ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ऑनलाईन आंबेडकरी व्याख्यानमाला उत्साहात साजरी

April 19, 202112:41 PM 46 0 0

नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देशात आणि जगभरात मोठ्या हर्षोल्हासात साजरी केली जाते. आपण जयंतीचा अर्थ बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक असा घेतला आहे. परंतु आंबेडकरी विचार हा माणसाच्या क्रांतिकारी पुनर्रचनेचा विषय आहे. जयंती म्हणजे जन्मदिवस नव्हे. हा दिवस म्हणजे व्यवस्थांतराचा तत्वव्युह मांडणाऱ्या आणि विषम व्यवस्थाच उध्वस्त करणाऱ्या समर्थ बुद्धिवादाची ही जयंती आहे. एका विश्वविख्यात महातत्वज्ञानाचीच ही जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती साजरी करणे हा मनोरंजनाचा, नाचगाण्याचा विषय नसून ती एका मानवमुक्तीच्या लढ्याच्या विजयाची आणि क्रांतीचे तत्त्वज्ञान मांडणारी युद्धशाळाच आहे, असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने आयोजित ऑनलाईन व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी केले. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे, संजय मोखडे, अमृत बनसोड, संयोजक प्रशांत वंजारे समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, किरण पतंगे, डॉ. प्रकाश राठोड, साऊल झोटे, शालिक जिल्हेकर, सुनील कुमरे, संजय डोंगरे, भैय्यासाहेब गोडबोले यांच्यासह शेकडो दर्शकांची आॅनलाईन उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने दि. १० एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत पद्मश्री लक्ष्मण माने, प्रा. माधव सरकुंडे, डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. प्रकाश राठोड, डॉ. प्रतिभा अहिरे, प्रा. डॉ. अनंत राऊत यांनी विविध विषयांवर व्याख्याने दिली. व्याख्यानमालेचा समारोप डॉ. यशवंत मनोहर यांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे युगांतराचे नियोजन’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. वर्गणी गोळा करून, मोठ्या स्वरुपाची सजावट करुन, चित्र विचित्र प्रकाश योजना, डीजे लावून आणि त्याच्या तालावर बीभत्सपणे नाचून, निळ उधळून जयंती साजरी करु नये. ही बाबासाहेबांच्या वैचारिकतेला, तत्वज्ञानाला, जगण्याच्या आदर्शवादाला, माणसाच्या स्वातंत्र्याला, हद्दपार करण्याची ही प्रक्रिया आहे. जयंतीच्या सोहळ्याला विकृत करण्याचा, तत्वज्ञानाला भिडू न देण्याचा हा कट आहे. इथल्या आंबेडकर विरोधकांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत. तसेच आंबेडकरी अनुयायांनी जयंतीचं चिंतनशील प्रारुप समजून घेतलं पाहिजे असे डॉ. मनोहर म्हणाले.

कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात अनेक मर्यादा आल्या होत्या. राज्यातील अनेक पक्ष संघटनांना मिरवणूकीसह जयंतीच्या विविध कार्यक्रमांना परवानगी मिळावी असे वाटत होते. परंतु अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचे ठरविले. यामध्ये सतत सात दिवसांच्या या विचारमंथनास राज्यभरातून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आंबेडकरी विचारांचा वैचारिक जागर आॅनलाईन पद्धतीने घडून आला. आठव्या दिवशी महामंडळाचे अध्यक्ष अशोक बुरबुरे यांनी या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या सर्व विचारवंतांचे, प्रमुख संयोजक प्रशांत वंजारे, समन्वयक गंगाधर ढवळे यांच्यासह सहभागी कार्यकर्त्यांचे आणि सतत आठही दिवस ज्यांनी हजेरी लावली त्या तमाम बुद्धीजीवी दर्शकांचे आभार मानले. तसेच ही आंबेडकरी विचारांची ज्योत कायम तेवत राहील, अशी भूमिका मांडली. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी डॉ. सिमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, अमृत बनसोड, देवानंद सुटे, यांच्यासह महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या परिश्रम घेतले.

 

आज चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान
आज २० एप्रिल रोजी अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त अशोककालीन ऐतिहासिक साहित्याचे अभ्यासक महेंद्र शेगावकर यांचे ‘मौर्यकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर दुपारी तीन वाजता लाईव्ह पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. सर्व साहित्यिक, विचारवंत, वाचक, अभ्यासक तथा चिंतकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन महामंडळाच्या संयोजन समितीने केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *