेशन’, लसीकरणापासून दूर असलेली मुले व कोरोना प्रतिबंधक नियमांचे मुलांकडून योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे आतापासूनच फार वेगाने आवश्यक वैद्यकीय सोयी उभारणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीआयसीयू, एचडीयू, एनआयसीयू यांच्या युनिटमध्ये वाढ आवश्यक आहे. याशिवाय, याला लागणारे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असे शास्त्रज्ञ आणि केंद्र सरकारचेच वैज्ञानिक सल्लागार सांगत आहेत. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तर पालकांनी काय करायचं? आईवडील रुग्णालयात आपल्या मुलांसोबत राहू शकणार का? या लाटेचा मुकाबला करण्यासाठी काय नियोजन करत आहात? अशी प्रश्नांची सरबत्ती सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. तसेच लहान मुलांचेही लसीकरण करण्याचा विचार करावा, अशी महत्वपूर्ण सूचनाही केली. दुसरी लाट हाताळण्यासाठी आपल्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तिसऱ्या लाटेसाठीही मनुष्यबळ नाह़ी तिसऱया लाटेत हे डॉक्टर्स, नर्सेस थकलेले असतील तेव्हा काय करणार? त्यासाठी नवीन पदवीधर डॉक्टर्स आणि नर्सचा विचार करू शकतो का? देशात एक लाख डॉक्टर्स ‘नीट’ परिक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. अडीच लाख नर्सेस बसून आहेत. यासाठी सरकारचे नियोजन काय? लवकरात लवकर बॅकअप तयार करावा लागेल. तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आतापासूनच काय तयारी सुरू आहे? धोरण आखताना चूक केली तर त्यास सरकारच जबाबदार असेल, याबाबत न्यायालयाने खडसावले आहे.
कोणत्याही आजारात रुग्ण पहिल्यांदा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधतो. त्यामुळे त्यांनीच पुढाकार घेत ‘माझा डॉक्टर’ बनून सर्वसामान्य रुग्णांना मार्गदर्शन केल्यास सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यात मोठी मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री व्यक्त केली आहे. व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला व सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांची डाॅक्टरांनी विचारपूस करीत राहणे गरजेचे आहे. त्यांना प्रोटोकॉलप्रमाणे उपचार मिळतात का याकडे व्यक्तिश: लक्ष द्यावे तसेच वॉर्ड अधिकाऱ्यांनाही माहिती वेळोवेळी दिल्यास रुग्णांच्या बाबतीत व्यवस्थापन करणे पालिकेला सोपे जाईल. राज्यात बालरोगतज्ज्ञांची एक टास्क फोर्स निर्माण करण्यात येत आहे. याविषयी या सभेत माहिती देण्यात आली. लहान मुलांना होणारी सर्दी, ताप, डायरिया, दूध व अन्न खाणे कमी करणे किंवा बंद होणे अशा लक्षणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट येऊच नये यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
लसीकरणामुळे तिसऱ्या लाटेचा वेग मंदावता येईल. त्यामुळे लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करण्यात यावे. १८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी लोकसंख्या राज्यात आहे. त्यासाठी आपल्याला १२ कोटी डोस लागणार आहेत. तसेच दिवसाला १० लाख लोकांना लस देण्याची गरज आहे. त्यासाठी लस उत्पादकांसोबत चर्चा सुरू आहे. पण, लस पुरेसी मिळण्याची शक्यता कमी आहे, असे राज्य सरकार सांगते. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सुविधा वाढवूनच तयारी करावी लागणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती लहान मुलांना धक्कादायक ठरू शकते म्हणून त्या लाटेशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुर्वतयारी सुरू केली असून लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटर, आणखी नव्या आॅक्सिजन प्लांटची निर्मिती करावी लागणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे त्याची लागण झालेल्या लोकांना देशात शिरतानाच इतरांपासून वेगळं करणं, त्यांच्यावर वेळेत उपचार करणं. त्यामुळं जिथे कोरोनाचा प्रसार झालेला आहे, अशा देशांतून हवाई किंवा सागरी मार्गानं आलेल्या लोकांची तपासणी करून मगच त्यांना भारतात प्रवेश दिला जातो आहे, हे आवश्यकच आहे. भारतभरात सध्या संशयास्पद रुग्णांच्या रक्ताची कोरोना विषाणूसाठी तपासणी करणाऱ्या जेवढ्या प्रयोगशाळा कार्यरत आहेत त्यापेक्षा येत्या काही दिवसांत आणखी नव्याने प्रयोगशाळांची निर्मिती ही क्षमता उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्राचा विचार केला, तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था अर्थात एनआयव्ही ही देशातली शिखर प्रयोगशाळा पुण्यात आहे. त्याशिवाय मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात राज्यातली मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हिडच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. भारतात वाढत्या शहरांमध्ये आणि निमशहरी भागांत अनेकदा रुग्णालयं अपुरी पडत असल्याचं, सरकारी पाहणीत वारंवार समोर आलं आहे. त्यातही संसर्गजन्य आजारांचा सामना करण्याची क्षमता असलेली रुग्णालयं अगदी हाताच्या बोटावर मोजता यावीत एवढी कमी आहेत. अनेक रुग्णालयांत संशयित रुग्णांच्या विलगीकरणाच्या सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात नवी रुग्णालयं, प्रयोगशाळा तयार करण्याची आवश्यकता आहे.
कोरोना संदर्भातली माहिती जशी समोर येते आहे, तसे त्याविषयीचे मेडिकल अपडेट्स, औषधं, जागितक आरोग्य संघटनेनं केलेल्या सूचना अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन त्यांच्या महाराष्ट्रातल्या चाळीस हजारांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचवते आहे. पण कोरोनावर अजून ठोस उपाय सापडलेला नसल्यानं, त्याची लागण होणार नाही याची लोकांनीही काळजी घेणं जास्त महत्वाचं ठरतं. केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहता येणार नाही, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सवयी अंगी बाळगायला हव्यात. दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा अधिक संसर्ग होत आहे. पण पहिल्या लाटेतही लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळत होता, पण प्रमाण कमी होते. दुसऱ्या लाटेत हे प्रमाण वाढले आहे. विशेषतः मार्च महिन्यापासून लहान मुलांत कोरोनाचा अधिक संसर्ग दिसून येत आहे. लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला ही कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे आहेतच. याव्यतिरिक्त पोटात दुखणे, मळमळणे, उलटी, जुलाब, मुले सुस्त होणे, चिडचिड करणे, त्यांना जेवण न जाणे यासारखीही लक्षणे आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे सध्या आढळणाऱया लक्षणांत डोळे लाल होणे, ओठ लाल होणे, शिरांवर ओरखडे येणे यांसारखी लक्षणेही आढळत आहेत.
बहुतांशी लहान मुलांना कोरोना झाला तरी ती त्यातून बरी करण्यात यश येत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत २८० हून अधिक कोरोना झालेल्या मुलांवर योग्य उपचार झाल्याने ते बरे झाले आहेत. ज्या रुग्णालयात कोरोनाचे जे मृत्यू झाले, त्या मुलांमध्येही इतरही आजार होते. उदा. किडनी विकार, कर्करोग, हृदयविकार असे आजार त्यांच्यात आढळले. अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे काही मुलांचा मृत्यू झाला. मात्र हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. पालकांमुळे लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आढळली आहेत. त्यामुळे ज्या पालकांना कामासाठी बाहेर जावे लागते त्यांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी किंवा लहान मुलांशी संपर्क अधिक येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दोन वर्षांवरील मुले खेळण्यासाठी, वाढदिवस आदी कारणांसाठी बाहेर जात असतील तर त्यांना मास्क घालायलाच हवा. हात स्वच्छ धुणे, अंतर राखणे यासारख्या गोष्टींची त्यांना सवय लावायला हवी.
साधारणत: ताप आला आणि तो तीन दिवसांनंतरही उतरत नसेल त्याचप्रमाणे अन्य लक्षणे जर दीर्घकाळ दिसत असतील तर या मुलांची कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यानंतर तर त्यांना रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू व्हायला हवेत. उशीर केल्यास त्यांची प्रकृती गंभीर होते व त्यांना बरे होण्यासही अधिक कालावधी लागतो. परिस्थिती अशी आहे की, पालक तसेच १८ वर्षांवरील व्यक्ती लस घेऊ शकतात, मात्र लहान मुलांसाठी अद्याप अशी लस आलेली नाही. त्यामुळे लक्षणे आढळल्यास लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होणे आवश्यक आहे. पालकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये.
राष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या लाटेची स्थिती कठीण आहे. एक ते दीड महिन्यांत संक्रमणाची गती ईशान्य भारताच्या दिशेने वाढेल. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश यासारख्या राज्यात पुन्हा अशी परिस्थिती येणार नाही. आता जर विषाणूने नवीन उत्परिवर्तकांना जन्म दिला तरच तिसरी लाट येऊ शकते. वैज्ञानिकांना सर्व म्युटेशन ओळखण्यासाठी वेळही मिळायला हवा. कोविडबाबत नियमांचे पालन हाच एकमेव बचावाचा पर्याय आहे. तसेच दुसर्या लाटेतच जास्तीत जास्त लोकांना लस दिली तर तिसरी लाट थांबू शकते. देश सध्या कोरोनाच्या दुसर्या लाटेशी झगडत आहे आणि यासोबतच तिसऱ्या लाटेच्या संभाव्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. केवळ सरकारच नाही तर कोर्टालाही याची चिंता आहे. महामारीशी संबंधित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिसरी लाट कधी येईल… ती येईल की नाही याचा अंदाज आता बांधता येत नाही. परंतु हे निश्चित आहे की, जर जनता आणि सरकारने आता त्यांची भूमिका योग्य प्रकारे बजावली तर कदाचित तिसरी लाट येण्यापूर्वीच थांबेल.
दुसऱ्या लाटेप्रमाणे परिस्थिती होऊ नये, यासाठी जनतेने कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी घालून दिलेल्या सर्वच नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सरकारने पुढच्या एक वर्षासाठी जिथे आरडाओरडा करुन सांगूनही गर्दी होतेच अशा देशातील सर्व मोठ्या कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी घालावी. केवळ मेळावे आणि धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर मोठ्या पार्ट्या आणि विवाह सोहळ्यावरही पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. असे केल्याने संसर्गाची गती कमी होईल तसेच या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण करून लोकांचे संरक्षण केले जाऊ शकते. सरकारने जर कठोर पावले उचलली तर तिसरी लाट काही भागात नाही तर कुठेही येण्याची शक्यता नाही. आपण सर्वजण मार्गदर्शक तत्त्वांचे किती चांगले पालन करतो यावर हे अवलंबून आहे. या वर्षाच्या सुरुवातीस लोकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले आणि आता त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. जर आपण सध्याही कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण यशस्वी केले गेले तर तिसरी लाट आली तरी ती थोपवता येईल किंवा कमी घातक ठरू शकते. (समाप्त)
– गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.
Leave a Reply