जालना (प्रतिनिधी)ः कोविडच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असतांना चक्क आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यातच रुग्णांची रुग्णालयाकडून आर्थिक लुट केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. विशेष म्हजणे रुग्णांची आर्थिक फसवणूक करणार्यावर गुन्हा दाखल झाल्याची दुसरी घटना देखील आरोग्यमंत्री यांच्याच जिल्ह्यात घडली आहे. जालना जिल्ह्यातील अत्यंत जुने आणि नावलौकीक असलेले मिशन हॉस्पीटल हे गोरगरीबांच्या उपचारासाठी स्वस्तातले हॉस्पीटल म्हणून ओळखले जात होते. हेच हॉस्पीटल काही दिवसापुर्वी सह्याद्री हॉस्पीटलच्या व्यवहारावरुन चर्चेत आले होते. ही चर्चा थांबल्या नंतर आता पुन्हा एकदा रुग्णाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी हे हॉस्पीटल चर्चेत आले आहे.
रुग्णावर उपचार केल्यानंतर मिशन हॉस्पीटलचे डॉ. मोजेस यांनी व हॉस्पीटलचे व्यवस्थापक डेव्हीड एस.गायकवाड यांनी रुग्णाकडून तसेच महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत असे दोन वेळा पैसे उचलून शासन आणि रुग्ण अशा दोघांचीही फसवणूक केली असल्याचा ठपका ठेऊन त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात दि.17 जुलै रोजीच्या पहाटे 12.20 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी अजित कोठारी यांनी त्यांच्या पत्नीला उपचारासाठी मिशन हॉस्पीटल मध्ये दाखल केले होते. उपचार सुरु असतां त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत बसवून त्यांच्यावर उपचार केले. अजित कोठारी यांच्या पत्नीवर शासकीय पैशातुन उपचार केले जात असतांनाही मिशन हॉस्पीटलचे डॉ. खिस्तोफर मोजेस यांनी व हॉस्पीटलचे व्यवस्थापक डेव्हीड एस. गायकवाड यांनी संगनमत करुन रुग्णाची व रुग्णाच्या नातेवाईकाची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने शासनाकडून उपचारासाठी 24 हजार रुपये मोबदला घेऊन देखील रुग्णाच्या नातेवाईकांकडून 17 हजार 700 रुपये पुन्हा घेतले. व ते परत केलेच नाहीत. त्यामुळे अजित कोठारी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु त्यांना पोलीसाकडून त्यांना सहकार्य होत नव्हते त्यामुळे त्यांनी सतत संघर्ष करुन व सतत पाठपुरावा करुन अखेर दि. 17 जुलै रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णांची फसवणूक कराल तर कारवाई करणारच – संजोग हिवाळे
जालना जिल्ह्यात रुग्णांचि मोठी आर्थिक फसवणूक होत आहे. हा प्रकार जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनीक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना माहिती आहे. परंतु रुग्णांच्या तोंडावर आणि मिडीया समोर सुचना आणि धमक्या देतात असे दिसून येते. असा घनाघात आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांनी केला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून आजपर्यंत एकाही घोटाळेबाज डॉक्टरवर गुन्हा किंवा कारवाई झालेली नाही. ती आम्ही करुन दाखवली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याच जिल्ह्यात सर्वसामान्य नागरीकांची अशा पध्दतीने पिळवणूक होत असेल. आर्थिक लुट होत असेल तर इतर जिल्ह्यात काय हाल असतील याचा विचार न केलेलाच बरा. गुन्हेगार डॉक्टरांवर कारवाई होऊ नये यासाठी स्वतः पोलीसच प्रयत्न करीत असतील आणि त्यांच्या जामीनाची व्यवस्था पोलीसच करीत असतील तर त्यांच्याकडून जनतेने कोणत्या न्यायाची अपेक्षा करावी असा सवाल देखील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांनी उपस्थित केला आहे. यापुढे कोणत्याही हॉस्पीटने रुग्णांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करु नये, जर फसवणूक केल्याच्या घटना निदर्शनास आल्या तर त्यांच्यावर देखील अशाच पध्दतीने कारवाई केली जाईल. असा इशाराही संजोग हिवाळे यांनी दिला आहे.
Leave a Reply