जालना (प्रतिनिधी) ः राज्य शासनाच्या घनवन दलितेत्तर विकास योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना नगर पालिकेने रामतीर्थ स्मशानभूमी व कुंडलीका नदीतील मोकळ्या जागेत 33 हजार वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरीकांना फिरण्यासाठी जॉगींग ट्रॅकची निर्मिती देखील करण्यात येणार असल्यामुळे जालना शहराच्या वैभवात व सुशोभिकरणात भर पडणार असून घनवनातून मोठ्या प्रमाणात ऑक्सीजन मिळण्यास मदत होईल असा विश्वास आ. कैलास गोरंट्याल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी व्यक्त केला आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, रामतीर्थ स्मशानभूमी व कुंडलीका नदीच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत सदर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आ. कैलास गोरंटयाल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंट्याल यांनी जालन्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्याकडे सादर केल्यानंतर बिनवडे यांनी या प्रकल्पाला मुर्त स्वरूप दिले हेोते. या प्रकल्पाअंतर्गत वड, पिंपळ, आवळा, करंज, बदाम, सागवान, रिठा कांचन इत्यादी 200 प्रकारची रोपे सदर परिसरात लावण्यात येत आहेत. एका चौरस मिटरमध्ये तीन वृषांची लागवड करण्यात येत असून येत्या वर्षभराच्या कालावधीत ही झाडे मोठी होऊन दाट जंगलच इथे अवतरणार असल्यामुळे सदर दृष्य मनोहारी असेल व जालन्याच्या वैभवात, सुशोभिकरणात भर घालणारे असेल. सदर कामाचे कंत्राटदार प्रवरानगरचे डॉ. संजय दळे पाटील हे असून पूढील तीन वर्षे ते या घनवनाची देखभाल करणार आहे. या घनवनाची कल्पना जपानी असली तरी सदर प्रकल्पा अंतर्गत लावण्यात येणारी झाडे मात्र सगळी देशी असल्याचे सांगुन गोरंट्याल म्हणाले की, मिया वॉकी फॉरेस्ट असे या योजनेचे नाव असून या घनवनातून भरपूर ऑक्सीजन मिळणार आहे. थोडक्यात हा ऑक्सिजन पार्कच असल्याचे सांगुन कोविड काळात हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पामुळे रामतीर्थ स्मशानभूमी व रामतीर्थावरील बंधाऱ्याची शोभा देखील वाढणार असल्याचे आ. गोरंट्याल यांनी सांगीतले. दरम्यान आ. कैलास गारंटयाल व नगराध्यक्षा सौ. संगीताताई गोरंटयाल यांना या प्रकल्पा संदर्भात खूप रूची असून ते या प्रकल्पाच्या कामावर विशेष लक्ष ठेवून आहेत. सदर प्रकल्प चांगल्या पध्दतीने कसा उभारता येईल या दृष्टीने वेळोवेळी त्यांच्याकडून सुचना केल्या जात असल्याचे इंजि. एस. एन. कुलकर्णी यांनी सांगीतले.
Leave a Reply