जालना ( प्रतिनिधी ) : आटोक्यात आलेल्या कोवीड संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत चालला असून रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून आदेश प्राप्त होताच जालना नगरपालिकेच्या वतीने शहरातील मंगल कार्यालये व खासगी शिकवणी घेणार्या कोचिंग क्लासेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून मागील तीन दिवसांपासून स्वतः मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांच्या सह स्वच्छता अधिक्षक व स्वच्छता निरिक्षकांनी शहरातील मंगल कार्यालयांचे मालक व खाजगी शिकवणी घेणारे कोचिंग क्लासेस चे संचालक यांच्या भेटी घेऊन नियम पाळण्याबाबत बाबत कडक सूचना दिल्या आहेत.
जालना शहरासह जिल्हाभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली असून मृत्यू चे प्रमाण ही वाढत चालले आहे. शनिवारी ( ता. २०) कोरोनाग्रस्त दोन रुग्णांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तथापि तीन दिवसांपूर्वी अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार कोरोना प्रतिबंधक उपाय योजना संदर्भात तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते .त्या अनुषंगाने आ. कैलास गोरंट्याल,नगराध्यक्षा सौ संगीताताई गोरंट्याल, उपनगराध्यक्षा फरहाना सय्यद रहीम, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर ,स्वच्छता सभापती हरेश देवावाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख राहुल मापारी यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक व दफेदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस ची तपासणी करण्याचे सुचित केले . जुना जालना भागातील मातोश्री लॉन्स, गोल्डी लॉन्स, सुयश मंगल कार्यालय, वृंदावन गार्डन ,पाठक मंगल कार्यालय तसेच खाजगी शिकवणी घेणार्या क्लासेस ना स्वच्छता अधीक्षक राजू मोरे, स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे, दफेदार श्रावण सराटे यांनी भेटी देऊन तपासणी केली. मर्यादेपेक्षा अधिक गर्दी नको ,सॅनिटायझर, भौतिक अंतर या सर्व नियमांचे पालन करावे. प्रथम वेळी नोटीस देऊन सूचित केले जाईल पुन्हा आढळल्यास नियमांचे भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून सील करण्यात येईल. अशा कडक सूचना देण्यात आल्या असून सदर तपासणी मोहीम शहरात व्यापक स्वरूपात राबवली जात आहे. दरम्यान गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरतांना आढळल्यास दंडात्मक कार्यवाही केली जाईल असे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले
नोटीस देऊन गुन्हे दाखल करणार : मुख्याधिकारी नार्वेकर
विवाह समारंभास शंभर व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आली आहे. तर खाजगी शिकवणी वर्गात भौतिक अंतर ठेवून विद्यार्थी बसवावेत. शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी मास्क लावणे तसेच सॅनिटाइजर चा वापर करणे बंधनकारक असून या सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. प्रथम दर्शनी नियमांचे पालन न झाल्यास नोटीसा देण्यात येतील. असे सांगून पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंगल कार्यालय, कोचिंग क्लासेस सील करून संचालकांवर गुन्हे दाखल केले जातील .असा कडक इशारा मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी दिला आहे. तथापि शहर वासीयांनी घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा, नगरपालिकेच्या पथकांकडून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही केली जाईल. असे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी सांगितले.
Leave a Reply