सातारा प्रतिनिधी (विद्या निकाळजे) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या ग्रामीण भागातील शाळांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने इन्फ्रारेड थर्मामीटरचे, तर सर्वसामान्य जनतेसाठी औषधी साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील शाळांची गैरसोय टाळण्यासाठी इन्फ्रारेड थर्मामीटरचे तसेच सामान्य रुग्णांना लाभ व्हावा, या हेतूने प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक औषधी साहित्य देण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांनी यावेळी सांगितले.
कोरेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात तेजस शिंदे यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले. यावेळी सभापती राजाभाऊ जगदाळे, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. रवींद्र खंदारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जाधव, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. राजन काळोखे, डॉ. योगेश टिकोळे, गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, डॉ. गणेश होळ उपस्थित होते.
तेजस शिंदे म्हणाले, “”कोरोना काळात आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात मायक्रो प्लॅनिंग केले. त्याची समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अंमलबजावणी झाल्याने कोरोनाबाधितांची संख्या घटली. ग्रामीण रुग्णालयासह सातारा व खटाव तालुक्यांमध्ये उपाययोजनेसाठी आधुनिक यंत्रसामग्री कार्यान्वित केली. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे.” सभापती जगदाळे, डॉ. होळ यांची भाषणे झाली.
Leave a Reply