नांदेड – भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती सर्वांना साजरी करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी अपेक्षा भदंत पंय्याबोधी थेरो यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्याकडे केली. या प्रसंगी मंचावर पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, नेते सुभाषदादा रायबोळे, रिपब्लिकन हक्क परिषदेचे रमेशदादा सोनाळे, वंबआचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले, माकपचे सचिव गंगाधर गायकवाड, वंचितचे प्रा. राजू सोनसळे, अॅड. यशोनिल मोगले, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आलेल्या जयंती आढावा व शांतता बैठकीत भदंत पंय्याबोधी बोलत होते. याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, पोलीस विभाग हा आपला शत्रू नसून आपल्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते शासनाच्यावतीने आपले काम करतात. शासनाचा आदेश अंमलात आणणे त्यांची जबाबदारी आहे. पण येणारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रशासनाने आंबेडकरी समाजाला साजरी करू द्यावी, अशी इच्छा त्यांनी पोलीस अधिक्षकांकडे व्यक्त केली. आपल्या सर्वांनाच हे सांभाळून घ्यावे लागणार आहे. तरीपण आम्ही शासनाच्या सुचना येईपर्यंत वाट पाहू ! सुचना आल्यानंतर आपण ठरवाल त्या पध्दतीने काम करू. आंबेडकरी जनतेकडून प्रशासनाला सहकार्य केले जाईल. मात्र, शासनाने मार्गदर्शक सूचनांचा आराखडा तयार करावा, असेही ते म्हणाले. नुकत्याच झालेल्या पोलिसांवरील हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करून भदंत पंय्याबोधी म्हणाले की, पोलीस विभागानेसुध्दा संयम आणि शांतता राखत बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहकार्य करावे.
या प्रसंगी उपस्थित असलेल्या विविध जयंती मंडळाच्या अध्यक्ष आणि कार्यकर्त्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये अनेक सुचना आणि आंबेडकर जयंती साजरी व्हावी यासाठी मुद्दे सादर करण्यात आले. त्यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, नेते यांना वेगळा न्याय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ अनुयायांना वेगळा न्याय असे काही करू नका असे सांगण्यात आले. कोरोनाची भितीच जास्त दाखवली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी जनतेच्या मनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीच साजरी करूच नये ही भूमिका पेरली जात आहे. गतवर्षी सर्वत्र शासन प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. यावेळी अनेकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. त्यात घरात राहुन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन हा मुद्दा सुध्दा होता. सलग अभ्यास करून डॉ.बाबासाहेबांना अभिवादन हाही मुद्दा होता. इतर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त परवानगी दिली जाते, आंबेडकर जयंतीलाच परवानगी का दिली जात नाही? असा प्रश्नही विचारण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी महिन्याभरापासून सुरू असते. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभिकरण सुध्दा असते. अद्याप ते सुध्दा झाले नाही. काही जणांनी मिरवणूक डी.जे.सह काढणार असे सांगितले. काही जणांनी आमची सांस्कृतीक परंपरा दाबण्याचा प्रयत्न करू नका असाही मुद्दा यावेळी बैठकीत उपस्थित केला.
कोव्हिड-१९ नियमावलीनुसार शासनाच्यावतीने जी नियमावली येईल त्यानंतर पुन्हा एक बैठक आयोजित करून नांदेड जिल्ह्यासाठी एक मार्गदर्शक सुचना तयार व्हावी आणि त्या मार्गदर्शक सुचनेमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करू असे सांगणयात आले. आज झालेल्या बैठकीची माहिती पोलीस अधिक्षकांनी शासनाला कळवावी ज्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही साजरी करणारच आहोत पण ती साजरी करतांना आम्हाला आमच्या व इतरांच्या जीवाची भिती पण आहे असे सांगत एक मधला मार्ग शोधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होईल यासाठी प्रयत्न व्हावे, असे सांगण्यात आले. या सर्वांच्या मुद्यांना उत्तर देतांना पेालीस अधिक्षक शेवाळे म्हणाले मी कोणतीही सुचना किंवा निर्देश देण्यासाठी ही बैठक बोलावली नाही तर आपल्याकडून आपल्या भावना जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत बसलो आहे. तथागत गौतम बुध्दांनी सांगितलेल्या विचारांवर वागत आजच्या बैठकीतील सुवर्णमध्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कशी साजरी करता येईल यावर विचार करू असे आश्वासन दिले.
यावेळी बैठकीला नंदकुमार बनसोडे, चंद्रकांत चौदंते, राहुल सोनसळे, सतिश एडके, प्रबुध्द चित्ते, राहुल चिखलीकर,राहुल घोडजकर, कुणाल सोनाळे, विनोद नरवाडे, अशोक वागरे, राजू लांडगे, विठ्ठल गायकवाड, प्रकाश रोकडे, आनंदा वाघमारे, अंकुश सावते, भिमराव बुक्तरे, अभय सोनकांबळे, आतिश ढगे, स्वप्नील नरबाघ, अनिल वाघमारे, रोहण कहाळेकर, जयदिप पैठणे, सचिन सोनकांबळे, विजय कटके, शशिकांत हनमंते, अविनाश गायकवाड यांच्यासह या बैठकीला नांदेड शहरातील अनेक जयंती मंडळांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply