ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाणी, रस्ते, रोजगारासह विकास योजना गतीमानतेने राबवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

December 12, 202015:18 PM 117 0 0

औरंगाबाद :  पाणी, रस्ते, रोजगार वृद्धी यासोबत पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता आणि विकास योजना गतिमानतेने राबवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराची रखडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे समाधान आहे. ही योजना आगामी सन 2052 वर्षांपर्यंतच्या शहरातील लोकसंख्येचा विचार करता त्यांना लागणाऱ्या पाणी वापराचा अंदाज घेऊन नव्याने आखण्यात आली आहे. गतीमानतेने ती पूर्णत्वास नेण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले. चिखलठाणा येथील गरवारे क्रीडा संकुल येथे मनपाच्या औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन आणि आभासी पद्धतीने हिंदूहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन आणि स्मारक भूमिपूजन, जंगल सफारी पार्क भूमिपूजन, शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ श्री. ठाकरे यांच्याहस्ते झाला, यावेळी श्री.ठाकरे बोलत होते. या कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सर्वश्री आमदार अंबादास दानवे, सतीश चव्हाण, हरिभाऊ बागडे, प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे यांच्यासह विनोद घोसाळकर, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता,  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबाद शहरावर विशेष प्रेम होते. तसेच औरंगबादकरांचेही स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते. त्यामुळे या शहराच्या विकासाला अधिक प्राधान्य आहे. येथील गुंठेवारीचा प्रश्न, सिडकोतील घरे, मालकी हक्कांचा प्रश्न याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातून जात असलेल्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणीदेखील मागील आठवड्यात केली. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा हा महामार्ग 1 मेपूर्वी पूर्णत्वास नेण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा देखील केली. शेतकरी हा अन्नदाता आहे, त्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे. औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव देखील केंद्र शासनाला पाठविण्यात आलेला आहे.

शासनाच्या विविध योजनांना गती देण्यात येत असून त्या पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करण्यात येत आहे. बरोजगारांना रोजगार मिळवून देणे, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. तरीदेखील जनतेनेही कोरोनाच्या सद्यकाळात  निष्काळजीपणा करू नये. जनतेने शासनाच्या सर्व सूचनांचे यापूर्वीही पालन केलेले आहे. तसेच यापुढेही करावे, जेणेकरून कोरोनाचा प्रसार वाढणार नाही. यासाठी मास्कचा वापर कटाक्षाने करावाच, शारीरिक अंतर राखावे व वारंवार हात धुवावेत, याबाबतही जनतेला श्री. ठाकरे यांनी आवाहन केले.

शहरात उभारण्यात येणारे स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक यामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीयत्वाचे विचार पहावयास मिळतील. या स्मारकातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल, असेही श्री. ठाकरे म्हणाले.

पालकमंत्री श्री. देसाई यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांची माहिती दिली. त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योग विभागाच्या पुढाकारातून मेल्ट्रॉन येथे सुसज्ज असे कोविड रुग्णालय उभारण्यात आले. पुढे या रुग्णालयाचा संसर्गजन्य आजारांचा उपचार घेण्यासाठी उपयोग होईल. श्री. ठाकरे यांच्याहस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून शहरवासीयांना मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यास मदत होईल. राज्यातील सर्वात मोठी ही पाणी पुरवठा योजना आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे महिलावर्गाला याचा मोठ्याप्रमाणात लाभ होईल, असेही ते म्हणाले.

शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यातील पर्यटन केंद्रे जनतेसाठी खुली करण्यात आलेली आहेत. या पर्यटन केंद्रांप्रमाणेच शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक, सफारी पार्क याची भर पडणार आहे. मराठवाड्यात मोठ्याप्रमाणात उद्योग यावेत, बेरोजगारांना रोजगार मिळावा, पाणी टंचाईचे प्रश्न मार्गी लावण्यासाठीही शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी मुंबई, कल्याण आणि ठाणे येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकांप्रमाणे औरंगाबादेत होत असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारकाबाबत समाधान व्यक्त केले. औरंगाबाद शहरातील रस्ते, समृद्धी महामार्ग, कर्जमुक्ती योजना आदींबाबतही शासनाच्या विविध कामांबाबत सांगितले. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांनीही पाणी पुरवठा योजनेचे कौतुक करताना मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. आगामी काळात मराठवाड्यात पाणी टंचाई भासू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

सुरूवातीला श्री. ठाकरे यांना पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर श्री. ठाकरे यांच्याहस्ते विधीवत पद्धतीने पूजन करून मनपा व महाराष्ट्र जीवन प्राध‍िकरणाच्या औरंगाबाद शहर पाणी पुरवठा प्रकल्प व विकास कामांचे भूमिपूजनाच्या कोनशिलेचे अनावरण श्री. ठाकरे यांच्याहस्ते झाले. तसेच आभासी पद्धतीने स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक, सफारी पार्क, शहरातील 23 रस्त्यांच्या कामांचा शुभारंभही करण्यात आला. मनपाच्यावतीने श्री. ठाकरे व मान्यवरांचे श्री. पांडेय यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा कन्नडकर यांनी केले. आभार आ. श्री. दानवे यांनी मानले.

श्रीखंड्याच्या रूपात मुख्यमंत्री

उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी त्यांच्या भाषणात औरंगाबादच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत सांगताना ज्या पद्धतीने पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज यांच्या घरातील हौद श्रीखंड्याच्या कावडीने अखेर भरला. या अख्यायिकेचा संदर्भ देत श्री. देसाई यांनी श्रीखंड्याच्या रूपाने मुख्यमंत्री यांच्या हातून या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन होत असल्याचे सांगत आनंद व्यक्त केला. या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी जनतेला पाणी देण्यासाठी श्रीखंड्याची भूमिका आनंदाने स्वीकारत पाणीप्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याहस्ते भूमिपूजन झालेल्या योजना

 पाणी पुरवठा योजना

सध्या शहराची लोकसंख्या सुमारे 16 लक्ष असून वाढीव लोकसंख्येमुळे नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. औरंगाबाद शहरासाठी अस्तित्वातील पाणी पुरवठा योजना अत्यंत अपुरी पडत असल्यामुळे औरंगाबाद महानगर पालिकेतर्फे औरंगाबाद शहर पाणी पुरवठा प्रकल्पाच्या प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत मान्यता प्रदान केली आहे.

पाणी पुरवठा योजनेची वैशिष्टये

  • शहरालगतच्या सातारा, देवळाईसह पाणी पुरवठा व्यवस्था नसलेल्या शहरातील इतर भागास पाणी पुरवठा करणे.
  • शहरातील अस्तित्त्वातील व प्रस्तावित जलकुंभांना गुरूत्व वाहिनीव्दारे पाणी पुरवणे शक्य व्हावे यादृष्टीने नक्षत्रवाडी जवळील टेकडीवर मुख्य संतुलन जलकुंभ बांधणे.
  • जायकवाडी पंपगृहातील पंपींग मशिनरी, जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील जलकुंभापर्यंत स्वयंचलित यंत्रणा उभारणे व त्याचे जलशुद्धीकरण केंद्र येथून केंद्रीय पद्धतीने नियंत्रण करणे.
  • जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणे.
  • योजना पूर्ण होण्याचा कालावधी 3 वर्षे असून, योजना पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष त्याच कंत्राटदारामार्फत चालविणे.

      प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेची माहिती

·                    उद्भवजायकवाडी प्रकल्प
·         दरडोई पाणी पुरवठ्याचा दर135 लि./ दिन/ माणसी
·         योजनेची प्रकल्पित लोकसंख्या (सन 2052)33,17,342
·         एकूण पाणी मागणी (सन 2052)604.86 द.ल.लि. प्रती दिन
·         योजनेची किंमतरू. 1680.50 कोटी (निव्वळ)
·         शासकीय अनुदान (70 टक्के)रू. 1176.35 कोटी
·         स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा (30 टक्के)रू. 504.15 कोटी
·         शहरापर्यंत पाणी आणण्याचा खर्च (सन 2022)1 पैसा प्रति लिटर (रू.10 प्रति 1000 लि)

 स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारक

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व स्मारकामध्ये स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारणे, म्युझियमसाठी इमारत बांधणे, तसेच अंशत: परिसर विकास, स्मृतीस्थळाचे अंशत: विद्युतीकरण उद्यान विकासकामे, फूटपाथ व संरक्षक भिंत बांधण्याच्या नियोजनासाठी शासनाने 25.50 कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

 सफारी पार्क

सफारी पार्क प्रकल्पाकरिता महाराष्ट्र शासनाकडून 54 हेक्टर जागा औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील मिटमिटा परिसरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाच्या विकास आराखड्यास केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प 3 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. टप्पा-1 मध्ये सफारी पार्कच्या सभोवताली संरक्षक भिंत, गेट व जमीनसपाटीरण चे काम करण्यात येणार आहे. यासाठी टप्पा 2 मध्ये सफारी पार्कमधील अंतर्गत रस्ते, फुटपाथ, विद्युतीकरण, अंतर्गत पाणीपुरवठा योजना, अंतर्गत कचरा विल्हेवाट, सांडपाणी विल्हेवाट प्रक्रिया, पार्किंगची जागा बांधणे आणि अन्य अंतर्गत इमारतीचे बांधकाम करणे. टप्पा-3 मध्ये प्राण्यांकरिता संरक्षित पिंजरे व इतर आवश्यक बाबींचे काम प्रस्तावित आहे. निविदा मागविण्यात आलेल्या होत्या व त्याअनुषंगाने निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन, कामाची सुरूवात लवकर करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

शासन अनुदानित रस्ते विकास प्रकल्प : रू. 152.58 कोटी

औरंगाबाद शहरातील व चिकलठाणा एमआयडीसी भागातील महत्त्वाच्या एकूण 67 रस्ते विकास करण्यासाठी रक्कम रू. 235 कोटी एवढ्या निधीची मागणी शासनाकडे केली होती व त्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा शासनास सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने रक्कम रू. 152.58 कोटी मर्यादेत औरंगाबाद शहरातील एकूण 23 रस्त्यांचे काँक्रीट, डांबरीकरण करण्याच्या कामासाठी रू.152.58 कोटी रक्कम मंजूर केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *