ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जनतेच्या मनातील मुख्यमंत्री : पर्यावरणप्रेमी उद्वव ठाकरे

July 18, 202113:04 PM 49 0 0

महाराष्ट्रात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन राजकीय पक्षांचे सरकार महाविकास आघाडी म्हणून सत्तेवर आले. हे राज्य सरकारचे एक ऐतिहासिक मूर्तीमंत रुपच होय. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर या सरकारचा जन्म झाला. या पद्धतीने महाराष्ट्रात सत्तांतरानंतर ते आजपर्यंत विरोधकांचे उपटसुंभ कारनामे, कोरोनाचा दोन्ही लाटेतील अतिभयंकर काळ, मराठा आरक्षण, चक्रीवादळे अशा काही संकटांचे मोहोळच लागले होते. परंतु शिताफीने यातून मार्ग काढत शिवरायांचा प्रताप जागवण्याचं कामच मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केले. कंगना राणावत सारख्या बयेला पुढे करुन विरोधकांनी जे करमणूकीचे खेळ चालवले होते त्यात आणि तद्वतच रेमडेसिवरच्या प्रकरणात ते तोंडावर आपटले. अशा अनेक कागाळ्या करीत राहणाऱ्या विरोधकांना मुघलांच्या स्वप्नात जसे संताजी धनाजी दिसत त्याची आठवण शिवसेनेने वेळोवेळी करुन दिली. सत्ता गेल्याच्या नैराश्यातून ते अनेकांच्या स्वप्नातही ते आले. एवढेच नव्हे तर शिवसेनेला अगदी पाण्यात पाहू लागले. ज्याप्रमाणे स्वराज्यावर आलेल्या कोणत्याही संकटाला अत्यंत धिरोदात्तपणे शिवबांनी तोंड दिले, तोच आणि तसाच आदर्श उराशी बाळगत विरोधकांना नामोहरम केले. विरोधकांनी कितीही त्रास दिला तरी बाळकडू प्यालेला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री डगमगला नाही. कोरोनाच्या काळात ढाल आणि तलवार हाती घेऊन युद्धभूमीवर लढावे तसे महाराष्ट्राचे संरक्षण केले. अशातही विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही.
महाराष्ट्राच्या शिरावर समस्यांचा आधीच काटेरी मुकुट सजलेला होता. तो आपल्या शिरावर घेत अगदी संयमाने शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्वव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारावर तथा भूमिकांशी सुसंगत असा राज्यशकट हाकत आहेत. या मराठी मुलखात राहणाऱ्या सर्वच स्तरांतील लोकांचा आणि तळागाळातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचाच विचार केल्यामुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय झाले. जननायक झाले. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींची प्रतिमा उजळली गेली. कोरोना संकटकाळात देशभरातील विविध राज्यांमधील परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांची कामगिरी यावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. कोरोनाच्या संकटकाळात उत्तरप्रदेश, पंजाबमध्ये विद्यमान मुख्यमंत्र्यांबाबत नाराजी असल्याची माहिती पुढे आली आहे. उत्तराखंडमध्ये तर दोन वेळा मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून अनेक मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेही चर्चेत असल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, यातच आता प्रश्नम यांनी केलेल्या सर्व्हेक्षणात उद्धव ठाकरे देशात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात ६७ टक्के लोकसंख्या असलेली १३ राज्ये या सर्व्हेसाठी निवडण्यात आली होती. सर्वेक्षणानुसार असं समोर आलं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. सर्वेक्षणात जवळपास ४९ टक्के मतदारांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा उद्धव ठाकरेंना मतदान करणार असल्याचं काही मतदारांनी सांगितलंय. या राज्यातील कोणत्याही मुख्यमंत्र्यांपेक्षा अधिक संयमी, संवेदनशील, सतत जनतेच्या हिताचा विचार करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

आज शिवसेनाप्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना या शिक्षकांच्या संघटनेने राज्यभरात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. २७ जुलै या मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील प्रत्येक शाळेत ‘वृक्षारोपण आणि संवर्धन’ हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. गतवर्षी राज्य स्तरावरुन प्राथमिक व माध्यमिक शाळांत वृक्षारोपण करण्याचा व्यापक कार्यक्रम देण्यात आला होता.
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या, जिल्हा तसेच विभागीय पदाधिकारी यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. १३ जुलै ते २७ जुलै या कालावधीत शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण पंधरवडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक पदाधिकारी यांनी त्यांच्या कार्यरत शाळेत किमान १० तर तालुक्यात किमान १०० झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही निश्चित करण्यात आली होती. हे या उपक्रमाचे दुसरे वर्ष असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर ( राज्यमंत्री दर्जा) यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील सर्वच आस्थापनांच्या शाळांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा पंधरवडा साजरा करुन हा दिवस प्रेरणा दिन म्हणून साजरा केल्या जात आहे. यामध्ये शाळांतील शिक्षक सेनेचे पदाधिकारी पुढाकार घेत असून वृक्षांचे वाढते महत्त्व लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार या वर्षीही प्रत्येक जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना १३ जुलै ते २७ जुलै या पंधरवड्याच्या कालावधीत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच संपर्क प्रमुखांची नियुक्ती करण्यात येऊन वृक्षारोपण कार्यक्रमाचा समग्र आराखडाही तयार करण्यात आला आहे.

एक संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. ते जात्याच निसर्गवादी , पर्यावरणवादी आहेत. आदित्य ठाकरे हे आजच्या मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री आहेत, ही एक संयुक्तिक बाब आहे. उद्धव ठाकरे यांच्या निसर्गप्रेमाची एक झलक अकरा वर्षांपूर्वीच दिसली होती. महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तिमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांनी आपल्या ‘महाराष्ट्र देशा’ या २०१० ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले आहे. छायाचित्रणाचा छंद जोपासण्यासाठी ते जंगलातही भटकंती करीत असत.
पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला आहे. त्यामुळे विकासकामाचे नियोजन करताना निसर्गाचे नियम समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो अशी त्यांची धारणा आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात २०२०-२१ या वर्षातील ‘माझी वुसंधरा’ अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिकांचा, अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या विभाग, जिल्ह्यांचा, अधिकार्‍यांचा मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला होता. शहरातून हरित तृणांची मखमल आता नाहीशी झाली आहे. आपण पृथ्वीला वसुंधरा म्हणतो आणि तिची गणना स्क्वेअर फुटात करतो. वन बीएचके, टू बीएचके सारख्या तुकड्यांमध्ये ती वाटतो. पण विकासाचा हा असा ध्यास आपल्या जीवनाला घातक ठरत आहे. आपण पंचमहाभूतांपासून दूर जात आहोत. त्यांची जपणूक करण्याऐवजी आपण त्यांच्यावर हुकुमत गाजवत आहोत. कोरोनाकाळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्व पटले. आपण ऑक्सिजन निर्मिती करत आहोत पण निसर्गाने दिलेले झाडांच्या रूपातील नैसर्गिक ऑक्सिजन प्लांट आपण उद्ध्वस्त करत चाललो आहोत, याकडे मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती. त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा झाली, नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. आपल्या पूर्वजांनी पंचमहाभूतांचे रक्षण केले. परंतु आता आपल्या घरासमोर साधे तुळशीवृंदावन बांधण्याला जागा नाही इतक्या इमारती राक्षसासारख्या उभ्या राहात आहेत आणि आपण विविध दिनांच्या निमित्ताने फक्त शुभेच्छा देत आहोत. परंतु या शुभेच्छांचा कोरडेपणा थांबून जैवविविधतेने समृद्ध अशा महाराष्ट्राला जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण रक्षणाचे काम एका विभागाचे नाही तसेच ते एका खात्यासाठीही नाही. हे मानवकल्याणाचे, राज्य आणि देशाच्या हिताचे काम आहे. त्यातून आपलेच जीवन सुसह्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. निसर्गाचे हे देणे जपण्यासाठी निसर्गावरचे आपले अतिक्रमण थांबवण्याची गरज आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करताना लावलेले वृक्ष जगवले जावेत, सागरतटीय किनार्‍यांचे रक्षण व्हावे, त्या माध्यमातून पर्यावरणातील सर्व घटकांचे जतन आणि संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्व आणि त्याचे रुप आपण समजून घेणे गरजेचे आहे. ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे. तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पहातो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
विकास कामे करतांना निसर्गाची काळजी कशी घेता येईल, निसर्गाचं संवर्धन कसं करता येईल हे सांगणारी आणि यासाठी तांत्रिक आणि शास्त्रीय सल्ला देणारी संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे असे त्यांना वाटते. रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी संजीवनी वनस्पती आणावी लागली. माझ्या मते संजीवनी म्हणजे काय तर आपल्यासोबत जगणारी आणि आपल्याला जगवणारी जी गोष्ट आहे ती संजीवनी, आपण ती जपली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करत चाललो आहोत. त्यामुळेच जंगलाचा ऱ्हास करून विकास कामांचे प्रस्ताव जेंव्हा आपल्यासमोर येतात तेंव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे ते म्हणतात. मानव वस्तीवर वन्यजीवांनी कधी अतिक्रमण केल्याचे पाहिले आहे का? त्यांनी एखादी बिल्डिंग रिकामी करून पाडून तिथे राहण्यास सुरुवात केली असं ऐकलं आहे का? नाही. पण माणूस मात्र वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर अतिक्रमण करत असल्याचे दिसते. गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले, यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का? जैवविविधतेत नष्ट होणाऱ्या प्राण्यांची आणि वनस्पतींची नोंद घेणे एवढेच काम या क्षेत्रात होऊ नये तर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. लोकसहभाग वाढवून त्याच्या रक्षणाचे काम व्हावे असा मुख्यमंत्र्यांचाच मानस आहे.
आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे ते याक्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री म्हणतात. आरेचे जंगल आपण वाचवले. रातोरात झाडांची कत्तल कधीही मान्य नव्हती. आपले वैभव नष्ट करुन विकास आम्हाला नको आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. आरेतील वृक्षतोड आणि या कारशेडला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला आहे. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे एकमेव महानगर आहे. निसर्गासोबत जगण्यासाठी सुयोग्य वर्तन विकसित करायला हवे. असे झाले तरच आरोग्यदायी विकास होईल. उदात्त मतवादी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने गतवर्षीपासून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून प्रेरणा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तो अत्यंत योग्य आणि तितकाच स्त्युत्य आहे. शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर ही एक मोठी जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचे पर्यावरणविषयक विचार समजून घेतले तर महाराष्ट्राच्या इतिहासात असा मुख्यमंत्री झाला नाही, असे म्हणता येईल. तेव्हा कृतीतून हे विचार जमिनीत पेरण्याची नामी संधी शिक्षक सेनेने उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा या संधीचे सोने करता येईल. दरवर्षी जुलै महिन्यात येणारा वाढदिवस हा भव्य वृक्षारोपण करून प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जाईल, ह्यात शंका नाही. शिक्षक सेनेप्रमाणेच प्रशासनस्तरावरुनही विविध विभागांना सूचना दिल्या जाव्यात अशी अपेक्षा करणे काही गैर नाही.

– गंगाधर ढवळे, नांदेड.
मो. ९८९०२४७९५३.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *