जालना (प्रतिनिधी):- मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे पिके भुईसपाट झाली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करता हेक्टरी ५० हजार रु. मदत जाहीर करावी , अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही आघाडी सरकारमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्द उच्चारत नाहीत याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे , असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी पत्रकात म्हटले आहे की,मराठवाड्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे जवळपास ४० लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेला शेतकरी वर्गापुढे जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे राज्य शासनाने मराठवाड्यातील सर्वच्या सर्व ८ जिल्ह्यांत ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्यांची वाट न पाहता शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रु. मदत देण्याची आवश्यकता आहे. सत्तेवर येण्यापूर्वी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना ५० हजार रु. हेक्टरी भरपाई देण्याची मागणी केली होती. आता ठाकरे यांनी आपण केलेली मागणी पूर्ण करावी आणि संकटात सापडलेल्या बळीराजाला मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे.
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे खरिपाची कापुस, सोयाबीन, मका, मुग, उडीद ही पिके १०० टक्के वाया गेली आहेत. ऊसाचे पीकही आडवे झाले आहे. या पावसात शेतकऱ्यांची हजाराच्या वर जनावरे वाहून गेली आहेत. राहती घरे जमीनदोस्त झाली आहेत. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान एक हजार कोटींपेक्षा अधिक असावे असा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने पंचनाम्याचे कागदी घोडे नाचवायला सुरुवात केली आहे. आता सरकारने पंचनामे होण्याची वाट न बघता सरसकट हेक्टरी ५० हजार रु. मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, असेही भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांचे एवढे नुकसान होऊनही अशोकराव चव्हाण, धनंजय मुंडे, राजेश टोपे, अमित देशमुख, अब्दुल सत्तार, संदिपान घुमरे हे मराठवाड्यातील मंत्री मात्र मूग गिळून गप्प आहेत. या मंत्र्यांनी सरकारला मदत जाहीर करण्यास भाग पाडले पाहिजे. अन्यथा या मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या संतापाला तोंड द्यावे लागेल , असा इशाराही भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी पत्रकात दिला आहे.
Leave a Reply