उरण (संगिता पवार ) महाडमध्ये झालेल्या प्रलयंकारी महापुरामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना उरण तालुका दैनिक पत्रकार संघाने आदिवासी वाड्यांत फिरुन आवश्यक गरजेच्या वस्तूंचा संग्रह असलेल्या २०० किटचे वाटप करण्यात आले. कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा फटका चिपळूण, खेडसह महाड तालुक्यात जबरदस्त बसला आहे. सावित्री,काळ या नद्यांनी महाड शहर व त्याच्या काठावर वसलेल्या अनेक वाड्या वस्त्यांची मोठी हानी केली आहे.पुराचे पाणी सुमारे बारा ते तेरा फुटांपर्यंत वाढल्याने अनेकांचे संसार मातीमोल झाले आहेत.नदी काठच्या वाड्या वस्त्या पुराच्या प्रवाहात वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
या भयानक परिस्थितीचा सामना करताना प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आहे.पूर ओसरला आणि पूरग्रस्तांचे सुरू झालेली परवड थांबविण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले आहेत.त्यात आपलाही खारीचा वाटा असावा या हेतूने उरण तालुका दैनिक पत्रकार संघाचे समाजातील दानशूर व्यक्तींना पुरग्रस्तांसाठी मदत देण्याचे आवाहन केले.त्यास अनेकांनी प्रतिसाद दिला.जमा झालेली मदत उरण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड बिरवाडी,काळीज येथील लक्ष्मी आदिवासी वाडी, आसन पोई बौद्ध वाडी, आकले गाव तसेच भावे येथील आदिवासी वस्तीत जाऊन पुरग्रस्तांच्या घराघरात मदतीचे वाटप केले. यामध्ये चादरी, टॉवेल,टुथपेस्ट, साबण, मेणबत्ती, माचीस आदी गरजेच्या वस्तूंचा समावेश होता.
ही मदत पुरग्रस्तांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर ठाकूर,उपाध्यक्ष सूर्यकांत म्हात्रे,खजिनदार जीवन केणी,सेक्रेटरी राजकुमार भगत,सदस्य अनंत नारंगीकर,महेश भोईर,दत्तात्रेय म्हात्रे,सुभाष कडू, प्रदीप पाटील,जगदीश तांडेल, दिनेश पवार, उरणचे माजी नगराध्यक्ष परमानंद करंगुटकर व बिरवाडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य विश्वास गुरव आदी सहभागी झाले होते.
Leave a Reply