ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

यशवंत मनोहरांची संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळ

March 25, 202214:03 PM 44 0 0

मानवी जीवन कलासौंदर्यांनी नटलेलं आहे. जीवन हे सूंदर आहे असे आपण म्हणतो तेव्हा त्याकडे सौंदर्यदृष्टीने पाहतो. जीवन जगणे ही कलाच आहे. या कलेत जगण्याचे सौंदर्य आहे. विचारशक्ती, प्रतिभा, आव्हान, अनुभव, संघर्ष, चिकित्सा, विशिष्टता हे काही कलेचे घटक आहेत. काही कलेचे उपघटकही आहेत. या कलांची अदाकारी म्हणजे सौंदर्य. सौंदर्याच्या विविध नक्षी आणि कलाकुसरींनी नटलेलं हे माणसाचं जगणं आहे. परंतु दिसायला सुंदर असणे, डोळ्याला दिसत असणाऱ्या आकर्षक चित्र वा दृश्याची जाणीव म्हणजे सौंदर्य नव्हे. ती केवळ नयनरम्यता होय. सुंदरतेच्या भास आभासांची जाणीव म्हणजेही सौंदर्य नव्हे. सौंदर्य म्हणजे मनाने ठरविलेली, कल्पिलेली आकृती नव्हे. निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याने प्रत्ययास आलेली व्याख्या नव्हे. माणसाच्या जगण्याचे काही प्रयोजन असते.

प्रयोजनाच्या तळाशी जीवनमूल्यांच्या, सौंदर्याच्या जाणिवा असतात. त्या संकुचित नसतात. या जाणिवा जगण्याचे सुसंगत संविधान मांडतात. तृष्णा मिटविणाऱ्या सम्यक तत्वज्ञानाची मांडणी करतात. जीवनाला जडलेले महामूल्यांचे अलंकार म्हणजेच सौंदर्य. मानवतेने समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, दया, प्रेम, माया, करुणा या महामूल्यांचेच सौंदर्यविज्ञान मांडले. मानवअहितकारी, मूल्यद्रोही, सौंदर्यविज्ञानाला अज्ञानात रुपांतरीत करणारी समाजव्यवस्था प्रस्थापित झालेली असते तिथे नव्या बुद्धीवादी सौंदर्यशास्रांच्या प्रात्यक्षिकांची, संशोधित तत्वज्ञानाची आवश्यकता असते. हे सौंदर्यवादी तत्वज्ञान म्हणजे महामूल्यांचे सौंदर्यानुभव ; सौंदर्यप्रत्यय देणारे धम्म तत्त्वज्ञान होय. याचे प्रतिबिंब मूल्यसंघर्षातून जन्माला आलेल्या आंबेडकरी चळवळीत पडलेले दिसते. आंबेडकरी चळवळीचे सौंदर्यशास्त्र मूल्यनिष्ठांचा सौंदर्य सिद्धांत मांडते. निष्ठांची मूल्याधिष्ठित शास्त्रीय मांडणी करते. ही मांडणी महामूल्यांच्या प्रज्ञानी सौंदर्याची बांधणी करते. ती भारतीय संविधानाच्या प्रत्येक विधानातून दिसून येते. सौंदर्यवादी आंबेडकरी चळवळीची बांधणी आता नव्या समाजाच्या पुनर्चनेकरिता गरजेचीच आहे.
ही संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळ सर्वांच्याच हिताची आहे. ती भारतीय असण्याच्या एकजीव आणि समग्र कल्याणाची आहे. भारतातल्या भारतीयांच्या भारतीयत्व नसलेल्या मनात भारतीयत्वाची प्रस्थापना करण्यासाठीची आहे. या भूमिकेला संयुक्त महाराष्ट्राच्या मातीने बाबासाहेब नावाच्या सौंदर्याला जन्माला घातलं. जात, धर्म, वंश, वर्ग, प्रांत, भाषा, संस्कृती यांतील संघर्षातून या मातीने प्रज्ञानी भारताची उगवण केली. या पेरणीचं बौद्धिक नेतृत्व महाराष्ट्रानंच केलं. उभा महाराष्ट्र संपूर्ण देशभर पेरता झाला. जातविहिन, धर्मविहिन, वंशविहिन, वर्गविहिन, प्रांतवादविहिन, पंथविहिन अशा समतामूलक समाजरचनेच्या पुनरुत्थानासाठी महाराष्ट्रानेच संघर्षाच्या चळवळीची बीजं भारतभर पेरली. आम्ही महाराष्ट्राचे लोक भारताच्या भूमीवर उभे राहून आत्तापर्यंतच्या काळात भारताच्या सांस्कृतिक पुनर्बांधणीचीचेच काम करीत होतो अशा धगधगत्या महाराष्ट्रनायकांची कितीतरी नावे घेता येतील. विभिन्न सांस्कृतिक परिवेश असलेल्या परंतु संविधाननिष्ठांची वाताहत होऊ न देणाऱ्या उजेडांच्या बेटांनी अखंड भारताची निर्मिती करणं या संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळीचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत मांडण्यापूर्वी संविधाननिष्ठांची बांधणी एकसूत्री बांधणी करावी लागेल. या निष्ठांच्या निर्मितीसाठी समाजवाद, संपूर्ण धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, मानवतावाद, निरंतर पुनर्चनाशीलता या सौंदर्याच्या विकासवाटा चालण्याचे खडतर आव्हान भारतात कायम आहे. हे आव्हान स्विकारण्यासाठी इथल्या तमाम वंचितांना, उपेक्षितांना, अभावग्रस्तांना नायकत्व बहाल करावं लागेल.
संविधाननिष्ठ राजकारण भारताच्या सर्वोच्च संस्थेत सुरु झाल्याशिवाय संविधाननिष्ठ चळवळीला बहर येणार नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र जातीय, धार्मिक अस्मिता कायम ठेवून भारतभर नेता येणार नाही. ती नेताच येऊ नये यासाठी मूलतत्त्ववादी प्रवृत्ती सौंदर्याला क्रौर्याचे रुप देण्याच्या षडयंत्रकारी प्रयत्नात असते. धार्मिक अस्मितांना हळूवारपणे फुंकर घालून एकाधिकारशाही, झुंडशाही, दडपशाही, दरोडेखोर प्रवृत्तींना जन्माला घातले जात आहे. माणूसकेंद्री संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळ धार्मिक वर्चस्व, जातीय अहंभाव टिकू देणार नाही. भारत संपूर्ण धर्मनिरपेक्ष, समाजवादी, संविधानमय म्हणजेच बुद्धमय करील अशी भयंकर भिती इथल्या धर्मव्यवस्थेला वाटते. म्हणून ही व्यवस्था सतत संविधान निष्ठांची वाताहत कशी होईल, या चळवळी कशा मोडून काढता येतील याचाच विचार करते. आरक्षण, अॅट्राॅसिटी, धार्मिक भावना भडकावणे, हिरव्या दहशतवादाची भिती घालणे अशा मुद्दावरुन चळवळींपासून इतर समुहांना तोडण्याचे काम इथल्या सत्ताधाऱ्यांतील धर्मव्यवस्था करते. सोशल मीडियावर अगदीच नवतरुणांची माथी भडकवली जातात. त्यात इतर तरुण अथवा प्रौढ व्यक्तीही खतपाणी घालतात. एका जातीविरुद्ध दुसरी जात, एखाद्या धर्माविरुद्ध दुसरा धर्म उभा केला जातो. देशाच्या कोणत्यातरी भागात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन समाजमने एकमेकांविरुद्ध उभे राहतात आणि दंगल घडवून आणतात. सोशल मीडियावर असे असे पिक मोठ्या प्रमाणावर येत असते. यातून श्रेष्ठ, कनिष्ठतेच्या अहंकारी भावना नियोजित षडयंत्रांना बळी पडतातच! त्यामुळे माणूस माणसापासून दूर जातो. अज्ञानाच्या गुलामगिरीत ढकलला जातो. या दूर जाणार्‍या माणसाला तोडणाऱ्या माणसाचेच सत्य वाटू लागते. साम, दाम, दंड, भेद वापरुन स्वार्थ, पैसा, पद आणि प्रतिष्ठेचा गैरवापर करून समाजाचे वैचारिक स्वास्थ्य बिघडेल अशी विषपेरणी केली जाते. नव्या आरिष्टांची निर्मिती केली जाते. हे सर्व काही थांबवण्याची संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळीची मागणी आहे.

संविधाननिष्ठ लोकांच्या डोक्यात आधी प्रज्ञासूर्य उगवतो. तो एक उजेडाचं बेट तयार करुन ठेवतो. त्यासंबंधीच्या काही निश्चित धारणा असतात. निश्चित भूमिका असतात. त्या लढाऊ असतात. निष्ठांची हत्यारं करुन त्या अप्रामाणिकतेशी लढत राहतात. त्या कधीच स्वार्थाशी मैत्री करीत नाहीत. स्वार्थी निष्ठांचा पक्ष काढून वाढवित नाहीत. ते अनिष्ठांविरुद्धच्या युद्धास सतत तत्पर असतात. ते अंधाराला जिंकून घेऊ देत नाहीत. डोक्यात उगवलेला प्रज्ञासूर्य प्रकाशबिंदूची भक्कम बांधणी करीत असतो. हे त्या बेटाचं प्रिअॅम्बलच असतं. संविधाननिष्ठ आंबेडकरी चळवळीचा असा सरनामा प्रख्यात लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी मांडला तो महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर चर्चिला गेला. यावर प्रतिक्रिया देतांना, अनेकांच्या धम्मस्विकाराची फलश्रुती समर्थपणे समजून घेणारा विवेकी समाज उभाच राहू द्यायचा नाही, हे इथल्या धर्मांधांनी आणि भांडवली सत्ताधिशांनी ठरवून टाकले असेल, तर त्यावर आज कोणते उपाय करायला हवेत? यावर मनोहरांनी अधिक भाष्य करायला हवे होते अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावरून आता इथे अनेक प्रश्न उद्भवतात. संविधाननिष्ठ चळवळ म्हणजे धम्मस्विकाराची चळवळ आहे का? ती समजून घेणारा विवेकी समाज कुठे आणि कसा उभा राहतो? तो धम्मचळवळीत कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी उभा राहतो का? संविधाननिष्ठ चळवळ ही पर्यायी धम्मचळवळ आहे का? की ती केवळ आंबेडकरी लोकांनीच नेतृत्व करावयाची चळवळ आहे ? या आणि लेख वाचल्यानंतर मनात निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे डॉ. मनोहरांनी त्या लेखातच दिली आहेत. यावर आणखी विस्तारपूर्वक लिहिण्याचा त्यांचा मानस आहे.
ही चळवळ कुण्या एकट्याची नाही. कोणत्याही विशिष्ट जातसमुहाची नाही. आरक्षणाचा पुरेपुर फायदा एका विशिष्ट जातीनेच घेतला, अशी कांगावा करणारी जात बार्टीवर आरोप करीत सुटली आहे. संविधानाने प्रदान केलेल्या भरभक्कम कवचकायदा अट्राॅसिटीच्या विरोधात जाणाऱ्या, ती रद्द व्हावी म्हणून षडयंत्र करीत राहणाऱ्या जातप्रवृत्तीविरोधात कधीही ‘ब्र’ न काढणार्‍या जातींनी संविधाननिष्ठांना तडा घातला आहे. इथे जातींचा प्रश्न नाही. इथे प्रामाणिक निष्ठांचाच प्रश्न आहे. जातीय अस्मिता फुलविण्याचा उद्योग हा गलिच्छ राजकारणाचा एक भाग असू शकतो. असले राजकारण तमाम निष्ठांच्या एकीकरणात हस्तक्षेप नोंदवते. या हस्तक्षेपांना पर्याय देणारी ही चळवळ आहे. उजेडाचे नायकत्व स्विकारलेल्या सर्वच बेटांची ही चळवळ आहे. धर्मांधाशी आणि भांडवलशहांशी दोन हात करण्यासाठी केवळ युद्धगर्जना नव्हे तर लढणारी ही चळवळ आहे. कायद्यांचे फायदे लाटणाऱ्यांनी या लढ्यात सहभागी व्हायला काय हरकत आहे? आजचा काळ अधिकच पिसाळत चालला आहे. काळ का पिसाळला आहे? तो आपला शत्रू आहे. सोशल मीडियावर अर्धवट ज्ञानवंत एकमेकांच्या जातीविरोधात गरळ ओकत राहतात. त्याला राजकीय नेते, क्षणाक्षणाला आदर्शवादाचा रतिब घालणारे खतपाणी घालत राहतात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास मदत होते. जातीयविद्वेष वाढत जातो. आजच्या अराजकसदृश्य समाजकारणाला व राजकारणाला कालसुसंगत दिशा देण्याची क्षमता जर कोणत्या चळवळीत असेल तर ती संविधाननिष्ठ चळवळीमध्ये आहे. या सिद्धांताची मांडणी डॉ. मनोहरांनी सुस्पष्टपणे मांडली आहे, याकडे डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी लक्ष वेधले आहे. म्हणूनच अनेक जळत्या प्रश्नांची उत्तरे शोधायला लावणारी आणि उत्तरे देणारी ही चळवळ मजबूतपणे उभी राहिली पाहिजे.
यात साहित्यिकांची काय जबाबदारी असेल? आंबेडकरी साहित्यिकांनी चळवळीच्या बांधणीच्या दिशेने सौंदर्याकृतींची संरचना आणि सौंदर्यकृतींची निर्मिती करावयास हवी. या संरचना आणि कृती काळाच्या अपार अस्वस्थ अवस्थेतून प्रसवल्या गेल्या पाहिजेत. या साहित्यिकांनी आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्वच स्तरांतील लिहित्या, बोलत्या कार्यकारी उपक्रमांना सौंदर्याचे रुप दिले पाहिजे. त्यांनी निव्वळ प्रश्नांची निर्मिती करु नये. त्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना पुन्हा प्रश्नांची निर्मिती करणारे सुटे वाङमय निर्माण करु नये. त्यासाठी माणसाच्या मेंदूलाच आगीत जाळणाऱ्या छळछावण्या उद्ध्वस्त करण्यासाठी उजेडांचा महाप्रदेश एकत्रित बांधकाम करणार्‍या सौंदर्यकृतींची आवश्यकता आहे. या सौंदर्यकृतींची सांस्कृतिक फलश्रुती म्हणजे संविधाननिष्ठ चळवळीचा आदिबंधच असेल. यातून जुन्या आशयांच्या तपशिलांचे परिवर्तन होईल. परिवर्तन हे जीवनाच्या वर्तनांचे मूळ चारित्र्य आहे. म्हणूनच वाङमयीन मूल्यांनी परिवर्तनवादी जीवनमूल्यांना अविष्कृत करावयास हवे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या चळवळींना, आंदोलनांना बुद्धिवादी सौंदर्याचा चेहरा प्राप्त झाला पाहिजे. हा सौंदर्याकृतींचा आकार असेल. अन्यथा चुकीच्या दिशेने जाणार्‍या चळवळी उभ्या उभ्या फुटतात. घातकी ठरतात. विकृत होतात. कुणाच्यातरी वळचणीला जाऊन बसतात. या विपरीततेला साहित्यिकांनी प्रतिभाप्रकाशाचा पर्याय दिला पाहिजे. संविधाननिष्ठ कार्यकर्त्यांच्या निर्मितीचा आणि बांधणीचा महाप्रकल्प भारतभर आयोजित करावा लागेल. आंबेडकरी भूमिकांचे राजरोस हत्याकांड चालले आहे त्यातील हत्या करणारे आणि ज्यांची हत्या होत आहे ते यांच्यात बंधुभाव किंवा भगिनीभाव कसा पेरता येईल याचेच साहित्य हवे. थोतांड संकल्पनांनी भरलेल्या आणि भारलेल्या मेंदूंचे परिवर्तन घडवून आणणं आजच्या साहित्यिकांचा कृतीकार्यक्रमच ठरायला हवा. याचेही नेतृत्व महाराष्ट्रालाच करावे लागणार आहे. यानिमित्ताने आजपर्यंतच्या चळवळीने सांडलेले रक्त इथल्या तमाम विचारवंतांना, साहित्यिकांना कार्यकर्त्यांच्या भूमिकेत अग्निकुंडात उतरण्याचे आवाहन करीत आहे. या नव्या संविधाननिष्ठ चळवळीच्या संदर्भात आंबेडकरी विचारवंत यशवंत मनोहरांचीही भूमिका तीच आहे.
– प्रज्ञाधर ढवळे, नांदेड.
मो. 9890247953

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *