जालना प्रतिनिधी ः- जालना जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीसपदी दिलीप अहिरे यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. जालना जिल्हा आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर लहाने, कार्याध्यक्ष राजु रसाळ, जि.प. आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश राठोड, उपाध्यक्ष एस. टी. जाधव, सचिव आर. टी. अंभोरे आदींची प्रमुख उपस्थितीत होती. जिल्हाध्यक्ष शंकर लहाने यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेच्या सभागृहात जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि आरोग्य कर्मचार्यांची व्यापक बैठक काल दि. 9 जुन बुधवार रोजी आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत संघटनेच्या रिक्त झालेल्या सरचिटणीसपदी नविन पदाधिकार्यांची निवड करण्यासंदर्भात चर्चा करुन सदर पदावर दिलीप अहिरे यांची निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या निवडीनंतर अहिरे यांच्या उपस्थित पदाधिकार्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना जिल्हाध्यक्ष शंकर लहाणे म्हणाले की, संघटनेचे दिवंगत सरचिटणीस सुभाष मगरे यांनी आरोग्य कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेतील सर्व पदाधिकार्यांना सोबत घेवून व प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांशी समन्वय ठेवून विशेष प्रयत्न केले. त्यांच्या दुदैवी निधनामुळे आरोग्य कर्मचार्यांबरोबरच संघटनेचे देखील मोठे नुकसान झाले आहे असे सांगुन लहाने म्हणाले की, नव्याने सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपविण्यात आलेले दिलीप अहिरे हे देखील संघटन कौशल्याचा चांगला अनुभव असलेले पदाधिकारी असून त्यांच्या या नेमणुकीमुळे संघटनेला निश्चितपणे बळ मिळेल असा विश्वास लहाने यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्याध्यक्ष राजु रसाळ, जि.प. आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रमेश राठोड यांनीही अहिरे यांच्या निवडीचे आपल्या भाषणातुन स्वागत करुन अहिरे यांच्या अनुभवाचा संघटनेला लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बैठकीस एम. आर. बद्दर, दत्ता सरकटे, सी.एस. पाटील. आर. आर. तोटे, शेख बिलाल, राजु मुरकुटे, विकास देशमुख, राजु खंडागळे, पोटे, माने, रंजीत देशमुख, महेश खडेकर, बी.जी. राऊत, बा. पी. राव, लांडगे, देशमाने, श्रीमती कांता मोरे, श्रीमती वैद्य,आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply