उरण(संगिता पवार) सिडकोच्या अधिकाऱ्यांचे आश्वासन उरण पनवेल महामार्गावरी फुंडे स्टॉप जवळील पूल तातडीने दुरुस्त करावा या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने सिडकोच्या द्रोणागिरी नोडच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाच्या शिष्टमंडळाला सिडकोच्या अधिकाऱ्यांनी पुलाची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात पुढील चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी उरणच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत सिडको व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक घेण्यात येणार आहे.
सिडकोच्या भ्रष्टाचारी कारभारामुळे एप्रिल महिन्यात फुंडे गावाजवळील पूल कोसळला होता. या अपघातात दीपक कासुकर नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर सिडकोच्या इतर पुलांचे परीक्षण करण्याची मागणी झाल्यानंतर उरण पनवेल रस्त्यावरील फुंडे स्टॉप जवळील पूल कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे धोकादायक बनलेल्या पुलावरील एस टी व एन एम एम टी ही सार्वजनिक बस सेवा या मार्गावरून बंद करण्यात आली. त्यामुळे बोकडविरा, फुंडे,पाणजे, डोंगरी तसेच येथील सिडकोच्या रहिवाशांना उरण किंवा जेएनपीटी कामगार वसाहती पर्यंत बस पकडण्यासाठी रिक्षाला 30 रुपये खर्च करून जावे लागत आहे. तर दुसरीकडे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बसेसनाच का बंदी केली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची समस्या दूर करून रस्ता सार्वजनिक वाहतुकीसाठी पुरवत सुरू करण्याची मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. यावेळी जेएनपीटी चे कामगार विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील,किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,संजय ठाकूर,जनवादी महिला संघटनेच्या नेत्या हेमलता पाटील,फुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर घरत,माजी सरपंच ज्योती म्हात्रे,डी वाय एफ आय चे राकेश म्हात्रे, उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत हे ही उपस्थित होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाशी सिडकोचे कार्यकारी अभियंता एम.एम.मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पुलाच्या उभारणीत सीआरझेड,खारफुटी व पर्यावरणवादी यांचा अडथळा असून पर्यावरण विभागाच्या परवानग्या घेण्यासाठी वेळ लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शिष्टमंडळाने पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी लावून धरली यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी कमकुवत पुलाचे पुन्हा एकदा परीक्षण करून त्याची दुरुस्ती कशाप्रकारे करता येईल ते पहिले जाईल, मात्र दुरूस्तीचे काम करण्यासाठी सार्वजनिक विभागाकडून मागणी सिडकोच्या माध्यतून पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे शक्य असल्याचे मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम दृष्टीक्षेपात असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे यावेळी भूषण पाटील यांनी पूल दुर्घटनेतील मयताच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याची मागणी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याची मागणी केली.
Leave a Reply