जालना :- जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत असून जालना शहरामध्ये सर्वाधिक रुग्णांची वाढती संख्या ही अतिशय चिंताजनक बाब आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरच्या वापराबरोबरच सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केले. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावा संदर्भात उपाययोजना करण्यासाठी आज दि.15 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व संबधित अधिका-यांसोबात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, जिल्हा पुरवठा अधिकारी रिना बस्सैय्ये, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी श्रीमती अंजली कानडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रताप सवडे, उपमुख्यकारी अधिकारी (सामान्य)नामदेव केंद्रे, उपमुख्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. संजय इंगळे अतिरिक्त शल्य चिकित्सक पद्मजा सराफ, तहसिलदार श्रीकांत भुजबळ, पोलीस उपअधिक्षक सुधीर किरडकर, नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नार्व्हेकर, डॉ. प्रताप घोडके, विविध विभागांचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री बिनवडे म्हणाले, जिल्ह्यात गेल्या महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी होती. परंतु प्रशासनाकडून कोरोनाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांचे नागरिकांकडून पालन न केल्याने तसेच कोरोनाच्या बाबतीत बेफिकीरी बाळगल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत असून ही अतिशय चिंताजनक बाब आहे. कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात टेस्टिंगची संख्या वाढविण्याबरोबरच हाय व लोरिस्क सहवासितांचा अचूक शोध घेऊन त्यांना कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. हॉटेल, चहाच्या टपऱ्या, पानशॉप यासारख्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते तसेच या ठिकाणी नागरिक तोंडावरचा मास्क काढत असल्याने गर्दी होणाऱ्या आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या मोठ्या प्रमाणात अँटिजेंन तपासण्या करण्यात येत असुन अनेक कामगार या तापसणीमध्ये पॉझिटिव्ह आढळून आल्याने हे कामगार कोरोनाच्या भीतीने निघून जाऊ नयेत तसेच औद्योगिक क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी या कामगारांसाठी औद्योगिक वसाहतीमधेच कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देशही संबंधिताना देण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
सध्या जालना जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाउन जाहीर केला नसल्याचे स्पष्ट करत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर तसेच सामाजिक अंतराचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगत येत्या गुरुवारी याबाबत परत बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे जे कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले होते ते सर्व सेंटर तातडीने सुरू करण्याबरोबरच त्या ठिकाणी डॉक्टर्स यांच्यासह सर्व सोयी-सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी यांचे प्रतिबंधात्मक आदेश पुढीलप्रमाणे
जालना जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व हॉटेल्स, ढाबा, खानावळ, चहाचे हॉटेल, बार रेस्टॉरंट, भेळ गाडे, पाणीपुरी गाडे, नाश्ता सेंटर, रसवंतीगृह, ज्युस सेंटर, चायनिज सेंटर, पावभाजी सेंटर इ. ग्राहकांसाठी पुर्णत: बंद राहतील परंतु केवळ पार्सल सुविधेसाठी हॉटेल सुरु राहतील. त्याठिकाणी सर्वांनी कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सक्तीने पाळावीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टसींग, इ. चे पालन करणे बंधनकारक राहील. सर्व संबंधीत यंत्रणा, नगर परिषद, नगर पंचायत, अन्न व औषध प्रशासन इ. विभागाची यांचे इ. विभागांनी यांचे पालन होत असल्याबाबत वेळोवेळी तपासणी करावी. संबंधीत आस्थापनाचे चालक हे कोविड -19 बाबतच्या या नियमांचे पालन करीत नसल्याने निर्दशनास आल्यास त्यांच्यावर तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. लॉजींग सुरु राहील तथापि तेथील व्यक्तींची जेवणाची सोय लॉजच्या डायनिंगमध्ये न करता संबंधितांच्या रुममध्ये देण्याची सुविधा संबंधीत लॉज मालकाने करावी. कोविड-19 बाबतचे राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे सक्तीने पाळावीत व मास्क, सॅनिटायझर, स्वच्छता, सोशल डिस्टंसींग, इ. चे पालन करणे बंधनकार राहील. जालना जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायत हद्दीमधील सर्व पान टप-या पुर्णत: बंद राहतील.वरील निर्बंध आज मध्यरात्रीपासुन ते दि. 31 मार्च 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत लागु राहतील.
Leave a Reply