जालना दि. 28- जालना जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यामध्ये अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.अशावेळी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी संबधित विमा कंपनीस ७२ तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ जालना जिल्ह्यामध्ये रिलायंस जनरल इन्शुरंस विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.जालना जिल्ह्यातील एकूण ५०५५०८ शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवून एकूण २०७४९३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे विमा संरक्षण घेतलेले आहे.आजअखेर जिल्ह्यातील जालना -२४६६,बदनापूर-३७०,भोकरदन-३८४,जाफ्राबाद-३८२,अंबड-४३३६,मंठा-५०४९, परतूर-३४२२ व घनसावंगी-९२१७ असे एकूण २५६२६ नुकसान सूचनापत्रे विमा कंपनीकडे प्राप्त झालेली आहेत.सदर नुकसान पूर्वसूचनांचे पंचनामे करण्याचे काम विमा कंपनी प्रतिनिधी व कृषि विभाग अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत चालू आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक नुकसानीची माहिती, पूर्वसूचना कंपनीस विहित नमुन्यातील अर्ज, विमा भरलेली पावती, आधार कार्ड आणि बँक पासबुक चे पहिल्या पानाची झेरॉक्स या कागदपत्रांसह देणे आवश्यक आहे. त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा १८०० १०२ ४०८८ या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या पत्त्यावर ई-मेलवर नुकसानीची पूर्वसूचना तातडीने द्यावी. काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी,संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा आपल्या गावातील संबधित कृषि सहायक यांचेकडे प्रत्यक्ष २ प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.
Leave a Reply