ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय संविधानातील लोकशाहीमुळेच देश सक्षम झाला; संविधान संस्कृतीचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र लेंडे यांची ग्वाही

December 6, 202115:45 PM 62 0 0

नांदेड – भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे. जगातील सर्वात मोठी राज्यघटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, गोत्र, भाषा राहणीमान, प्रांत असतांनासुद्धा सर्वाना भारतीय राज्य घटनेने एका सूत्रात बांधून सर्वाना भारतीय लोकशाही प्रणाली बहाल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाने मानवतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून त्यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली. संविधानातील लोकशाही तत्वांमुळेच आज देश सक्षम असल्याची ग्वाही संविधान संस्कृतीचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी दिली. ते महापरिनिर्वाणदिनानिमित्त सुरू असलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते.‌ यावेळी महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे, व्याख्यानसत्राचे समन्वयक गंगाधर ढवळे, सज्जन बरडे, भैय्यासाहेब गोडबोले, किशनराव पतंगे, सीमा मेश्राम, साहेबराव पाईकराव, अरुण वाघमारे, सूनील गवळे, अमृत बनसोड, सुनंदा बोदिले आदींची उपस्थिती होती.

अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने ३ डिसेंबरपासून ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संविधानातील लोकशाही या विषयावर डॉ. शैलेंद्र लेंडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लोकशाही प्रणाली योग्य प्रकारे देशातील जनतेच्या हितासाठी, समृद्धीसाठी व विकासासाठी राबवावी हे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आहे. नवसमाज व नव भारताची निर्मिती करण्याकरिता मी प्रथमत: भारतीय आणि शेवटीही भारतीयच आहे असा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा घटनेने दिली. संविधानाची अंमलबजावणी जर यथायोग्य झाली तर या देशाचे कल्याणच होईल. पण भारतात हजारो वर्षापासून ब्राह्मणी वर्णव्यवस्थेचा पगडा असल्यामुळे जैन, ख्रिश्चन, मुसलमान, इसाई, शिख व अन्य धर्म, पंथ यांचीही मानसिकता हिंदुधर्माला पोषक आहे. या देशात बौद्ध धम्म आणि हिंदू धर्म यांचा संघर्ष हजारो वर्षापासून चालतच आहे आणि पुढेही असाच चालू राहणार आहे.

लोकशाही संपली की लोकांची सत्ता संपते. प्रजासत्ताक ही संकल्पनाच धोक्यात येते. हा खरा चिंतेचा विषय आहे. लोकशाहीत लोकांनी-प्रजेने जागरूक राहिले पाहिजे. न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या संविधानिक तत्त्वमूल्यांचा अंगीकार केला पाहिजे. व्यक्तीची प्रतिष्ठा जपली पाहिजे. कोणताही भेदभाव न करता, माणसाशी माणुसकीचे वर्तन करणे म्हणजे बंधुभाव वृद्धिंगत करणे होय. त्यासाठी, भांडवलशाही, ब्राह्मणशाही, वर्णव्यवस्था इत्यादींच्या विषमतावादी आणि भेदाभेदाच्या विचारसरणीला कडाडून विरोध करण्याची व ती नाकारण्याची गरज आहे. जातीयवाद आणि भ्रष्टाचार यामुळे देशाची अधोगती होऊ लागली आहे. हे वेळीच थांबविणे आपले कर्तव्य आहे, याची आठवण डॉ. लेंडे यांनी या निमित्ताने केली. महामंडळाच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह घेण्यात आलेल्या या व्याख्यानास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा डाव
आजच्या घडीला राजकीय पक्ष, त्यांचे नेते व कार्यकर्ते यांचे वर्तन संविधान व कायद्यानुसार होताना दिसत नाही. संविधानिक संस्था तसेच संविधान व कायदे राबविणाऱ्या विभागातील व्यक्ती राजकीय सत्ताधाऱ्यांपुढे हतबल होताना दिसत आहेत. मीडियासुद्धा सत्ताधार्जिणा होऊन वागताना दिसतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून देशात असहिष्णुता, जातीयवाद, धर्मांधता पसरविण्याचे प्रयत्न होताना दिसतात. आपण पाहतो आहोत की, समाजातील शोषित-उपेक्षित-दुर्लक्षित समाज घटकांच्या हितासाठी कायदे व कायद्यांची परिणामकारक व प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. सध्या शेतकरी-शेतमजूर, अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त, विमाप्र, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला व बालके तसेच सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग यांच्यावर शासक वर्गाकडून होणारे अन्याय-अत्याचार, शोषण यांद्वारे लोकशाही व्यवस्थेला सुरुंग लावण्याचा डाव आहे. दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून जे शेतकरी आंदोलन सुरू होते हे एक ज्वलंत उदाहरण आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *