जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरातील 14 हजार 500 निराधार लाभार्थ्यांची दिवाळी आ. कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नामुळे गोड होणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनूदान जालना तहसिल कार्यालयाकडून बॅक खात्यावर जमा करण्यात आले असून सदर अनुदानाची रक्कम लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. जालना शहरातील श्रावण बाळ वृध्दापकाळ योजनेसह संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जुन महिन्यापासुन अनुदानाचा लाभ मिळाला नव्हता. दिपावली सारखा महत्वाचा सण निराधार लाभार्थ्यांना उत्साहात साजरा करता यावा, सणाच्या निमित्ताने गोड धोड पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी जालन्याचे तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांना निराधार लाभार्थ्यांचे थकीत अनुदान दिपावली सणापुर्वी त्यांच्या बॅक खात्यावर जमा करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने तहसिलदार भुजबळ यांनी निराधाराचे अनुदान त्वरीत अदा करण्याच्या दृृष्टीने संबधित विभागाच्या कर्मचार्यांना सुचना देवून अनुदान वाटपाची कारवाई तातडीने करण्याचे सांगितले होते.
जालना शहरातील 8 हजार 134 लाभार्थी वृध्दापकाळ योजनेचा लाभ घेत असून या लाभार्थ्यांना जुन ते सप्टेंबर असे 4 महिन्याचे थकीत मानधन तर संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ घेत असलेल्या 6 हजार 364 लाभार्थ्यांचे जून ते ऑगस्ट या 3 महिन्याच्या कालावधीत थकीत असलेल्या अनुदानाची रक्कम जालना तहसिल कार्यालयाने बॅकेकडे वर्ग केली आहे. बॅकेकडून लवकरच सर्व संबधित निराधार लाभार्थ्याच्या बॅक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत नव्याने निवड करण्यात आलेल्या 491 लाभार्थ्याचे तसेच श्रावण बाळ योजने अंतर्गत निवड करण्यात आलेल्या 1401 लाभार्थ्याचे अनुदान गेल्या 10 महिन्यापासुन थकीत असून अनुदानासाठी लागणार्या निधीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे. राज्य शासनाकडुन तातडीने निधी उपलब्ध प्राप्त व्हावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करून नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देखील लवकरच अनुदान वाटप करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.
Leave a Reply