ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आज आंबेडकरी संवादाची आवश्यकता आहे का?

August 27, 202117:23 PM 44 0 0

आजच्या अत्यंत भयानक चेहरा प्राप्त झालेल्या काळात आम्हाला आंबेडकरी संवाद घडवून आणण्याची गरज आहे का? हा प्रश्नही तितकाच भयंकर आहे. तो भयंकर यासाठी की आम्ही कोणत्याही संक्रमणाच्या कालखंडातून प्रवासत नाहीत तर अक्षरशः अधःपतनाच्या गर्तेत बुडत चाललो आहोत. याचे कारण म्हणजे आम्ही आमची ध्येय-धोरणे, स्विकारलेली तत्वज्ञाने बाजूला ठेवून प्रतिक्रांतीने आधीच धगधगत ठेवलेल्या अग्निकुंडात स्वत:च स्वतःला झोकून देत आहोत. कोरोनाच्या काळाने माणसांचा प्रत्यक्ष संवाद तोडला आहे, असे नव्हे तर सबंध माणूसही उभा आडवा झोडपून काढलेला आहे.

आंबेडकरी संवाद म्हणजे चळवळीचा आवाज. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारधारेनुसार चालणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ असे मानले जाते. मग ती रस्त्यावरची असो, मनोरंजनातून प्रबोधनाकडे जाणारी असो की, राजकीय असो वा साहित्याची असो. या सर्वच पातळ्यांवर बाबासाहेबांच्यानंतर हा संवाद हळूहळू तुटलेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही संकटकाळी ‘तुफानातील दिवे’ म्हणून षड्डू ठोकून उभी राहणारी अशी आंबेडकरी चळवळीची ओळख आहे. मात्र, आपापसातील संवाद कमी होत चालला आहे. कोरोनाने चळवळीतील अनेक चांगली माणसं हिरावून घेतली. त्यामुळे एक महाअवकाश म्हणजे एक भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली. हे सत्य असले तरी या आधी कित्येक वर्षांपूर्वी इथल्या स्वार्थी, ढोंगी, लोभी, लाचार आणि सत्तेपुढे शेपूट हलवत लोटांगण घालणाऱ्या नेभळट राजकारणाने कोरोनापेक्षाही भयानक पोकळी निर्माण केली आहे. आता ती काही केल्या भरुन निघणार नाही. आजतागायत ‘मोजता येत नाही जगातल्या मापानं…’ इतकं काही आंबेडकरी चळवळीनं दिलं आहे. कार्यकर्त्यांनीही प्रसंगी प्राणांतिक यातना भोगल्या वा प्राणांचीही पर्वा केलेली नाही. बाबासाहेब आंबेडकर या नावासाठी ते शहीद झाले. हे ऐतिहासिक योगदान नाकारता येत नाही. परंतु आज नेमकी उलट परिस्थिती आहे. काहीएक लाभापायी स्वार्थ मोठ्या प्रमाणावर बोकाळला आहे. सत्तेसाठी लाळगाळ्यांची मोठी गर्दी जन्माला आली आहे. हे आपल्याला दिसतेच आहे. आमच्या माणसांनी आमचीच माणसं मारावीत या अशा राजकारणाने आंबेडकरी चळवळीच्या इतर क्षेत्रांवरही परिणाम घडवून आणला आहे. नव्हे तीही आता गंजत गांजत चालली आहेत. राजकीय पडझडीसोबतच आंबेडकरी उद्योग अथवा आंबेडकरी रंगभूमी या अशा नाजूक क्षेत्रांना उभारी मिळणे तर दुरापास्तच झाले आहे. या सर्वच प्रकरणांसाठी आंबेडकरी सुसंवादाची गरज आहे.

बाबासाहेबांच्या प्रेरणेने जो समाज सुधारला, पुढारला तो स्वतःला आंबेडकरी समाज म्हणवितो. इतरही सुधारले, अफाट प्रगती झाली. पण ते म्हणत नाहीत. हा आंबेडकरी समाज म्हणजे आजचा बौद्ध धम्म वर्तनसंदर्भांचा समुह. हा समुह आपल्या पूर्वाश्रमीच्या पोटजातींप्रमाणे विविध संकल्पनांना उराशी कवटाळून बसलेला असतो. तसा तो विविध राजकीय पक्षांच्या भुयारातही अडकलेला दिसतो. तो त्यांच्या वेगवेगळ्या आघाड्यांवर नाचत असतोच. गटागटाने या समुहाने आपले छोटे छोटे तुकडे करून घेत आपली दुकाने मांडली आहेत. नव्या गिऱ्हाईकाने कोणत्या दुकानात जाऊन झेंडा खरेदी करावा, हा त्याला प्रश्न आधी पडलेला असतो. त्याने हा निर्णय घेतलाच तर इतर दुकानदार डोळे वटारुन बसलेले असतातच. म्हणून एकदा एका दुकानात तुम्ही गेलात तर तुम्हाला दुसऱ्या दुकानातच काय त्या शेजारी किंवा त्या दुकानाशी संबंधित लोकांना बोलण्याची सुद्धा परवानगी नसते. जर तुम्ही पहिल्यांदा घेतलेल्या झेंड्याचा दांडा मजबूत असेल आणि आधीच्या दुकानात गेल्याने काही फायदा होत नसेल तर या प्रक्रियेत इतर चार दुकाने हिंडून खाण्याची मोकळीक आहे. या दुनियादारीतील दुकानदारीने सामाजिक सांस्कृतिक चळवळीचे कितीही नुकसान झाले तरीही यांचं कुणी काही बिघडवत नाही, हे ह्या धुरंधरांना ठामेठोकपणे माहिती आहे. म्हणून बारकाईने लक्ष दिले तर मोठ्या राजकीय श्रीमंत पक्षांना मतदारांचे मोठे अंकित समुह आमच्या सर्वत्र स्थापित असलेल्या मित्र मंडळांनी विक्रीला काढल्याचे दिसून येईल. यामुळे कुठेही आंबेडकरी माणूस स्वबळावर, केवळ आंबेडकरी विचारधारेवर निवडून येईल हे समकाळात ठामपणे सांगता येत नाही. या राजकीय मर्यादा आमच्या ‘जयहो!’ म्हणणाऱ्या शेंबड्या कार्यकर्त्यांपासून समाज विकून कोट्यवधींची कमाई करणाऱ्या धुरंधर नेत्यांनाही माहिती असल्यामुळे सगळीकडे छुप्या युतीचे षडयंत्र चालते. एखाददुसरा अपवाद वगळता सढळहस्ते कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित नसल्या तरी समाजासाठी नि:पक्षपणे कार्य करणाऱ्या आंबेडकरी किंवा तत्सम नावाच्या संघटना उभ्या करून त्याद्वारे आपल्या आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या फायद्याचे – मधाचे मोहळ तयार करून ठेवलेले असते. ते झाडून स्वतःलाच म्हणजे स्वसंघटनेला खायचे असते.

हीच परिस्थिती अगदी वेगवेगळ्या वैचारिक संकल्पना अंगाखांद्यावर खेळवत काही लोकांनी आपले मार्गोत्क्रमण चालविले आहे, तिकडेही दिसते. राजकीय पडझड झालेली निदर्शनास आली म्हणून कुणी आंबेडकरी चळवळ संपत चालली आहे अशी टीका करीत असेल तर ती अर्थहीन आहे. एक मात्र खरे की, वैचारिक पातळीवर विचारवंतांनी आपले अस्तित्व आंबेडकरीविहीन संकल्पनांशी गुलामीचे नाते जोडून पुरस्कारासारख्या अतितुच्छ प्रक्रियेखाली झोपवून टाकले आहे. काहींनी तर सरळसरळ राजकीय पक्षांशी समझौता करुन स्वतःचे आणि त्यांच्या बापाचेही नाव बदलून टाकले आहे. यांच्यापेक्षा काहीही न करता निव्वळ भाषणं करणारे कधीही तुलनेने चांगलेच आहेत. मात्र क्रियाहीन भाषणांच्या बाजाराऐवजी सगळीकडे सगळा जो स्वार्थाचाच बाजार भरलेला आहे, तो घातकच आहे. तद्वतच आंबेडकरी गायकांची अवस्था झालेली आहे. डोक्यावर तबला, ढोलकी, हार्मोनियमची पेटी घेऊन खाचखळग्याची वाट रक्तबंबाळ करीत गावोगावी जाऊन रात्रभर आंबेडकरी विचारांची पेरणी करणारी पिढी एक तर संपली आहे किंवा हालाखिचे जीवन जगते आहे. भीमजयंतीच्या माध्यमातून बुद्ध भीम गायन पार्ट्यांनी आंबेडकरी माणूस विचारांनी चेतविला आणि प्रस्थापितांविरुद्ध उभा केला. मात्र आता अत्याधुनिक संगितवाद्यांच्या जोरावर बख्खळ धनदांडगी सुपारी घेऊन आजचा गायक बदलत्या काळानुसार बदलत जाऊन काळाच्या गरजेला ओ देत जश्न – ए – जलसे सादर करीत असतो. अशा गायकांना विधानपरिषदेसारख्या सत्तासंवर्धनाची लाॅटरी लागलीच तर त्यात काय वावगे? आम्ही या अशा गायकांना त्यांच्या छोट्या अवस्थेपासून समाजातून वर्गणी गोळा करून करुन मोठे केलेलं असतं. कारण आमच्यात समाजप्रबोधनासाठी कार्यक्रम आयोजित करण्याचा कीडा सतत वळवळत असतो. त्यामुळे काखोटीला मळकट शबनम अडकवून, पायात तुटलेली पायताण घेऊन ठेचाळत आपल्या शाहिरीचा आणि जीवनाचाही मार्ग चालणाऱ्या ऐतिहासिक क्रांतिकारी भीमशाहीरांची या लोकांना कणभरही सर येणार नसली तरीही उघड्या डोळ्या देखत आंबेडकरवादाचा बुरखा पांघरून तुमच्याच मतावर मोठे होणाऱ्या आणि तुमच्याच पार्शवभागावर लाथ हाणून तुम्हाला पालथे उताणे पाडणाऱ्या बेईमान औलादींचे आजपर्यंत तुम्ही काय वाकडे केले?

आंबेडकरी माणूस जात्याच सुसंवादी असतो असे म्हणतात ते खरं असलं तरी ते पूर्णपणे सत्य नाही. म्हणजे ते प्रसंगानुरुप असत्य आहे असेही नाही. आंबेडकरी माणूस हा आधी आंबेडकरी साहित्याचा अभ्यासक असला पाहिजे. तेव्हाच तो संवादी असू शकतो. असे काही मोठ्या प्रमाणावर घडले तर आंबेडकरी संवाद घडवून आणण्याची गरज पडणार नाही. मात्र हा तथाकथित विचारवंत माणूस छोट्या मोठ्या लाभापायी आपल्याच कोषात स्थिरावत चालला आहे. मग पुढे ‘आमचा वाटा कुठं हाय रं?’ म्हणायलाही मागेपुढे पाहत नाही. मूळात आजचा आंबेडकरी तरुण काय करतो? तो कसला विचार करतो, यावरही बरचसं अवलंबून आहे. जुनी माणसं या तरुणांना मार्गस्थ करावयाचे सोडून आपलाच ‘दैदिप्यमान?’ इतिहास सांगत बसतात. आजचा आंबेडकरी तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन बनत चालला आहे. आंबेडकरी स्रियांसमोर कुणाचा आदर्श आहे, हे अगदी खूप महत्वाचं आहे. येणाऱ्या भविष्यकाळाची संपूर्ण भिस्त त्यांच्यावरच आहे. समाजात फूट पडत आहे, दुही पडली आहे, अनागोंदी माजली आहे हे आंबेडकरी तरुणीला, स्त्रीला आधी समजले पाहिजे. एकाच मोहल्ल्यात दोन गटांच्या दोन बुद्ध विहारांच्या निर्मितीला आंबेडकरी महिलाच आवर घालू शकतात. वारंवार आजच्या स्त्रियांनी रमाईचा आदर्श अंगी बाळगायला हवा! हे एकच आपलं तुणतुण्याचं सांगणं असतं आणि त्यापलीकडे आपण जातच नाही, हेही खरं आहे. कुमारवयीन मुले कोणत्या दिशेने वळताहेत हे आपण आधी चपखलपणे ओळखायला हवे. आमचा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन झालेला आढळतो. बख्खळ पैसा कमविण्याच्या नादात आहार व्यवहारातही ते चुकीच्या मार्गाने जात असतो. काही वेळा तो राजकीय प्रस्थापित व्यवस्थेला बळी पडलेला दिसतो. अगदी छोट्याशा प्रलोभनासाठी आपली मतं विकायला तयार होतो. बुद्ध विहारात ग्रंथाचे वाचन, एखाद दुसरा कार्यक्रम, बौद्ध पद्धतीने विवाह आणि भीमजयंतीचा नाचगाण्याचा उत्सव एवढेच आपले आयुष्य असा काहींनी गैरसमज करून घेतलेला आहे. नाहीतर हिंदूचे अनेक सण बौद्धांच्या सांस्कृतिक परंपरेशी कसे एकरुप आहेत, हे सांगण्यासाठी चढाओढ चाललेली असते. त्यातही कुणी निस्वार्थ भावनेने काही समाजकार्य करायला धजावत असेल तर खोट्या मोठेपणासाठी, अहंकारासाठी त्याची वजावट करणारे अनेक हात सरसावलेले असतात हेही तितकेच खरे आहे. एकूणच समाजात असलेल्या या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काही एक तोडगा काढण्यासाठी वैचारिक मंथन आणि नेत्यांच्या नव्हे तर विचारांच्या पातळीवर न फुटणारे ऐक्य अत्यंत आवश्यक आहे.

साधारणपणे पाच वर्षांत मोठमोठ्या विषयावरील संमेलने आपण आयोजित करतो. त्याचा फायदा काय होतो? तर तुमचा एकही माणूस लोकशाहीचा भागीदार बनत नाही. पण तुमच्या जातप्रवर्गातील दुसरा बनू शकतो. या आयोजकांनी आपल्या विषयाचे कितीही समर्थन केले तरी त्याला काही अर्थ नसतो. कारण तुम्ही घडवून आणलेल्या राष्ट्रीय विचारमंथनाचे फलित तुम्हाला पाच वर्षांत दिसतच नाही. तुम्ही तयार केलेली पार्श्वभूमी कुणीतरी दुसराच सावडून नेतो. मग तुम्ही उगाचच विचारांची ज्योत तेवत ठेवली पाहिजे हे जुजबी कारण सांगता….जे सर्व सामान्यांना आवडत नाही. आपल्या संसारात आणि दैनंदिन कर्तव्यात अडकून पडलेली अनेक कुटुंबे आपल्या गल्लीतल्या बौद्ध विहाराच्या सांस्कृतिक पर्यावरणाबाहेर पडतच नाहीत, अशी अवस्था या संमेलनांच्या आयोजकांची होते. आयुष्यभर चळवळीसाठी झिजलेल्यांच्या हाती रिकामी झोळी आल्यानंतर येणारी पिढी सत्वर सावध होते आणि आपल्यासाठी असलेल्या कायद्याचा, आधीच बांधून ठेवलेल्या बुद्ध विहाराचा, झेंड्याचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचाही जितका फायदा करून घेता येईल तितका करून घेऊन आपली तसेच रिकामीच राहिलेल्या बापाचीही झोळी कशी भरता येईल याचाच विचार प्रामुख्याने होतो. याउलट ग्रामीण भागातील आंबेडकरी समाज मेहनत करून आपला चरितार्थ चालवित असतो. तो इतर कोणत्याही भानगडीत पडत नाही. निवडणूकीचे दुषित वारे तिकडेही असते परंतु तुम्ही कितीही साहित्य संमेलनं भरवून उलथून टाका; त्यांना काहीच देणंघेणं नसतं. कित्येक वेळा ग्रामीण भागातील लोकांना स्थानिक प्रश्नांशी झुंजावं लागतं. मुलांच्या शिक्षणाची आबाळ तर होतेच पण अनेकदा उदरनिर्वाहाचा प्रश्नही जटील होतो. गावखेड्यामध्ये गावगाड्याचा संबंध म्हणून अनेक जाती जमाती मिळून मिसळून वागत असतात, असे आपण म्हणतो पण सगळ्यात जास्त अत्याचाराची प्रकरणे गावखेड्यातच जन्माला येतात. इथे खऱ्या अर्थाने संवादाची आवश्यकता आहे. जोपर्यंत ग्रामीण आंबेडकरी युवक निष्ठेने साहित्याचे वाचन करणार नाही तोपर्यंत ग्रामीण भागातील आंबेडकरी चळवळ खऱ्या अर्थाने उभी राहणार नाही. अशा वेळी हा आंबेडकरी तरुणांचा समुह संवादासाठी, प्रश्नोत्तरासाठी, वादविवादासाठी, खंडनमंडनासाठी उत्सुक असेल.

हे होत नाही आणि सर्वच स्तरांतून जातींची परिमाणे सशक्त बनत चालली आहेत. जातीजातीतून महापुरुषांची उगवण व्हायला सुरुवात झालेली आहे. आंबेडकरी विचारधारा प्रमाण मानून जी प्रगती झाली ती इतरांच्या डोळ्यात खुपायला लागली आहे. इतर जाती-जमाती बौद्ध समाजाला परोक्ष अपरोक्ष लक्ष्य बनवत चालली आहेत. त्यांनी आपापल्या झेंड्यांचे, पुतळ्यांचे आणि आरक्षणाचे राजकारण चालविले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून जी अत्याचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत. याला कारण आपणच आहोत. म्हणजे आपण एक नाही आहोत. याचा फायदा सातत्याने दुसरे घेत राहणार आहेत. घेत आहेत. आपल्यात सातत्याने गैरसमज वाढत चालले आहेत. त्यामुळे आपण एकमेकांपासून दूर चाललो आहोत. आपण ‘हे’ केले पाहिजे… ‘ते‌’ केले पाहिजे असे म्हणून चालणार नाही. मोठाड मोठाड भाषणं करुन चालणार नाही. गप्पा, थापांनी भागणार नाही. निव्वळच कार्यक्रम, संमेलने आयोजित करुन भागणार नाही तर या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी, चिंतनासाठी आपण आधी एकत्र आले पाहिजे. आपल्या जळत्या प्रश्नांना हात घातला पाहिजे. याबरोबरच धम्मचळवळीची अवस्था फार चांगली आहे अशातली बाजू नाही. बुद्ध विहारे खाजगी मालमत्ता झाल्यासारखी वापरली जात आहेत. बव्हंशी भिक्षू केवळ पौरोहित्य करण्यात मग्न आहेत. गटातटातून, हेव्यादाव्यातून आपणच आपले नुकसान करुन घेत आहोत. धम्मचळवळीचे नायक म्हणून पांढरे कपडे घालून मिरवणारे पांढरपेशी लोक समाजात निर्माण होऊ पाहत असलेल्या अनैतिकतेशी दोन हात करायला मागेपुढे पाहतात नाही तर आपला इतिहास सांगत बसतात. हे धम्मरथ तिथेच ठेवणारे हे नाही तर मागे नेणारे नालायक लोक आहेत. तरुणपणात काही झाले नाही आणि उतारवयात काही होत नाही, असे हे लोक आहेत. एकंदरीत आपणच आपल्या आंबेडकरी चळवळीचे मारेकरी आहोत. समाजाच्या प्रगतीचा रथ मागे खेचणारे खेचर आपणच आहोत. हे इथे प्राधान्याने लक्षात घेतले पाहिजे. इतरांची आपल्याकडे डोळा उचलून बघण्याची टाप नाही पण आपण मात्र कुठे खट्टू झाले की, झेंडे घेऊन इतरांच्या विरोधात बिनविरोध नाचण्याचे सोडत नाही. हे इतरांना माहिती आहे. म्हणून बौद्धांविरुद्ध छुप्या पद्धतीने फुस लावून देणारे आणि तमाशा बघणारे हे इतरच आहेत. कधी कधी आपल्यातूनही फितुर होणाऱ्यांवर लक्ष ठेवित अशा जवळच्या कावेबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. आताशा आंबेडकरी आंदोलनालाही धार असलेली दिसत नाही, हा स्वारोप खरा आहे. आंदोलने इव्हेंट बनत चालली आहेत. आज सत्ता तुमच्या विरोधात आहे, पोलिस, प्रशासन तुमच्या विरोधात आहे, मिडिया तुमच्या विरोधात आहे. मात्र, संघर्ष कायम तुमच्या पाठीशी आहे. बघा. विचार करा. एकत्र या. चिंतन करा. बुद्धीवादी लोकांनी तर एकत्र येणे ही चळवळीची गरजच आहे. आपण वैचारिक पातळीवर एकत्र आलो तर पुढील काळात काही पर्याय निश्चितच उभे करु शकू. त्यासाठी सकारार्थी विचार केला पाहिजे. आपण यात आता एकजूटीने यशस्वी होऊ या! पुढे जाऊ या!

– गंगाधर ढवळे, नांदेड.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *