जालना (प्रतिनिधी) ः एसआरपीएफ अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या पुर्वी प्रमाणेच करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र विधीमंडळ आश्वासन समितीचे प्रमुख आ. कैलास गोरंट्याल यांनी आज बुधवारी राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत सकारात्मक विचार करून मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेण्यात येइल असे आश्वासन श्री देशमुख यांनी यावेळी दिले.
राज्याचे गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांची आज विधानभवनात भेट घेवून आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांना लेखी निवेदन देत उपरोक्त मागणी केली आहे. या निवेदनात आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे की, एसआरपीएफ ग्रुप ही राज्यात सातत्याने कार्यरत आहेत. नियमित पोलीस जवानांसोबत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ग्रुपमधील जवान नेहमीच आघाडीवर असतात. कार्यरत असलेल्या कर्मचार्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या नियमात पुर्वी दहा वर्षाच्या कार्यकालाची मर्यादा होती. मात्र मागील सरकारच्या कार्यकाळात त्यांनी नियमात बदल करून हा कार्यकाळ पंधरा वर्षाचा केला आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यभर एसआरपीएफ ग्रुपमधील कर्मचार्यांमध्ये नाराजी आणि असंतोष पसरलेला आहे. जालना शहरातच जवळपास 20 ते 25 हजार एसआरपीएफ कर्मचारी कार्यरत असून कर्तव्य बजावत आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून त्यांना खूप अपेक्षा असल्याचे नमूद करत बदलीची कालमर्यादा पुनःश्य पंधरा वर्षावरून दहा वर्ष होइल अशी संबंधीत कर्मचार्यांना खात्री वाटते. या मागणीची आपण गांभीर्याने दखल घेवून बदल्यांच्या कार्यकालाची मर्यादा पुर्वीप्रमाणेच करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी आ. गोरंट्याल यांनी केली. या मागणीनंतर आ. गोरंट्याल यांच्याशी झालेल्या चर्चेत गृहमंत्री श्री देशमुख म्हणाले की, बदल्यांच्या कार्यकालाची मर्यादा पुर्वीप्रमाणेच ठेवण्यासाठी आपण सकारात्मक भुमिका घेतांनाच हा विषय लवकरच मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर मांडून त्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही देखील गृहमंत्री श्री देशमुख यांनी आ. गोरंट्याल यांना दिली.
Leave a Reply