जालना :- जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपीक, फळपिकांसह पावसाचे पाणी घरामध्ये गेल्याने नागरिकांच्या सामानाच्या झालेल्या नुकसानीची राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष भेट देत पहाणी करुन उपस्थितांकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेत शेत व फळपिकांचे तातडीने पंचनामे करुन अहवाल सादर करण्याबरोबरच पाण्यामुळे ज्या नागरिकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे अशा कुटूंबांना सानुग्रह अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.या पहाणी प्रसंगी कल्याणराव सपाटे, मनोज मरकड, डॉ. गणेश पवार, रईस बागवान, बाळासाहेब नरवडे, निसार देशमुख, सतीष होंडे, भागुजी मैंद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस, तहसीलदार नरेंद्र देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रणदिवे आदींची यावेळी उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असून मूग, कापूस, सोयाबीन, उडिद,ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन मोसंबी व द्राक्ष या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन अहवाल शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
वीज पुरवठा पुर्ववत करा
अतिवृष्टीमुळे अनेक गावातील वीजेच्या खांबाचे मोठे नुकसान झाल्याने गावातील घरांबरोबरच शेतीच्या वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे. जालना जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे वीजेचा पुरवठा खंडित झाला आहे याची माहिती घेऊन वीज पुरवठा पुर्ववत करण्याचे निर्देश यावेळी उपस्थित विद्युत विभागांच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.
पावसाच्या पाण्याने घराचे नुकसान झालेल्या कुटूंबांना सानुग्रह अनुदान उपलब्ध करुन द्या
मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये नदीकाठी व ओढ्याच्या काठी घरे असलेल्या अनेक गोरगरीब कुटूंबांच्या अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच घरावरील पत्र्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्या ज्या गावात अशाप्रकारे नुकसान झाले असेल त्या प्रत्येक गावात नुकसानीचे पंचनामे करुन बाधित कुटूंबांना शासन निर्णयाप्रमाणे सानुग्रह अनुदान तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत तलाठी, कृषी सहायक यांनी नुकसानग्रस्त एकही गोरगरीब मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.
नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळवा
प्रधानमंत्री पिकविमा योजना खरीप हंगाम 2021 साठी जालना जिल्हयामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन गारपीट, ढगफुटी, अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते. या जोखमीअंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढवुन किंवा ओसंडुन वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शिरुन दीर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे 72 तासाच्या आत नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. त्यामुळे शेती, फळबागा तसेच ईतर झालेल्या नुकसानीची माहिती तातडीने विमा कंपनीकडे अथवा आपल्या गावातील कृषि सहाय्यकांकडे सादर करण्याचे आवाहनही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी पालकमंत्री श्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे दिलावर बाबखा पठाण, रफिक इब्राहिम बेग, सय्यदा शेख उसमान यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देत त्यांच्याशी संवाद साधुन झालेल्या नुकसानीची माहिती घेऊन पावसामुळे नुकसान झालेल्या मूग, उडीद, कापूस, मोसंबी, ऊस आदी पिकांची पहाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सुखापुरी येथे सुभाष भुतेकर, अफसर गणी शेख, मोहन शिंदे यांच्या घराच्या झालेल्या नुकसानीची पहाणी करत पद्मावती नदी काठावरील असलेल्या गावांना पुराच्या पाण्याचा नेहमी धोका असल्याने या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी घरकुले उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचनाही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी पालकमंत्री श्री टोपे यांनी अंबड तालुक्यातील धाकलगाव, लखमापुरी, करंजळा, घनसावंगी तालुक्यातील खापरदेव हिवरा व मोहपुरी या गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने झालेल्या नुकसानीची पहाणीही केली.
Leave a Reply