ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दीक्षा भूमी :नागभूमीतील बुध्दाचे अधिष्ठान

October 14, 202119:09 PM 22 0 0

दीक्षाभूमीचे महत्त्व विषद करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या उत्तुंग कार्याची जाणीव होते. त्यांचे कार्य हाच आपल्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे. आजच्या विजयी दशमी दिनी त्यांच्या बहुमोल कार्यावर माझ्या लेखनीतून टाकलेला प्रकाश..

१३ ऑक्टोबर १९३५ हा दिवस डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अतिशय महत्वपूर्ण दिवस मानावे लागेल. कारण या दिवशी घेतलेला निर्णय एक क्रांतिकारी आणि विश्वपरिवर्तनीय ठरला. येवला या ठिकाणी आपल्या दहा हजार अनुयायांच्या उपस्थितीत धर्मांतराचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

पण का घ्यावा लागला हा निर्णय हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. लहानपणापासून शिक्षण घेताना समाज व्यवस्थेचे विषमता, आणि जातीयतचे चटके सोसावे लागले. तेव्हापासून परीवर्तनाचे बीज त्यांच्या मनात परले जात होते असे म्हणायला हरकत नाही. कारण त्यांच्या छोट्या मनालाही विविध प्रश्न चक्रावून टाकत असत. धर्म हा माणसासाठी का माणूस धर्मासाठी. धर्माला सर्व माणसे समान हवीत. तेथे सर्व हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य सारखेच असावे. मग ही विषमता का आणि कशासाठी? यातूनच त्यांचा हिंदू धर्माविषयी दुरावा वाढत गेला. समाजातील समता आणि एकता यासाठी त्यांच्या मनात निग्रह वाढत गेला. यावर उपाय म्हणून त्यांनी समतेचा हक्क मिळविण्यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह, चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणले. पण त्यातून मिळावे असे यश मिळाले नाही. म्हणून त्यांनी स्वावलंबी, स्वतंत्र होण्याचा विचार केला. धर्मांतराचा एकमेव विचार त्यांच्या समोर आला.या धर्मांतराच्या घोषणेची वेगाने चोहीकडे पसरली.

या धर्मांतराच्या घोषणेवर म.गांधींनी प्रतिकूल मत व्यक्त केल्यावर त्याला उत्तर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,”हिंदू धर्माची बैठक असमानतेच्या पायावर आहे. म्हणून हिंदू धर्म अस्पृश्यांना त्याज्य आहे. हीच या धर्मातील असमानता धर्मांतराच्या दुःखाचे मुळ आहे (महामानव,भी.रा.आंबेडकर पृ.३०७)

पण कोणता धर्म स्विकारावा हा प्रश्न त्यांच्या पुढे होता. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला.

त्यात प्रामुख्याने शीख,ख्रिश्चन आणि मुस्लिम यांचा उल्लेख करता येईल. तद्वतच या धर्मांतराचा सर्वच  धर्मावर परिणाम होताना दिसून येत होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह आमच्या धर्मात यावे. अशी विविध धर्मांकडून निमंत्रणे येत होती.

१६ ऑक्टोबर १९३५ रोजी ‘शीख धर्म एकेश्वरी व समताप्रवण आहे, तो तुम्ही स्वीकारावा’अशा मजकूराची तार अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचे उपाध्यक्ष सरदार दरीपसिंग ठोबिया यांनी अमृतसरहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाठविली.(महामानव डॉ. भी.रा.आंबेडकर, पृ.३०८) तर मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मांनाही वाटत होते की, बाबासाहेबांनी आमचा धर्म स्वीकारावा. जर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर हिंदू धर्मावर मोठे संकट ओढवेल म्हणून डॉ. एम.बी.वेलकर यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑक्टोबर १९३५ रोजी एक शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटले. या शिष्टमंडळाला तत्परतेने धीर देताना डॉ.बाबासाहेब म्हणाले,”जेणे करून भारत देशाच्या हिताला धोका होईल, अशा प्रकारचे धर्मांतर मी करणार नाही. याबद्दल तुम्ही निश्चिंत असा”.

यावर धर्मांतराच्या बाबतीत आपली व आपल्या समाजाची फसवणूक होवू नये म्हणून त्यांनी मुस्लिम, ख्रिस्ती, शीख, बौध्द,जैन इत्यादी धर्मांचा व त्यांच्या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला. आपल्या समाज बांधवांना उद्देशून ३० मे १९३६ रोजी’आपला धर्मांतर करण्याचा निर्णय किती महत्त्वाचा आहे’ हे समजावून सांगितले. धर्म म्हणजे काय हे समजावून देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,”ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म होय. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म होय.ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही, तो धर्म मला स्वतः ला मान्य नाही. व्यक्ती चा विकास हेच धर्माचे खरे ध्येय आहे,असे मी समजतो. व्यक्तीच्या आत्मोन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मुलभूत कल्पना आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवहित जोपासणारा, मानुस केंद्रित मानवतावादीआणि विज्ञान वादी धर्म हवा होता. आणि त्यांच्या अभ्यासअंती बौध्द धर्म स्वीकारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सोहनलाल शास्त्री यांच्याशी दिल्ली येथे संवाद करीत असताना डॉ.बाबासाहेबांना त्यांनी विचारले,’बाबासाहेब, तुम्ही मुस्लिम किंवा ख्रिस्ती धर्म का  स्वीकारला नाही?

यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सुंदर आणि मार्मिक  उत्तर दिले. ते म्हणाले,”ते धर्म मला फायदेशीर होतीलही. पण ते भारतात  निर्माण झालेले नाही. यातून पैसा मिळेल, राजकीय बळ मिळेल.  पण ह्यासर्व गोष्टी परस्वाधीन होऊन कराव्या लागतील. दुसऱ्याच्या ओंजळीने दुसऱ्याचे पाणी पिऊन आपल्या सर्वांगीन प्रगतीची तहान भागविणे हा पुरुषार्थ नव्हे. स्वतः च्या हिमतीने, स्वावलंबाने व स्वाभिमानाने आणि स्वदेशी नव्या धर्माच्या आश्रयाने आपण आपली प्रगती केली तर तो खरा पुरुषार्थ ठरेल. आणि भारतीय इतिहासात तो सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल.

बौध्द धर्म हे भारतीय संस्कृतीचेच एक अंग आहे. तो विश्व धर्म आहे. बौद्ध धर्मात देव,आत्मा यांचा विचार केला नसून मानसाने मानसाशी कशा प्रकारे वागले पाहिजे याचा विचार केला आहे. त्यात भेदभाव नाही. या धर्मातच प्रज्ञा (बुद्धी),करुणा (प्रेम) आणि समता या तीन तत्वांचा संयोग आहे. याच तीन तत्वांचे जगाला ही आकर्षण आहे. तो स्वीकारला तर तो हिंदु समाजाला नुकसानकारक होण्याऐवजी उपकारक होणार आहे. त्यात सर्व भारतीयांचे हीतच आहे. बुद्धाने आपण ईश्वराचे अवतार आहोत, आपण त्याचे प्रेषित आहोत किंवा आपण त्याचे एकमेव पुत्र आहोत असे केव्हाही व कोठेही सांगितले नाही.या धर्मामध्ये मनुष्याला पूर्ण वैचारीक स्वातंत्र्य दिले आहे व मानवतेला आणि सद्सद्विवेकबुद्धीला पटतील त्याच गोष्टी ग्राह्य मानण्यात आल्या आहेत.  बुद्धाने बदलल्या काळाशी विसंगत वाटणाऱ्या आपल्या सांगण्यात सुध्दा काळानुरूप परीवर्तन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. हे परीवर्तनशील काळाच्या व मानवहिताच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे.

हा धर्मांतराचा सोहळा प्रथम मुंबई येथे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते स्थळ बदलून नागपूर या ठिकाणी ठेवण्यात आले. याबद्दल बाबासाहेब म्हणतात, मी नागपूरच हे स्थळ का निवडले. तर ते नागांची भूमी आहे. तेथे नागवंशीय लोकांचे वास्तव्य होते. आणि ह्याच नाग लोकांनी बुध्दाचा वारसा जपला.बौद्ध धम्मांचा प्रसार केला.आणि याच नाग लोकांचे आपण वंशज आहोत. ह्याच एकमेव कारणामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेण्यासाठी नागपूर हे ठिकाण निवडले.

पण धर्म स्वीकारतांना एक गर्भित ईशाराही दिला. आज आम्हाला नवी वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. तो भारतातीलच आहे. या देशात  २००० वर्षे बौद्ध धर्म  होता. बुध्दाने सांगितलेली तत्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. एवढी उदारता यामध्ये आहे. हा धर्म बहुजन हिताय,बहुजन सुखाय,लोकानुकंपाय,धम्मंआदि कल्याणं,मध्य कल्याणं,पर्यावसान कल्याणं आहे. तो उसापरी सुरुवात,मध्यम आणि शेवट ही गोड आहे. तसेच

यावरून तुमची ही मोठी जबाबदारी आहे. तुमच्या बद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मानसन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हे आपणास साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करु. कारण बौध्द धर्माने जगाचा उद्धार होणार आहे. हे सांगताना ते पुढे म्हणाले

धर्माच्या नाशाची तीन कारणे नागसेनाने सांगितलेली आहेत.एखादा धर्म कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्त्वात गर्भितार्थ नसतो. तो धर्म तात्पुरता राहतो. दुसरे कारण धर्माचा प्रचार करणारे लोक विद्वान नसतील तर धर्म नाश पावतो. ज्ञानी मानसांनी धर्म ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकाशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रकार सिद्ध नसतील तर धर्मास ग्लानी येते. आणि तिसरे कारण हे की,धर्माची तत्त्वे विद्वानांपुरती राहतात.सामान्य व पाकृत लोकांकरिता मग केवळ मंदिरे राहतात.

आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनी म्हणजेच विजयादशमी  दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी  भिक्खू चंद्रमनी महास्थवीर यांच्या कडूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दिक्षित होऊन त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना दिक्षा दिली. आज  दिक्षा भूमी हे नागभूमीतील बुद्धाचे अधिष्ठान विश्व वंदनीय झाले आहे.

– बाबुराव पाईकराव, डोंगरकडा

        मो. 9665711514

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *