जालना (प्रतिनिधी) ः राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री व विद्यमान पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह सहा जणांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदन कथीत घोटाळा प्रकरणात मुंबई येथील जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याबद्दल जालना जिल्हा समता परिषदेच्या पदाधिकार्यांनी आज गुरूवारी शहरातील विविध चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असतांना छगन भुजबळ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात दिल्ली येथे महाराष्ट्र सदनच्या इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. या इमारत बांधकामात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी श्री भुजबळ यांच्यासह समिर भुजबळ आणि अन्य अशा एकुण सहा जणांविरूद्ध पोलीसात गुन्हे दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई येथील सत्र न्यायालयाने आज गुरूवारी श्री भुजबळ यांच्यासह सर्व सहा जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाचे आ. कैलास गोरंट्याल, जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, राम सावंत, सुधाकर निकाळजे, मोहन इंगळे, गणेश खरात, अरूण घडलिंग, गणेश वाघमारे, चंद्रकांत रत्नपारखे, जावेद बेग आदींनी स्वागत करून श्री भुजबळ यांचे अभिनंदन केले आहे. दरम्यान, न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर जालना येथील समता परिषदेच्या पदाधिकार्यांनी शहरातील गांधी चमन आणि लोधी मोहल्ला परिसरात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. यावेळी समता परिषदेचे जिल्हा युवक अध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, भरत लोढा, सुशील धानुरे, सुंदरराव काळे, रोहनसिंग वर्मा, यश सुर्यवंशी, अंकुश शिंदे, विवेकसिंग वर्मा, गणेश राठोड, सतिष सुर्यवंशी, फिरोज शेख, धनसिंग राजपुत, किशोर सुर्यवंशी, कुणाल राजपुत, गजानन खरात आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Leave a Reply